''केवायसी''च्या गुंत्यात पीएम किसानचे लाभार्थी

''केवायसी''च्या गुंत्यात पीएम किसानचे लाभार्थी

फोटो - M14323

‘केवायसी’ गुंत्यामुळे
८६ हजार जण अपात्र
पीएम किसानची सिंधुदुर्गातील स्थिती; ५८ हजार शेतकऱ्यांनाच तेरावा हप्ता
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ६ः केंद्राच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमध्ये जिल्ह्यात तब्बल १ लाख ४४ हजार पात्र लाभार्थी आहेत; मात्र केवळ ५८ हजार लाभार्थी शेतकऱ्यांना तेरावा हप्ता प्राप्त झाला आहे. उर्वरित ८६ हजार शेतकऱ्यांनी आधारकार्ड, पॅनकार्ड ऑनलाईन केवायसी पूर्ण न केल्याने या सन्मान योजनेपासून ते वंचित राहिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सन्मान निधी जमा केल्याने अनेक गरीब शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होऊ लागल्या आहेत. दरमहा ५०० पाचशे रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये थेट खात्यात जमा होत आहेत. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत असला तरी यामधील काही त्रुटी या शेतकऱ्यांच्या मुळावर आल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी किंवा शेतकरी नसलेल्यांनीही पहिल्या टप्प्यांमध्ये या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज सादर केले होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये बहुतांशी शेतकऱ्यांना किंवा ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती, अशा प्रत्येक लाभार्थीला शेतकरी सन्मान योजनेचे पाचशे रुपयेप्रमाणे रक्कम खात्यामध्ये जमा झाली. अनेकांनी त्याचा लाभही घेतला. परंतु, जसजशा त्रुटी लक्षात येऊ लागल्या तसतशा त्या दूर करण्यात आल्या. पहिल्या टप्प्यांमध्ये मर्यादेपेक्षा अधिक जमीन क्षेत्र असणाऱ्यांनाही किसान योजनेचा लाभ मिळाला होता. आता मात्र या योजनेच्या लाभार्थींची यादी अपडेट केली जात आहे. आता स्थानिक पोलीस स्टेशनचा दाखलाही अनिवार्य करण्यात आला आहे.
यंदा २७ फेब्रुवारीला तेरावा हप्ता जमा करण्यात आला. यात जिल्ह्यातील ५८ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. उर्वरित ८६ हजार शेतकरी केवायसी पूर्ण न केल्याने किंवा अन्य कारणाने त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही. ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण आहे आणि ते पात्र लाभार्थी असतील अशांना शिल्लक राहिलेल्या यादीतील टप्प्याटप्प्याने रक्कम खात्यामध्ये जमा केली जात आहे. मात्र, जे अपात्र लाभार्थी आहेत, त्यांची खाती बंद केली आहेत. या योजनेची केवायसी करत असताना लाभार्थी यादीतील शेतकरी हा भूमिहीन असला पाहिजे. एका कुटुंबातील एकाच लाभार्थीला त्याचा लाभ देण्यात येणार आहे. कोणत्याही संवेदानिक पदावर असलेला लाभार्थी येथे अपात्र होणार आहे. यादी अपडेट करून पॅनकार्ड, आधारकार्ड लिंक झाल्यामुळे अपात्र ठरलेल्यांची यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना २७ फेब्रुवारीला तेरावा हप्ता जमा झाला आहे, अशा शेतकऱ्यांना जुलैमध्ये चौदावा हप्ता जमा होणार आहे. उर्वरित पात्र यादीतील लाभार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने ही रक्कम जमा होणार आहे.

चौकट
हे आहेत अपात्र लाभार्थी
आजी-माजी आमदार, खासदार, लोकसभेचे सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष असे लाभार्थी अपात्र करण्यात आले आहेत. केंद्र किंवा राज्य शासनाची सेवानिवृत्त कर्मचारीही अपात्र आहेत. ज्या सेवानिवृत्त धारकांना दहा हजारपेक्षा जास्त पेन्शन आहे, अशांनाही या योजनेमध्ये अपात्र धरले जाणार आहे. लाभार्थी जर डॉक्टर, इंजिनियर, वकील, चार्टर्ड अकाउंट, आर्किटेक असेल तर तोही अपात्र ठरणार आहे. इन्कमटॅक्सधारक शेतकरीही आता अपात्र ठरणार आहे.

कोट
जिल्ह्यातील पात्र किंवा अपात्र ठरलेल्या लाभार्थीना आपली केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. त्याशिवाय या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेमध्ये अपात्र ठरलेल्या लाभार्थींच्या नावे किसान योजनेची रक्कम जमा झाली असली तरी त्यांच्याकडून ती वसुली केली जात आहे. यासाठी खातेदारांच्या बँकांना थेट पत्र देऊन त्यांच्या खात्यातील रक्कम परत घेतली जात आहे. तहसीलदारांमार्फतही नोटीस काढून वसुली सुरू आहे.
- प्रीतम माळी, पीएम किसान विभाग अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com