राजापुरात मध्यरात्री 2 दुकाने भस्मसात

राजापुरात मध्यरात्री 2 दुकाने भस्मसात

पान १ साठी

१४४१०
१४४११
१४४१२


राजापुरात दोन दुकाने भस्मसात
२५ लाखांची हानी; शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ६ ः बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास शहरातील मुख्य रस्त्यालगत राजापूर हायस्कूलनजीक असलेल्या पवार इलेक्ट्रॉनिक्स आणि ओम ऑनलाईन अँड अकाउंटिंग सर्व्हिसेस सेंटरला आकस्मिक लागली. शहरातील जागरूक नागरिक, नगर पालिकेचा अग्निशमन बंब याने महत्प्रयासाने आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, तत्पूर्वी भर पावसातही आगीच्या उसळलेल्या आगडोंबामध्ये ही दोन्ही दुकाने जळून खाक झाली आहेत. त्यामध्ये सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
राजापूरचे तलाठी संदीप कोकरे यांनी आज घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, पवार इलेक्ट्रॉनिक्सचे मालक संजय सदाशिव पवार यांचे इलेक्ट्रॉनिक्सचे साहित्य स्टेशनरी जळून सुमारे १८ लाख २६ हजार रुपये तर ओम ऑनलाईन आणि अकाउंटिंग सर्व्हिसेसचे मालक केदार नारायण साने व केतन नारायण साने यांचे संगणक व सर्व साहित्य जळून सुमारे ६ लाख १४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यात करण्यात आली, अशी माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली.
संजय पवार यांचे मुख्य रस्त्यावर राजापूर हायस्कूललगतच पवार इलेक्ट्रॉनिक्स हे इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाला लागूनच केदार व केतन साने बंधूंचे ओम ऑनलाईन अँड अकाउंटिंग सर्व्हिसेस सेंटरचे दुकान आहे. दीड-दोन वर्षांपूर्वीच आपल्या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. जोडव्यवसाय म्हणून पूजेचे साहित्यही ते विक्री करतात. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे पवार व साने आपली दुकाने बंद करून घरी गेले. साने हे दुकानाच्या लगतच राहतात तर पवार हे महामार्गावर गाडगीळवाडीनजीक राहतात. मध्यरात्री सव्वाच्या सुमारास त्यांना साने यांच्या दुकान व परिसरात आग लागल्याचा फोन आला असता तातडीने सौरभ हा आपल्या वडिलांसह दुकानाच्या ठिकाणी दाखल झाला; मात्र तोपर्यंत दुकान पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. दुकानात वह्या, पुस्तकांसह टीव्ही, फ्रीज व अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंनी पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला होता. तर, साने यांच्या दुकानानेही पेट घेतल्याने त्यांचेही साहित्य जळून खाक झाले होते.


आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची शर्थ
पालिकेचा अग्निशमन बंब दाखल होण्यापूर्वी कोठारकर बंधूंनी आपले पाण्याचे टँकर आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिस निरीक्षक भरत धुमाळ, माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे, डॉ. सागर पाटील, नगर पालिकेचे अविनाश नाईक, संजीव जाधव व कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक चालक रूपेश कणेरी यांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. आज दिवसभर अनेकांनी पवार व साने यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. दरम्यान, प्रशासनाकडून पंचनामा करून अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com