निकमांच्या निर्णयावर उघडउघड नाराजी व्यक्त

निकमांच्या निर्णयावर उघडउघड नाराजी व्यक्त

Published on

निकमांच्या निर्णयावर उघडउघड नाराजी
लियाकत शाह; चिपळूणचा नगराध्यक्ष, आमदारही महाविकास आघाडीचाच
चिपळूण, ता. ८ः राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून भाजपशी केलेली हातमिळवणी सर्वसामान्य नागरिकांना जराही रूचलेली नाही. भाजपच्या आरएसएस विचारसरणीच्या यज्ञात आमदार शेखर निकम यांनी उडी घ्यायला नको होती असे मत व्यक्त करत त्यांच्या या निर्णयावर अनेकजण उघडउघड नाराजी व्यक्त करू लागले आहेत. भाजपच्या या खेळीला महाविकास आघाडी पुरून उरेल. एवढेच नव्हे तर चिपळूणचा नगराध्यक्ष व आमदारही महाविकास आघाडीचाच असेल, असा विश्वास काँग्रेस शहराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चार दिवसांपूर्वी उभी फूट पडली असून, आमदार शेखर निकम हे अजितदादा पवारांच्या गटात गेले. या पार्श्वभूमीवर चिपळूण काँग्रेसचे शहराध्यक्ष शाह यांनीही जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, भाजप पक्ष हा आरएसएसच्या विचारसरणीने चालतो हे जगजाहीर आहे. अशी विचारसरणी सर्वसामान्य, बहुजन व अल्पसंख्याक समाजाला कायम घातक ठरली आहे. एक वेळ शिवसेना पक्ष चालेल; पण भाजप मुळीच नको, अशी सर्वसामान्यांची धारणा आहे. भाजपची ही घातक विचारसरणी रोखण्यासाठीच महाविकास आघाडीची जडणघडण झाली. महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने आघाडीला यश येत आहे व जनतेतूनही त्याला चांगली साथ मिळत आहे. चिपळूण मतदार संघातही असेच वाटले होते की, आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला मोठे यश येईल; परंतु एका चुकीच्या निर्णयामुळे आज त्यांनी वैयक्तिकच नव्हे तर पक्षातील कार्यकर्ता, पदाधिकारी व महाविकास आघाडीचेही नुकसान केले आहे. मुळात त्यांनी एवढा मोठा निर्णय घेताना पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना विचारात घ्यायला हवे होते. एवढेच नव्हे तर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचाही विचार करायला हवा होता. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसने निकम यांना खूप मोठी मदत केली होती. त्यांचा या निर्णयाचा महाविकास आघाडीला मुळीच धक्का बसणार नाही.

चौकट
वैयक्तिक नाही तर सार्वजनिक
आमदार हा वैयक्तिक नाही तर सार्वजनिक असतो तेव्हा त्यांनी सार्वजनिक जीवनातील हा निर्णय घेताना दहावेळा विचार करायला हवा होता. विकासनिधीसाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात असले तरी सर्वसामान्य नागरिकांनाही ते न पटणारे आहे. निधीपेक्षा सर्वसामान्यांना पटणारी विचारसरणी जपली पाहिजे. राजकारणात त्याचे प्रत्येकाने भान ठेवायला हवे, असे शाह यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.