‘सावडाव’ पूर्ण क्षमतेने प्रवाहीत

‘सावडाव’ पूर्ण क्षमतेने प्रवाहीत

Published on

13571
सावडाव ः येथील निसर्गरम्य वातावरणात पहिल्याच पावसात प्रवाहित झालेला धबधबा.

‘सावडाव’ पूर्ण क्षमतेने प्रवाहित

वर्षा पर्यटन; कणकवली तालुक्यातील धबबधा

सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ३ ः पर्यटकांना भुरळ घालणारा सावडाव धबधबा अखेर पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाल्याने पर्यटकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. गोवा महामार्गापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कणकवली तालुक्यातील हा निसर्गरम्य धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे सावडाव धबधबा वर्षा पर्यटनास सज्ज असून, जिल्ह्यासह राज्य व परराज्यांतील पर्यटकांची उच्चांकी गर्दी पाहायला मिळणार आहे.
मॉन्सून यावेळी काहीसा उशिरा सक्रिय झाला तरी, सध्या सावडाव परिसरात पडणाऱ्या दमदार पावसामुळे धबधबा प्रवाहित झाला आहे. वर्षा पर्यटनासाठी सावडावकडे शनिवार, रविवार व विकेंडला वर्षा पर्यटकांची पावले वळू लागली असून, हिरवीगर्द झाडी आणि निसर्गरम्य वातावरणात खळखळ वाहणाऱ्या धबधब्याचा आनंद यामुळे पर्यटकांना अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळणार आहेत.
पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल, अशी चिन्हे असताना, जूनअखेर एकदाचा दमदार पाऊस सुरू झाला. आठ दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. जिल्ह्यातील आंबोलीनंतर दुसऱ्या स्थानी आणि सुरक्षित म्हणून प्रसिद्ध असलेल्या सावडाव धबधबा वर्षा पर्यटनासाठी सज्ज झाला आहे. जिल्ह्यासह राज्यातून व इतर राज्यांतील अनेक पर्यटक मोठ्या संख्येने वर्षा पर्यटनासाठी सावडावला पसंती देतात. डोंगर पठारावरून व पसरट कड्यावरून खाली कोसळणारा, गर्द हिरव्या झाडाझुडपांतून आनंदाचे उधाण घेऊन आलेला सावडाव धबधबा कोसळून लागला असून, अनेक पर्यटक आंघोळीचा आनंद लुटताना दिसत आहेत. यावर्षी जून अखेरपासून ते सप्टेंबर या काळात सावडाव धबधब्यावर पर्यटकांची संख्या दररोज वाढणार आहे. शनिवार, रविवार व सुटीच्या दिवसांसह अन्य दिवशीही पर्यटकांची वर्षा पर्यटनासाठी येथे गर्दी उडणार आहे.
ग्रामपंचायत स्तरावरून शासनाच्या निधीतून सावडाव परिसरात रंगरंगोटी, नळपाणी योजना, स्वच्छता व सुसज्ज रस्ता अशा प्रकारची कामे करण्यात आली आहेत. पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे; मात्र गेली काही वर्षे तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकरांसह अन्य नेतेमंडळींनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन सावडाव धबधबा परिसरात पर्यटनासाठी विविध योजनांचे केलेले नियोजन मात्र गेली अनेक वर्षे हवेतच विरल्याचे दिसून येते. पर्यटनासाठी वाव असलेल्या धबधबा परिसरात अद्यापही पायाभूत सुविधांचा अभाव आहे. सध्या मंत्री केसरकर हे सत्ताधारी गटात असून, त्यांच्याकडून जिल्हावासीयांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्याचबरोबर सध्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, स्थानिक आमदार नीतेश राणे यांनी पुढाकार घेऊन या धबधब्याला मिळणारी पर्यटकांची वाढती पसंती पाहता सावडाव येथे बारमाही पर्यटन होण्याबरोबरच पर्यटनात्मक विकास करून परिसराचा विकास करणे गरजेचे आहे. शिवाय रोजगाराभिमुख संधी निर्माण होण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी लक्ष देण्याची गरज आहे.
...............
चौकट
शासनस्तरावरून प्रयत्नांची गरज
सध्या लोखंडी रॅम्प, पायऱ्या, शुशोभीकरण, बाथरूम, टॉयलेट, रस्ता अशाप्रकारच्या पयाभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत. स्थानिकांनीही दुकाने मांडून पर्यटकांची सोय केली असल्याने थोड्याफार प्रमाणात का होईना, रोजगार उपलब्ध झाला झाला आहे; मात्र पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे या सोयी अपुऱ्या पडत असून, त्याचप्रकारे त्या सुविधा दर्जेदार होण्याची गरज आहे. वर्षा पर्यटन संपेपर्यंत पोलिस संरक्षण देण्याची गरज आहे. सावडाव धबधब्याच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर अभ्यंगत कर ग्रामपंचायतीमार्फत प्रत्येक पर्यटकाला लावला जाणार असून, दरवर्षी होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून पार्किंग व्यवस्थेसह करही लावला जाणार आहे. सावडाव धबधब्याच्या ठिकाणी सर्व पर्यटकांनी येताना दरवर्षीप्रमाणे आनंद लुटावा व सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच आर्या वारंग व उपसरंच दत्ता काटे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.