सदर ः कोकणातील देवराई

सदर ः कोकणातील देवराई

२९जून दैनिक पान ८ वरून लोगो घेणे व लेखक फोटो घेणे
जनरिती- भाती ः लोगो

फोटो ओळी
-rat५p५.jpg ः डॉ. विकास शंकर पाटील


कोकणातील देवराई

कोकणातील प्राचीन परंपरा आजही जीवापाड जपल्या गेल्या आहेत. कोकण जसे निसर्गसंपन्न आहे तसेच ते येथील जैवविविधतेने नटलेले आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यात असणारी वनराई आणि समुद्रकाठाला असणारी जंगले या निसर्गसौंदर्यात भर टाकत आली आहेत. दोन्ही ठिकाणची जंगले कायद्याने संरक्षित असली तरी तिथे मानवी हस्तक्षेप होताना दिसतो. अनेक ठिकाणी वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होते. तेथील जैवविविधतेला हानी पोहोचते. कोकणात जिथे झाडाचे पानही हलवले जात नाही, मानवी कायद्यापेक्षाही जिथे देवाचा कायदा चालतो असे ठिकाण म्हणजे येथील देवराई होय. मानवाने केलेले कडक कायदे मोडून आपल्या स्वार्थापोटी माणूस झाडे तोडून निसर्गाची मोठी हानी करतो; पण येथील देवाचा कायदा मात्र कोणीही मोडताना दिसत नाही. त्यामुळेच देवाच्या दारातील या वनराईला जणू अमरत्वच लाभले आहे.
डॉ. विकास पाटील
------

