गुहागर ः भाजपकडून विरोधकांच्या घरावर पाळत

गुहागर ः भाजपकडून विरोधकांच्या घरावर पाळत

(टीप- एकाखाली एक दोन बातम्या आहेत.

भाजपकडून विरोधकांच्या घरावर पाळत
भास्कर जाधव यांना संशय ; पोलिसांना विचारला जाब
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता.३ ः तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या नेत्रा ठाकूर यांच्या घरावर पाळत ठेवण्यात आली. याबाबत गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे. चौकशीमध्ये संबंधितांनी भाजप पदाधिकाऱ्यांचे नाव घेतले आहे. तरीदेखील संतोष जैतापकर यांना चौकशीसाठी का बोलावत नाहीत, असा प्रश्न आमदार भास्कर जाधव यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी राज माने यांना विचारला.

वेळणेश्वर येथे जिल्हा परिषद सदस्या ठाकूर यांचे निवासस्थान आणि पर्यटन संकूल आहे. जूनअखेरीस तीन पर्यटक त्यांच्याकडे राहण्यासाठी खोली मिळेल का? म्हणून चौकशीसाठी आले होते; मात्र त्यांची वर्तणूक संशयास्पद वाटल्याने पर्यटन व्यवसाय सांभाळणाऱ्या ठाकूर यांच्या मुलीने त्यांना खोली नाकारली. तरीदेखील हे तीनजण त्याच्या पर्यटन संकुलाभोवती घुटमळत होते. या काळात ठाकूर घरी नव्हत्या. मुलीने आई-वडिलांना दूरध्वनीवरून हा सर्व प्रकार सांगितल्यावर याबाबतची तक्रार ठाकूर यांच्या मुलीने गुहागर पोलिस ठाण्यात दाखल केली. गुहागर पोलिसांनी तातडीने या तीन पर्यटकांची चौकशी केली. हे पर्यटक बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहेत. वेळणेश्वरला राहून जैतापकरांना भेटायला जाणार असल्याचे त्यांनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले; मात्र संपूर्ण चौकशीमध्ये पोलिसांना संशयास्पद असे काही मिळाले नाही.
दरम्यान, संतोष जैतापकर हे राजकीय शत्रू असल्याने त्यांनीच आमच्या घराची रेकी करण्यासाठी, पाहणी करण्यासाठी या तिघांना पाठवले होते. त्यामुळे जैतापकर यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी ठाकूर यांनी पोलिसांकडे केली; मात्र पोलिसांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. हाच धागा पकडून निषेध मोर्चासाठी गुहागरमध्ये आलेल्या आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर पोलिस ठाणे गाठले. तेथे उपविभागीय पोलिस अधिकारी राज माने यांची भेट घेतली. संशयित व्यक्ती जैतापकर यांचे नाव घेत आहेत मग पोलिस हे नाव का टाळत आहेत? तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? असा प्रश्न विचारला.
भविष्यात पोलिसांच्या विरोधात मोर्चा काढावा लागेल, असा इशाराच गुहागर पोलिसांना दिला. जाहीर मेळाव्यात या घटनेचा उल्लेख आमदार जाधव यांनी केला. भाजपकडून विरोधकांच्या घरावर पाळत ठेवण्यात येते. एका महिला सदस्याच्या घराची रेकी करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.


फोटो ओळी
-rat३p१२.jpg ः २३M१३५४५ गुहागर ः पत्रकार परिषदेत बोलताना संतोष जैतापकर सोबत नीलेश सुर्वे.


राजकारण, प्रसिद्धीसाठी पर्यटक वेठीला
संतोष जैतापकर ; अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार
गुहागर, ता. ३ ः स्वार्थी राजकारण आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी नेत्राताई आणि आमदार जाधव यांनी तीन निरपराध पर्यटकांना आयुष्यातून उठवले आहे. त्या तिघांशी माझा दुरान्वयेही संबंध नाही. तरीही पोलिसांनी चौकशीला बोलावले तर केव्हाही जायला तयार आहे, असे जणू आव्हान भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हा ओबिसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी पत्रकार परिषदेत दिले.
वेळणेश्वरच्या जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर यांच्या घरावर पाळत ठेवल्याचा संशय व्यक्त करून संतोष जैतापकर यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यांची पोलिस चौकशी करा, अशी मागणी आमदार जाधव यांनी पोलिस ठाण्यात केली. तसेच जाहीर सभेत भाजप पदाधिकारी महिला सदस्यांच्या घरावर पाळत ठेवतात, असा उल्लेखही त्यांनी केला. या संदर्भात जैतापकर म्हणाले, ओबीसी समन्वय समितीमध्ये नेत्राताई आणि मी सल्लागार म्हणून एकत्र काम करतो. त्यांचा माझ्यावर संशय होता तर त्यांनी थेट मला विचारायला हवे होते. जर हे तिघे घरावर पाळत ठेवण्यासाठी, रेकी करण्यासाठी आले असते तर त्यांनी स्वत:ची खरी ओळख उघड केली असती का? आज गुहागर तालुक्यात पर्यटन व्यवसाय वाढतोय. वेळणेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे. ठाकूर कुटुंब पर्यटन व्यवसायात आहेत, या पार्श्वभूमीवर तीन पर्यटकांना कोणतीही खातरजमा न करता पोलिस ठाण्यात नेल्याने पर्यटक व्यवसायावर परिणाम होईल, याचा विचार करायला हवा होता; परंतु दुर्दैवाने स्वार्थी राजकारणासाठी आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी नेत्राताई आणि आमदार जाधव यांनी तीन निरपराध पर्यटकांना नाहक त्रास दिला आहे. माझ्याकडे असंख्य लोक येतात. या तीन व्यक्ती कोण आहेत, त्याबद्दल मला पुसटशी कल्पनासुद्धा नाही. माझी बदनामी करून राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न होत आहे. याबाबत वकिलांशी सल्लामसलत करून अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.

चौकट
सहानुभूती मिळवायचा हा प्रयत्न
आम्ही करत असलेली कामे जनतेला समजत आहेत. गेल्या दोन वर्षात २२०० हून अधिक लोकांना त्यांचा पक्ष न पाहता आम्ही वैद्यकीय मदत केली आहे; परंतु यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. म्हणून असले आरोप करून सहानुभूती मिळवायचा हा प्रयत्न आहे. रेकी करणे, पाळत ठेवणे ही गुहागरची राजकीय संस्कृती नाही. यापुढे असले असभ्य राजकारण भाजपचे कार्यकर्ते सहन करणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com