साडवली-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा

साडवली-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा

कोंडगावमधील विंधन विहीर
वाचविण्याची गरज
साडवली ः संगमेश्वर तालुक्यातील साखरपा कोंडगाव या गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोत असलेली विंधन विहीर रस्ता रूंदीकरणात नामशेष होणार आहे. ही विंधन विहीर वाचली पाहिजे यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत. यावर कोंडगावमधील डाफळेवाडी, वाणेवाडी व दळवीवाडी अशा तीन वाड्या पाणी पिण्यासाठी वापरतात तसेच आजूबाजूचे संगमेश्वर तालुक्यातील काही गावे एप्रिल-मेच्या दरम्यान पाण्याची कमतरता असताना या बोरिंगचे पाणी वापरण्याकरिता टँकरद्वारे घेऊन जातात. त्यामुळे कोंडगाव व आजूबाजूच्या गावांना कधी पाण्याची कमतरता किंवा दुष्काळ पडला नाही. या बोरिंगला २८-३० वर्ष झाली; पण बोरिंगचे पाणी कधी बंद किवा आटले नाही. त्यामुळे या गावांना कधी पाण्याकडून त्रास नाही झाला; पण आता काही दिवसात या गावांना पाण्याकडून कमतरता पडणार आहे. कारण, कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्याचे रूंदीकरण होत आहे. या रूंदीकरणात कोंडगाव पिण्याच्या पाण्याची बोरिंग जात आहे. त्यामुळे त्या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी ही बोरिंग काढावी लागत आहे. त्यावर पर्यायी दुसरी बोरिंग दुसऱ्या ठिकाणी गावात काढून देत आहेत; पण जसं या बोरिंगला पाणी आहे तसं दुसऱ्या बोरिंगला पाणी लागेल का? लागले तर गावातील ५०-६० घरांना पाणी पुरेल का, असे प्रश्न उभे राहतात.

कबड्डीदिनानिमित्त १५ जुलैला
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा
साडवली ः लाल मातीतल्या कबड्डी खेळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देणारे कोकणचे सुपुत्र कबड्डी महर्षी बुवा साळवी यांच्या स्मरणार्थ १५ जुलै हा दिवस कबड्डी दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त संगमेश्वर तालुक्यातील देवरूखमधील नाद ग्रुपच्यावतीने १५ जुलैला तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. संगमेश्वर तालुका कबड्डी असोसिएशन सहकार्य करणार आहे. या स्पर्धा मीनाताई ठाकरे क्रीडासंकूल साडवली येथे पार पडणार असून, जुन्याजाणत्या ज्येष्ठ कबड्डी खेळाडूंच्या हस्ते स्पर्धेचे सायं. ५ वा. उद्घाटन होणार आहे. या वेळी ज्यांनी तालुक्यात कबड्डी रूजवली आणि वाढवली असे जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक, कबड्डीप्रेमी, क्रीडा पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पंच वर्षानुवर्षे कबड्डी स्पर्धा घेत आहेत. अशी मंडळे यांचा सन्मान केला जाणार आहे. स्पर्धेला उपस्थित राहावे, असे आवाहन सागर शेट्ये, योगेश कांगणे यांनी केले आहे.


देवरूख तहसीलकडून दाखले मिळण्यास विलंब
साडवली ः देवरूख तहसील कार्यालयाकडून मुलांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असणारे उत्पन्न, नॉन क्रिमिलेअर यासारखे विविध प्रकारचे दाखले मिळण्यास विलंब होत असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकवर्गामध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शासन एकीकडे गतिमान प्रशासन असल्याचा दावा करत आहे; मात्र देवरूख तहसील कार्यालयाकडून महिना महिना कालावधी लोटला तरी आवश्यक दाखले मिळत नाहीत. पालक, विद्यार्थीवर्ग नायब तहसीलदार यांच्या दालनाचे उंबरठे झिजवत आहेत. काही दाखल्यांसाठी ऑडिट लागले तर संबंधित अर्जदाराला कल्पना दिली जात नाही. जून महिना सुरू झाला की, शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थीवर्गाला विविध दाखले लागतात तसेच आता विविध पदासाठी शासकीय नोकरभरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे विविध दाखले मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक ग्रामस्थ देवरूख तहसील कार्यालय, सेतू कार्यालयात गर्दी करत आहेत; मात्र दाखले मिळण्यास प्रचंड विलंब होत असल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com