मंडणगड ः कुठेही तक्रार करा सांगत प्रवाशांना दुरूत्तरे

मंडणगड ः कुठेही तक्रार करा सांगत प्रवाशांना दुरूत्तरे

rat६p९.jpg-M१४२५४ मंडणगड ः ठाणे गाडी न आल्याने वादविवाद झाल्याने मंडणगड बसस्थानकात झालेली गर्दी.

बसची चौकशी करणाऱ्या प्रवाशांना दुरूत्तरे

मंडणगड बसस्थानकातील प्रकार; अधिकाऱ्यांविरोधात प्रवाशांची तक्रार
मंडणगड, ता. ६ ः गाडी वेळेवर न लागल्याने विचारणा करण्यासाठी गेलेल्या प्रवाशाला दुरूत्तरे करत कुठेही तक्रार करा. माझं कोणीही काही वाकड करू शकत नाही, असे प्रतिउत्तर देणाऱ्या मंडणगड बसस्थानकातील अधिकाऱ्याविरोधात व्यवस्थापनाकडे लेखी तक्रार देण्यात आली आहे. मंडणगड आगारातून अनियमित आणि वेळेवर न सुटणाऱ्या गाड्यांमुळे प्रवासी वर्गात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
मंडणगड-ठाणे ही एसटी बस सकाळी साडेदहा वाजता सुटते. ५ जुलैला सकाळी अनेक प्रवासी तिष्ठत उभे होते. गाडीला विलंब होत असल्याने एसटीच्या अधिकाऱ्यांना विचारणा करण्यासाठी गेलेले प्रवासी दीपक गोरे यांना गाडी दहा मिनिटात येईल, असे उत्तर देण्यात आले. गोरे हे तीनवेळा नियंत्रण कक्षाजवळ जाऊन आले तरी त्यांना तेच उत्तर दिले गेले. दुपारी १ वाजून गेला तरी गाडी न सुटल्यामुळे गोरे नियंत्रण कक्षात विचारण्यासाठी गेले. तेथील अधिकाऱ्यांनी त्यांना योग्य उत्तरे दिली नाहीत. तसेच कुठेही तक्रार करायची ती करा, असेही सांगितले. त्यामुळे प्रवासी आक्रमक झाले. यावरून बसस्थानकात गदारोळ निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मंडणगड तालुकाप्रमुख संतोष गोवळे, उपतालुकाप्रमुख मंगेश दळवी, शहरप्रमुख दशरथ सापटे, सुरेश रसाळ, अमित चिले, समीर मुल्ला, साहिल शेख, कुणाल लिडकर यांनी स्थानकात येत माहिती घेत आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला. प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या एसटी प्रशासनाकडून अशी वागणूक मिळत असल्याने नाराजी व संताप व्यक्त करत आगार व्यवस्थापक हनुमंत फडतरे यांच्याकडे तक्रार दिली. त्यांना याबाबत कारवाई करावी, असे भेटून सांगण्यात आले. या वेळी व्यवस्थापकांसमोर संबधित अधिकाऱ्याने गाडी गॅरेजला असून दुरुस्तीचे काम होत असल्याचे सांगत आपण गैरवर्तन केले नाही असे सांगितले. तेथेही प्रवासी आणि संबधित अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. प्रवाशांनी लेखी तक्रार करत त्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली. या गोंधळानंतर ती गाडी दुपारी दीडनंतर सोडण्यात आली.

चौकट
लांब पल्ल्याच्या गाड्या वेळेत सुटत नाहीत
मागील काही महिन्यांपासून मंडणगड आगारातून सुटणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या वेळेत जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मुंबई, नालासोपारा या ठिकाणी गाड्या अपरात्री पोहचत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे; मात्र एसटी आगार व्यवस्थापनाकडे वारंवार याबाबत कळवून सुद्धा यावर कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने प्रवाशांनी खासगी वाहनांकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे भविष्यात आगाराने यावर योग्य कृती न केल्यास प्रवासीसंख्या घटण्याची शक्यता आहे, असे नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com