संगमेश्वर पोलिस निरीक्षकपदी सुरेश ठाकूर

संगमेश्वर पोलिस निरीक्षकपदी सुरेश ठाकूर

संगमेश्वर पोलिस निरीक्षकपदी सुरेश ठाकूर
संगमेश्वरः संगमेश्वर ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी सुरेश ठाकूर गावित यांची नियुक्ती केली आहे. नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला. या अगोदर पावस पोलिस ठाणे, बाणकोट पोलिस ठाणे येथे त्यांनी कारभार सांभाळलेला आहे. त्यांची संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. संगमेश्वर पत्रकारांच्यावतीने त्याची भेट घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. संगमेश्वर पोलीस ठाणे हद्दीत कायदा सुव्यवस्था राखली जाईल. स्थानिक पातळीवरील विविध समस्या स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी, व्यापारी आणि नागरिक यांच्या सहकार्यातून सोडवले जातील, असे त्यांनी सांगितले.
------
संगमेश्वरमधील एकाच
क्रॉसिंग पुलामुळे हाल
देवरूखः संगमेश्वर रेल्वेस्थानकाच्या समस्या सुटता सुटत नाहीत. या स्थानकावर दोन फलाट आहेत; मात्र पादचारी पूल एकच आहे. मुंबईहून येणाऱ्या रेल्वेने दुसरा फलाट पकडला तर प्रवाशांना एकच पादचारी पूल क्रॉसिंग करून मुख्य दरवाजापर्यंत येण्यास खूप त्रास होतो. पावसाळ्यात तर सामान घेऊन छत्री घेऊन तारेवरची कसरत करावी लागत आहे. मांडवी एक्स्प्रेसने प्रवास केलेले देवरूखचे प्रवासी सुरेंद्र शिंदे यांनी ही माहिती दिली. मुसळधार पाऊस आणि गाडी दोन नंबरला आल्यामुळे सर्व प्रवाशांची नेहमीप्रमाणे तारांबळ होते. देवरूख कनेक्शन एसटी गाडीही निघून जाते. स्लिपर बोगी इंजिनच्याजवळ असल्यामुळे रेल्वेपूल ओलांडून जाणे सर्व प्रवाशांना खूपच त्रासदायक होते. संगमेश्वर रेल्वेस्थानकाला एकच ब्रिज असल्यामुळे एक नंबर प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी प्रवाशांची खूपच दमछाक होते. वृद्ध आणि अपंग प्रवाशांना छत्री, बॅग व इतर सामान घेऊन हा दूरवर असणारा ब्रिज क्रॉसिंग करताना खूप हाल होत आहेत. कित्येक दिवस रेल्वे प्रवाशांची दोन रेल्वे ब्रिजची मागणी असूनही रेल्वे प्रशासनाने अद्याप विचार केलेला नाही. कोकण रेल्वे प्रशासनास नम्र विनंती आहे की, संगमेश्वर रेल्वेस्थानकावर उतरणाऱ्या प्रवासांची संख्या पाहता दोन क्रॉसिंग पुलांची अत्यंत आवश्यकता आहे जेणेकरून सर्व प्रवाशांचा त्रास संपुष्टात येईल.
-------
चित्रशाळेत बाप्पा आकार घेऊ लागले
संगमेश्वरः गणेशोत्सवाला अवघे काही महिने शिल्लक असताना अनेक चित्रशाळेत बाप्पांच्या मूर्तीवर रंगकाम करण्याची लगबग सुरू झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील लिंगायत बंधूंच्या चित्रशाळेतसुद्धा बाप्पा रूप धारण करू लागलेत. या शाळेत शाडूच्या मातीपासून ते पीओपीच्या मूर्ती मिळतात. शाडूमातीच्या मूर्तींची संख्या जास्त प्रमाणात आहे, असे उदय लिंगायत यांनी सांगितले. यंदा या चित्रशाळेत २५० मूर्ती आहेत. चित्रशाळेचे सर्वेसर्वा (कै.) शिवाजी लिंगायत यांच्या हस्तेकलेतून ही चित्रशाळा ७० वर्षापूर्वी सुरू झाली होती. गेल्या वर्षी गणपतीचे काम करताना वयाच्या ८७व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. या चित्रशाळेत मातीच्या मूर्ती घडवताना साच्याचा वापर केला जात नाही, हे वैशिष्ट्य आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी काही दिवस शिल्लक असताना ग्रामीण भागात गणेशभक्तांच्या सेवेसाठी २४ तास कार्यरत असते, ही लिंगायत बंधूंची चित्रशाळा यामध्ये उदय, उल्हास, उमेश यांची यामध्ये महत्वाची भूमिका आहे. उदय लिंगायत हे रत्नागिरीमध्ये शिर्के हायस्कूल येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते सुट्टीत आल्यावर गणपती बाप्पा काढण्यात मग्न होतात. प्रणय, प्रथमेश, विनय, हेमल हे सुद्धा कामात मग्न असतात. प्रथमेश हा कलाकार आहे. तो सध्या सावर्डे येथे शिल्पकला शिकत आहे. त्याने महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन २०२२ मध्ये पारितोषिक मिळवले आहे. वाडीतील सर्व माणसांचे सहकार्य या सर्वांना मिळते.
------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com