आम्ही शरद पवार यांच्यासोबतच

आम्ही शरद पवार यांच्यासोबतच

13589
सावंतवाडी ः ‘आम्ही साहेबांसोबतच’, अशा आशयाची गांधी टोपी दाखवताना सौ. अर्चना घारे-परब. शेजारी अन्य.

आम्ही शरद पवार यांच्यासोबतच

अर्चना घारे-परब; सावंतवाडीत भूमिका स्पष्ट

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांचा वारसा घेऊनच सावंतवाडी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते काम करणार आहोत. ‘काहीही झाले तरी आम्ही शरद पवार यांच्यासोबतच राहू’, अशी भूमिका आज येथे राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ. अर्चना घारे-परब यांनी मांडली. यावेळी पदाधिकाऱ्यांकडून ‘आम्ही साहेबांसोबतच’, अशा आशयाच्या टोप्या घालून शरद पवार यांना समर्थन दर्शवले.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे रविवारी (ता. २) आपल्या समर्थक आमदारांसह भाजपशी हातमिळवणी करत सरकारमध्ये सामील झाले. एकूणच, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली. घडलेल्या या राजकीय भूकंपानंतर संपूर्ण राष्ट्रवादीमध्ये चलबिचल झाली होती. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्षा तथा कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ. घारे-परब यांच्यासह तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची भूमिका या निर्णयानंतर महत्त्वाची अशीच होती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बरेचजण ‘आम्ही शरद पवारांसोबतच आहोत’, अशी भूमिका मांडत होते, तर काहींकडून अजित पवारांचे समर्थन केले जात होते. एकूणच, आज सौ. घारे-परब यांच्यासह तालुक्यातील पदाधिकाऱ्यांकडून भूमिका जाहीर करताना ‘आम्ही शरद पवार साहेबांसोबतच राहू’, असे स्पष्ट केले. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, हिदायतुल्ला खान, देवा टेमकर, इफ्तिकार राजगुरू, काशिनाथ दुभाषी, अॅड. सायली दुभाषी, सौ. चित्रा देसाई, जावेद शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
--
पक्षात फूट पडल्याची खंत
अर्चना घारे-परब म्हणाल्या, ‘‘महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट लक्षात घेता मनाला अतिशय दुःख होत आहे. शरद पवार यांनी पंचवीस वर्षांमध्ये हा पक्ष मेहनतीने वाढवला होता; परंतु, कालचा प्रकार हा मनाला न पटणारा असाच आहे; पण, काहीही झाले तरी आम्ही शरद पवार यांचे विचार घेऊनच राष्ट्रवादीमध्ये काम करणार आहोत. त्यांच्या पाठीशी सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते सदैव राहतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक जोमाने वाढवतील.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com