निमजगा शाळा इमारत धोकादायक

निमजगा शाळा इमारत धोकादायक

Published on

15535
बांदा ः विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर यांना निवेदन देताना रियाज खान. सोबत शिवसेनेचे पदाधिकारी व पालक. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

निमजगा शाळा इमारत धोकादायक

बांद्यात प्रशासन धारेवर; शाळा बंद करण्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ११ ः शहरातील निमजगा येथील जिल्हा परिषदेची शाळा इमारत मोडकळीस आली असून केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे. जीर्ण इमारतीमुळे मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने आज शिवसेनेचे सावंतवाडी तालुका अल्पसंख्याक उपाध्यक्ष रियाज खान यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व पालकांनी शाळेत धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी शाळेच्या इमारतीचे निर्लेखन झाले असून आठ दिवसांत काम सुरू होणार असल्याचे आश्वासन विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर व केंद्रप्रमुख संदीप गवस यांनी दिले.
निमजगा पूर्ण प्राथमिक शाळेत सद्यस्थितीत ४० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या मुख्य इमारतीचे छप्पर व इमारत जीर्ण झाल्याने ठिकठिकाणी मोडकळीस आली आहे. अनेक ठिकाणी कौलारू छप्पर कोसळले आहे. शाळेच्या मधल्या सुटीत मुले या ठिकाणी खेळत असल्याने इमारत कोसळून दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण?, असा प्रश्न खान यांनी उपस्थित केला. तातडीने शाळेचे काम न केल्यास शाळा बंद करण्याचा इशाराही देण्यात आला. याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी मंथन गवस, संजय आईर, अमोल धुरी, रामदास सावंत, राजा खान, धर्मा राठोड, बाबुराव शेटकर, मोहसीन खान, उमेश शेटकर, सुभाष नाईक, संदेश उरुमकर, मुख्याध्यापक प्राजक्ता राऊळ आदी उपस्थित होते.
................
कोट
आतापर्यंत जीर्ण इमारतीच्या निर्लेखनसाठी पाच वेळा शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत ठराव घेण्यात आला. प्रस्ताव शासन दरबारी मंजूर झाला असून येत्या आठ दिवसांत काम सुरू होणार आहे. यासाठी पालक व स्थानिकांनी सहकार्य करावे.
- दुर्वा साळगावकर, विस्तार अधिकारी
................
कोट
शाळेची इमारत धोकादायक बनली असून याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होणार आहे. मडुरा येथे शाळेचे छप्पर कोसळण्याची घटना घडल्याने प्रशासनाने या ठिकाणी दुर्घटनेची वाट न पाहता मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लवकरात लवकर कार्यवाही करावी; अन्यथा शाळा बंद आंदोलन छेडावे लागेल.
- रियाज खान, तालुका उपाध्यक्ष, अल्पसंख्यांक सेल, शिवसेना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.