नारुरमध्ये आढळला ‘ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक’

नारुरमध्ये आढळला ‘ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक’

Published on

15302
नारुर ः रांगणागड येथे दुर्मिळ आणि बिनविषारी जातीचा ‘शेवाळी पाणसाप’ आढळून आला. (छायाचित्र ः अजय सावंत)


नारुरमध्ये आढळला ‘ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक’

दुर्मिळ पाणसाप; रांगणागडावर अस्तित्व असल्याचे ठळक

कुडाळ, ता. १० ः नारुर (ता.कुडाळ) येथील रांगणागड येथे दुर्मिळ आणि बिनविषारी साप काही प्राणीमित्रांना आढळला. ‘ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक’ (रॅबडॉप्स एक्वाटिकस) म्हणजेच ‘शेवाळी पाणसाप’ असे त्याचे नाव आहे. प्राणीमित्र अनिल गावडे, वन्यजीव अभ्यासक गौतम कदम, वैभव अमृस्कर, दिवाकर बांबार्डेकर, प्रसाद गावडे, ओमकार गावडे, शुभम फाटक यांना बुधवारी (ता. ४) रात्री ट्रेकिंग दरम्यान प्रथमच हा साप आढळला.
रांगणागड समुद्रसपाटीपासून जवळपास ६७९ मीटर उंचीवर आहे. पश्चिम घाटात सापडणाऱ्या बऱ्याच सापांच्या जाती रांगणागड परिसरात तसेच पायथ्याला असलेल्या नारुर गावात आढळून येतात. त्यात अजून एक दुर्मिळ बिनविषारी साप शेवाळी पाणसापाची समुद्रीसपाटीपासून २१७ मीटर उंचीवर संशोधकांमार्फत प्रथमच नोंद केली आहे.
शेवाळी पाणसाप हा मध्यम आकाराचा असून तो समुद्रसपाटीपासून ७५० ते १००० मीटर उंचीवर सापडतो. हा साप जवळपास ९४ से.मी.पर्यंत वाढू शकतो. त्याचे शरीर मध्यम-बारीक आणि समान चमकदार खवल्यांनी आच्छादलेले असते. डोके मानेपेक्षा किंचित वेगळे, तर डोळे मध्यम आकाराचे असतात. पृष्ठभागाचा रंग हिरवा, तपकिरी, शेवाळी असतो. मुख्यत्वे हा साप पाण्याच्या ठिकाणी आढळतो, म्हणूनच याला ‘शेवाळी पाणसाप’ असे म्हटले जाते. या सापाच्या संपूर्ण शरीरावर दोन्ही बाजूंना काळ्या रंगाच्या ठिपक्यांची रांग असते. पोट आणि शेपटीकडील खवल्यांना मध्यभागी काळ्या रंगाच्या विस्तृत पट्ट्या असतात. हा साप हा निशाचर आणि जलचर आहे. पठार, सदाहरित जंगलांच्या मध्यम उंचीच्या पाण्याच्या प्रवाहात तो आढळतो. मासे, बेडूक आणि कृमी हे त्याचे प्रमुख भक्ष्य आहेत. हा साप अंडप्रजक असून शांत आणि लाजाळू स्वभावाचा असतो. आपल्या भक्ष्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्राण्यावर तो सहजासहजी हल्ला करत नाही. आंबोलीमधून सर्वप्रथम या सापाचा शोध लागला. संशोधकांनी त्याला पाण्यात राहणारा साप म्हणून ‘एक्वाटिकस’ असे नामकरण केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.