संक्षिप्त

संक्षिप्त

एसटी कष्टकरी पॅनलचा एकतर्फी विजय
दाभोळ ः एसटी सहकारी बँकेच्या निवडणुकीत एसटी कष्टकरी जनसंघाच्या पॅनेलचा एकतर्फी विजय झाला आहे. त्या निमित्ताने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नावनिर्वाचित संचालक भगतसिंग विश्वासराव यांनी विजयी दौऱ्यानिमित्त दापोली आगाराला भेट दिली. या वेळी दापोली आगारातील एसटी कष्टकरी जनसंघ संघटनेने त्यांचे स्वागत केले. या वेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मुनाफ राजापकर, अमोल पाटोळे, सचिन राजेशिर्के, अरविंद सुतार, अमोल जाधव यांच्यासह बँकेचे सभासद व एसटी कर्मचारी उपस्थित होते.


साखरप्यात ८ जुलैला मॅरेथॉन स्पर्धा
साखरपा ः आमदार राजन साळवी यांचा ९ जुलैला वाढदिवस आहे. त्या निमित्ताने ८ जुलैला सकाळी १० वा. शिवसेना व युवासेना साखरपा विभाग यांनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. बाळासाहेब ठाकरे सभागृह कोंडगाव जुना एसटी स्टॅण्ड या ठिकाणाहून स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. विजेत्यांना अनुक्रमे २१ हजार, ११ हजार, ७ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मनसे रत्नागिरी शहराध्यक्षपदी अद्वैत कुलकर्णी
रत्नागिरी ः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज रत्नागिरी शहरातील काही नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये अद्वैत कुलकर्णी शहराध्यक्ष, अमोल श्रीनाथ शहर संघटक आणि अजिंक्य केसरकर शहर सचिव यांना २९ जूनला राज ठाकरे यांनी नियुक्ती केल्याचे पत्र अद्वैत कुलकर्णी यांना दिले आहे. ही नियुक्ती एक वर्षासाठी असून, पदाचा कार्य अहवाल पाहूनच पुढील मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे म्हटले आहे.


अपघातप्रवण क्षेत्रात
रेलिंग उभारण्याची मागणी
संगमेश्वर ः मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रात धामणी आणि गोळवली गावामध्ये नदीच्या बाजूला संरक्षण म्हणून ठेकेदार कंपनीने तात्पुरती रेलिंग उभारावीत, अशी मागणी संगमेश्वरवाशीयांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातानंतर ठेकेदार कंपनी आणि बांधकाम विभागाने जागरूकता म्हणून हे काम त्वरित हाती घेण्यात यावे, अशी मागणी होत आहे. संगमेश्वर ते आरवली या अपघातप्रवण क्षेत्रात धामणी आणि गोळवली या ठिकाणी वारंवार अपघात होतात. चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्त्याची खोदाई करण्यात आले आहे तसेच जोडरस्तेही खराब झाले आहेत. त्यामुळे खड्डा चुकवत असताना गाड्या नदीमध्ये कोसळण्याची शक्यता असते तसेच या ठिकाणी शाळा-महाविद्यालयांमध्ये जाणारे विद्यार्थी आणि प्रवासीसुद्धा याच ठिकाणी उभे असतात. त्यामुळे या विषयाची गंभीरपणे दखल घेतली जावी आणि नदीकाठच्या बाजूला रेलिंग उभारण्यात यावीत, अशी मागणी होत आहे तसेच दोन दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातानंतरही बांधकाम विभागाला जाग येईल का, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com