कोकणात आज देवराईंची संख्या मोठी आढळते. एका सर्वेक्षणात रत्नागिरी जिल्ह्यात १७३६ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४९५ इतक्या देवराईंची नोंद झाली आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारांच्या देवराईंचा समावेश आहे. गावाच्या मध्यावर असणाऱ्या, गावाच्या बाहेर असणाऱ्या, वेशीच्या बाहेर असणाऱ्या, समुद्रकाठाला असणाऱ्या देवराई अशा विविध देवराईंचा समावेश केलेला दिसतो. या देवराईंची लांबी अगदी छोट्या क्षेत्रफळापासून ते थेट एक हेक्टर ते १०० हेक्टरपर्यंत किंवा त्यापेक्षा मोठ्या क्षेत्रफळाच्या देवराईंचा समावेश असल्याचे दिसते. या देवराईत मानवी हस्तक्षेप कमी दिसतो. कोणतेही हत्यार घेऊन देवराईत प्रवेश करण्यास सक्त मनाई असते. देवराईबाहेरील लोकांना प्रवेश वर्ज्य आहे तर काही देवराईत चप्पल घालून प्रवेश करण्यास मनाई आहे. त्यामुळे मुक्तपणे संचार येथे करता येत नाही.
शूचिर्भूत होऊनच या वनराईत प्रवेश करावा लागतो. या वनराईतील एखादे वाळलेले लाकूड घ्यावयाचे असले तरी वा एखादे झाड तोडावयाचे असेल तर देवाचा कौल घेतला जातो आणि त्यानंतरच कारवाई केली जाते. त्यामुळे देवराईतील झाडावर सहजासहजी कुऱ्हाड चालवता येत नाही. देवाचा कोप होईल या भीतीपोटी येथील गवताची काडीही हलत नाही. त्यामुळेच या जंगलांचे संवर्धन होते. यामुळे जैवविविधतेचे संवर्धन होते. या देवराईनमध्ये कितीतरी गवताच्या जाती, कंदमुळे, लहान-मोठे वृक्ष, उक्षी, गारंबी, पळसवेलसारख्या वाढणाऱ्या वेली कितीतरी प्रकारचे लहान-मोठे कीटक, रंगीबेरंगी फुलपाखरे, प्रदेशनिहाय आढळणाऱ्या माशांच्या जाती, सरपटणारे प्राणी, दलदलित राहणारे प्राणी आणि कीटक, हिरडा, बेहडा, सर्पगंध, आवळा, गुळवेल, धायटी, मुरडशेंग, कुडा, खैर, चित्रगारंबी, बिब्बा, पळस, मोह, टेंभुर्णी, गेळ अशी एक ना अनेक वनस्पती देवराईत पाहायला मिळतात.
अनेक रानभाज्या देवराईमुळे अस्तित्वात आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी, झाडावर धरणारे शेवाळ, दगडफूल असे एक ना अनेक प्रकार देवराईत बहरतात. सर्व वनसंपदेमुळे जंगली पक्षी, शिकारी पक्षी, पाणथळीचे पक्षी, सूर्यपक्षी, बुलबूल, कुकू, धनेश, घुबडे, तांबट, कोतवाल, पोपट, साळुंक्या, तांबट, मलबारी, माडगरूड असे कितीतरी पक्षी देवराईत दिसतात. मानवी हस्तक्षेपविरहित ही जंगले असल्याने येथे प्राण्यांचा समृद्ध अधिवास दिसून येतो. देवराई हे गावचे फुप्फुस आहे. दापोली तालुक्यातील कुडावळी गावच्या शंभर एकरातील देवराईत ४०पेक्षा अधिक प्रजातींची फुलपाखरे, ७० पेक्षा अधिक प्रजातीच्या पक्ष्यांचा समावेश आहे. या देवराईत १०० फुटापेक्षा अधिक उंचीची झाडे आहेत. तिथे असणाऱ्या गार्बी नावाच्या वेलीस चार ते सहा फूट लांब शेंगा येतात. येथे नरक्या, ताम्हण, अमृता आधी तब्बल ४५२ प्रकारच्या प्रजातींची नोंद झाली आहे. या देवराईमुळे हवेत गारवा राहतो. त्यामुळे वातावरण नेहमी थंड राहते. गावातील वा गावाबाहेरील या वनराईंच्यामुळे जमिनीची धूप कमी होऊन पावसाचे प्रमाण ही योग्य राहते.
या देवराईंत असणाऱ्या जलस्रोतांना भरपूर पाणी असल्याचे दिसते. उन्हाळ्याच्या दिवसात ही जलस्रोते शुद्ध आणि निर्मळ पाणी देताना दिसतात. या जलस्रोतांना पाणी असल्यामुळे गावच्या विहिरींनाही पाणी भरपूर राहते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिवाळे आणि बांबर्डे गावाच्या हद्दीवर असलेल्या दुर्मिळ मायरिस्टिका स्वॅम्पची देवराई खूप जुनी मानली जाते. मायरिस्टिका स्वॅम्पचे महाराष्ट्रातील हे एकमेव जंगल असून, भारतात केवळ तीन राज्यात अशा प्रकारचे जंगल आढळते. या परिसंस्थेचे वय साधारण १४० दशलक्ष वर्षे इतके मानले आहे. ही जंगली जायफळाची बहुसंख्येने झाडे असलेली गोड्या पाण्यातील दुर्मिळ परिसंस्था आहे. परिसरातील स्थानिकांनी शतकानूशतके ही देवराई जपली आहे. यातील झाड शिमग्यासाठी, होळीसाठी पवित्र मानले जाते. वनराईंचे रक्षण व्हावे, या भूमिकेतूनच पूर्वजांनी देवराईची संकल्पना अस्तित्वात आणली असावी. पूर्वजांनी देवांची भीती घालून देवराईचे अस्तित्व जपल्यामुळे आज कितीतरी मोठा जैवविविधतेचा खजिना आपणा सर्वांनाच उपलब्ध झाला आहे. विकासाच्या नावाखाली आज मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असताना कोकणात मात्र देवाच्या भीतीने या देवराईंचे रक्षण झालेले दिसते. कोकणातील या देवराई म्हणजे आजच्या विज्ञानयुगातही जपले गेलेले सुसंस्कृतपण आहे.

(लेखक महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com