जिल्ह्यात सरींवर सरी सुरूच

जिल्ह्यात सरींवर सरी सुरूच

14825
माडखोल ः रस्त्यावर पडलेली झाडे शनिवारी ग्रामस्थांनी हटवून वाहतूक सुरळीत केली.

जिल्ह्यात सरींवर सरी सुरूच
प्रकल्पात वाढला साठा; वेंगुर्ले-बेळगाव वाहतूक विस्कळीत
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ८ ः जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, आज सर्व भागांत सरींवर सरी कोसळत आहेत. सतत पडणाऱ्‍या पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम, लघु प्रकल्पांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे. नद्यांच्या पातळीतदेखील वाढ झाली असून, तेरेखोल नदी इशारा पातळीजवळ आहे. वेंगुर्ले-बेळगाव आंतरराज्य महामार्गावर माडखोल (ता. सावंतवाडी) मधील साबळे थांब्याजवळ तीन झाडे कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प होती.
जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी (ता. ६) झालेल्या वादळी पावसाने जिल्ह्यात ३० हून अधिक मालमत्तांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. शुक्रवारी (ता. ७) दिवसभर जोरदार पाऊस झाला. आज पहाटेपासून जिल्ह्याच्या सर्व भागांत जोर कायम होता. सर्वत्र सरींवर सरी कोसळत आहेत. परिणामी, जिल्ह्यातील मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये पाण्याचा संचय मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. देवगड तालुक्यातील कोर्ले सातेंडी मध्यम प्रकल्प पूर्ण भरला आहे. त्यातून विसर्गही सुरू झाला आहे. अरुणा मध्यम प्रकल्प आणि देवधर प्रकल्प देखील येत्या दोन दिवसांत पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अनेक लघुसिंचन प्रकल्पांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे.
दुसरीकडे नुकसानसत्रही सुरू आहे. वेंगुर्ले-बेळगाव मार्गावर तीन झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प होती. स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने तत्काळ तिन्ही झाडे हटवून पाऊण तासांत रस्ता वाहतुकीस खुला केला. जीवन केसरकर यांच्या घराजवळ तिन्ही झाडे दुपारी तीनच्या सुमारास कोसळली. त्यामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी जीवन केसरकर, विलास म्हापसेकर, गणपत घाडी, सोबीन मॅथ्यू, दत्ताराम केसरकर, भूषण घाडी यांनी कटरच्या साहाय्याने झाडे कापण्यास सुरुवात केली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने पाठविलेल्या जेसीबीच्या सहाय्याने महामार्गावरील झाडे दूर करण्यात आली. पाऊण तासानंतर महामार्ग वाहतुकीस खुला झाला. स्थानिकांच्या तत्परतेबाबत वाहनचालकांसह प्रवाशांनी त्यांचे कौतुक केले.
दरम्यान, जिल्ह्यात गेले चार-पाच दिवस सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्‍यांमध्ये मात्र समाधानाचे वातावरण आहे. जिल्ह्यात भातरोप पुनर्लागवडीला पोषक पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्‍यांकडून जलदगतीने भातरोप लागवड केली जात आहे.

ऑरेंज अलर्ट कायम
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुन्हा आज जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com