मुलींच्या सैनिक स्कूलसाठी प्रयत्न

मुलींच्या सैनिक स्कूलसाठी प्रयत्न

Published on

swt११४.jpg
M१५३९८
आंबोलीः शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा सत्कार करताना सुनील राऊळ व अन्य.

मुलींच्या सैनिक स्कूलसाठी प्रयत्न
मंत्री दीपक केसरकरः आंबोलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः जिल्ह्यात आंबोलीचे सैनिक स्कूल यशस्वीपणे सुरू आहे. त्याच धर्तीवर मुलींचे निवासी सैनिक स्कूल सुरू करण्याची मागणी केली जात आहे. या मागणीचे स्वागत करून शासन पातळीवर निर्णय घेण्यासाठी निश्चितच विचार केला जाईल, असा विश्वास शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांनी काल (ता. १०) आंबोली सैनिक स्कूलला भेट दिली. यावेळी त्यांचे सैनिक स्कूल संस्थेचे सेक्रेटरी सुनील राऊळ यांच्यासह विद्यार्थ्यांनी स्वागत केले. यावेळी कोल्हापूर नियोजन मंडळाचे सदस्य अमित कामत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, सैनिक पतसंस्था चेअरमन बाबुराव कविटकर, दीपक राऊळ, जॉय डान्टस, पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले, "सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली सैनिक स्कूल शिस्तबद्ध पद्धतीने काम करत आहे. ब्रिगेडियर सुधीर सावंत हे सैनिक व माजी सैनिकांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मलाही ते भेटतात. आंबोली सैनिक निवासी स्कूलमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात. याप्रमाणेच मुलींसाठी निवासी सैनिक स्कूल सुरू करण्याची मागणी केली जात आहे. सध्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत. त्यामुळे या मागणीचा प्राधान्याने विचार केला जाईल."
ते पुढे म्हणाले, "देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या सैनिकांप्रति प्रत्येकाच्या मनात आदरभाव आहे. सैनिक शाळेत शिस्त, कवायती, खेळ अशा व्यक्तिमत्व विकास साधणाऱ्या विविध प्रकारच्या शिक्षणाला गती देण्याचा प्रयत्न केला जातो. सर्वच मुले शिक्षण घेतल्यानंतर सैन्यात जातील असे नाही; पण या प्रशिक्षणामुळे जीवनाला दिशा, वेगळी उर्जा मिळते. यातून देशाचा यशस्वी, सक्षम नागरिक बनून सेवा देण्यासाठी निश्चित प्रयत्न करता येतील."
यावेळी शिक्षणमंत्री केसरकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विचारपूस केली. सुनील राऊळ यांनी स्वागत करून मंत्री केसरकर यांचा सत्कार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.