वाफोलीत विजेचा खेळखंडोबा

वाफोलीत विजेचा खेळखंडोबा

Published on

13659
बांदा ः सहाय्यक अभियंता एस. आर. कोहळे यांना जाब विचारताना जावेद खतीब, उमेश शिरोडकर, विनेश गवस आदी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

वाफोलीत विजेचा खेळखंडोबा

महावितरणला घेराओ; वीज बील न भरण्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३ ः वाफोली गावात विजेच्या सातत्यपूर्ण खेळखंडोबाने त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज सकाळी बांदा महावितरण कार्यालयावर धडक दिली. विविध प्रश्नांची सरबत्ती करुन सहाय्यक अभियंता एस. आर. कोहळे यांना घेराओ घातला. महावितरण ओटवणे-बावळाट गावातील दुर्घनेच्या पुनरावृत्तीची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल केला. थातूरमातूर आश्वासने नको. प्रत्यक्ष कार्यवाही न केल्यास संपूर्ण गाव वीजबिले भरणार नाही. त्यानंतर वीज तोडण्याचा प्रयत्न झाल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा गर्भित इशारा यावेळी उपसरपंच विनेश गवस यांनी दिला.
वाफोली गावात सध्या विजेचा खेळखंडोबा झाला आहे. वारंवार वीज गायब होत असल्याने ग्रामस्थ अक्षरशः हैराण झाले आहेत. कोल्ड्रिंक व्यवसायिकांसह विद्यार्थी व महिलांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत स्तरावरुन वारंवार पाठपुरावा करुनही संबंधित अधिकारी कानाडोळा करीत असल्याने संतप्त वाफोली ग्रामस्थ व महिलांनी अखेर बांदा वीज कार्यालयात धडक दिली. वीज कर्मचारी फोन उचलत नाहीत. बेताल व अरेरावीची भाषा करीत असल्याची तक्रार महिलांनी केली. बांदा उपसरपंच जावेद खतीब यांनी जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत विजबिले भरणार नाही, असा इशारा दिला. वीज वाहिन्यांवरील झुडपांची सफाई केलेली नाही. बऱ्याच ठिकाणी वीजवाहिन्या तुटण्याच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे ओटवणे गावाप्रमाणे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात होणाऱ्या दुर्घटनेला महावितरण जबाबदार राहील. त्याआधीच योग्य उपाययोजना करा; अन्यथा परिणामांना सामोरे जा, असा इशारा सरपंच उमेश शिरोडकर यांनी दिला. यावेळी बांदा उपसरपंच जावेद खतीब, वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, शिल्पा गवस, करिश्मा गवस, यशश्री गवस, सुलोचना गवस, रिचा आंगचेकर, प्रांजल गवस, रमेश मेस्त्री, महेश गवस, महादेव गवस, अनिल गवस, शैलेश गवस, सचिन गवस आदी उपस्थित होते.
---------
चौकट
झुडपांची आजपासून सफाई
वीजवाहिन्यांवरील झुडपांची सफाई करण्याचे काम उद्यापासूनच (ता.४) हाती घेण्यात येईल, असे अभियंता कोहळे यांनी स्पष्ट केले. स्थानिक वायरमनलाही त्यांनी तंबी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.