bjp
bjpesakal

BJP Party : रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात भाजपला व्हायचेय मोठा भाऊ

भारतीय जनता पक्षाने एका निर्धारित काळात लक्ष गाठण्यासाठी राजकारणात क्लस्टर पद्धतीने काम करायला सुरवात केली.

चिपळूण - भारतीय जनता पक्षाने एका निर्धारित काळात लक्ष गाठण्यासाठी राजकारणात क्लस्टर पद्धतीने काम करायला सुरवात केली आहे. क्लस्टर पद्धतीने काम करताना जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना सक्रिय केले आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात भाजपला शिवसेनेचा मोठा भाऊ व्हायचा आहे. भाजपचे चिन्ह ग्रामीण भागातील मतदारापर्यंत पोहचवताना युतीमध्ये तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

राज्यात २०१४, २०१९च्या निवडणुका मोदी लाटेवर भाजपने जिंकल्या; मात्र या मतदार संघात शिवसेना, राष्ट्रवादी या प्रादेशिक पक्षाचे वर्चस्व राहिले. भाजप लहान भाऊच राहिला; मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती करताना भाजपला या दोन्ही मतदार संघात मोठा भाऊ व्हायचे आहे.

भाजपने २०१९ लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आणि मित्र पक्षाकडे राहिलेल्या मतदार संघात आपली ताकद वाढवण्यावर भर दिला आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड हे दोन्ही मतदार संघ पूर्वी शिवसेनेकडे होते. २०२४च्या निवडणुकीत हे मतदार संघ कोणाकडे असतील, हे वरिष्ठ पातळीवर ठरेल; मात्र आता बदललेली परिस्थिती बघता रत्नागिरी -सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात भाजपला शिवसेनेचा मोठा भाऊ व्हायचा आहे त्यासाठी क्लस्टर पद्धतीने काम सुरू आहे.

भाजपने केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांच्याकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग तर केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्याकडे रायगड लोकसभा मतदार संघाची जबाबदारी दिली आहे. या क्लस्टरमध्ये भाजपने सर्वसामान्य मतदार आणि कार्यकर्त्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजपमधील काहीजण राजकारणापासून अलिप्त होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले अनेक लोकप्रतिनिधी पक्षीय कार्यक्रमात कुठेही दिसत नव्हते.

मध्यंतरी पक्षात संघटनात्मक बदल झाले त्यानंतर काहीजण सक्रिय राजकारणापासून अलिप्त झाले होते. या साऱ्यांना आता सक्रिय करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानंतर जोरदार जनसंपर्क अभियान सुरू आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनेच्या लाभार्थ्यांसोबत विशेष संपर्क साधला जात आहे. बूथस्तरापासून तर ब्लॉगस्तरापर्यंत वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. त्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आली आहे.

सरल अॅपच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधला जात आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत हे चित्र असेच राहणार असून भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणूक येईपर्यंत आणखी ताकदीने कल्स्टर पद्धतीवर काम करताना दिसणार आहे.

भाजपने लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीत इतर सर्व पक्षाला मागे सोडले आहे; मात्र नेहमीप्रमाणे भाजपला राष्ट्रीयपेक्षा प्रादेशिक पक्षाचे कडवे आव्हान असणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वज्रमूठ अधिक सक्षमपणे दिसत आहे.

भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी नियोजन केले असेल; पण देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरू आहे. सरकारी कंपन्या ठराविक लोकांना विकल्या जात आहेत. देशात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जनतेच्या या प्रश्नांवर भाजपच्या कार्यकर्त्यांकडे उत्तर नसेल. कर्नाटकमधील जनतेने भाजपला नाकारले. महाराष्ट्रातही भाजपला जनता नाकारेल. बाहेरून येणाऱ्या मंत्र्यांचा कोकणात किती प्रभाव पडेल, हे नजीकच्या काळात कळेल.

- विनायक राऊत, खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com