पालकमंत्र्यांनाच आला ढिसाळ यंत्रणेचा अनुभव

पालकमंत्र्यांनाच आला ढिसाळ यंत्रणेचा अनुभव

Published on

19007
सिंधुदुर्गनगरी ः येथे आढावा बैठकीवेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर.

पालकमंत्र्यांनाच आला ढिसाळ यंत्रणेचा अनुभव

आपत्ती व्यवस्थापन; झाड पडल्याने ताफा मागे परतवण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २६ ः जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन किती निद्रिस्त आहे, याचा अनुभव आज खुद्द पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतला. केसरी येथील आपल्या निवासस्थानाकडून सिंधुदुर्गनगरी येथे अतिवृष्टी आढावा बैठकीला येत असताना रस्त्यात झाड पडल्याने त्यांना पुन्हा मागे जात सिंधुदुर्गनगरीत यावे लागले. यामुळे संतापलेल्या मंत्री चव्हाण यांनी आढावा बैठकीत माझ्यासारख्या व्हीआयपीला अशी सेवा मिळत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना कशाप्रकारे तत्परता दाखविली जात असेल, याचा प्रत्यय आल्याचे सांगत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची चांगलीच खरडपट्टी केली.
यामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. पालकमंत्री चव्हाण सावंतवाडी केसरीहून जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरीकडे येत असता मार्गावर भले मोठे झाड कोसळले होते. यामुळे पालकमंत्र्यांना बैठकीसाठी येण्यासाठी तब्बल १५ मिनिटे उशीर झाला. यामुळे पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत व्हीआयपीची व्याख्या काय? असा प्रश्न विचारला. जर माझाच ताफा अडत असेल तर तुम्ही सर्वसामान्यांना काय सुविधा देणार? असा प्रश्‍न उपस्थित करत आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यांनी आज जिल्ह्यातील पूर परिस्थिती, दरड प्रवण क्षेत्र, पूर बाधित भात शेती, रस्ते आरोग्य, व आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे उपस्थित होते.
जिल्ह्यात मागील आठवडाभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे, या पाश्र्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण फारच आक्रमक पाहायला मिळाले. चक्क बैठकीला पंधरा मिनिटे उशीर झाल्याने आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना धारेवर धरत व्हीआयपीची व्याख्या काय? असा प्रश्न विचारला. माझा ताफा पाच किलोमीटर पुढे जाऊन पुन्हा मागे येत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना काय सुविधा देणार?, असा प्रश्नही उपस्थित करत यापुढे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर पडलेल्या झाडामुळे, रस्त्यावर पडलेल्या मातीमुळे कोणताही त्रास होणार नाही. त्यांना कोणताही आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही याची काळजी घ्या, असे आदेश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ही आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे. तरी नागरिकांनी नदीच्या तसेच लहान लहान ओढ्याच्या पात्रात जाऊ नये. प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. पुलावरून पाणी जात असल्यास तेथील वाहतूक वळवावी आणि तशा सूचना नागरिकांना द्याव्यात. पावसानंतर निर्माण होणाऱ्या साथींच्या रोगांचा विचार करता आवश्यक औषधांचा पुरवठा करुन साथींच्या रोगांवर नियंत्रण मिळवा. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची देखील तपासणी करावी. तिलारी धरणाच्या परिसरातील गावांमध्ये यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवा. नागरिकांना नेहमी सूचना देत रहा. आंबोली परिसरात अनेक ठिकाणांहून पर्यटक येत असतात, त्यांना खबरदारीविषयी जागृत करा. डोंगरी भागात राहणाऱ्या नागरिकांनी दक्ष राहावे. काही अडचण आल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा व प्रशासनाने देखील कायम अलर्ट मोडवर राहुन पूरस्थितीचा मुकाबला करावा.’’
---------
चौकट
तिलारीच्या काठावरील आठ गावांना धोका
बैठकीच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी पूरस्थिती आणि करण्यात आलेल्या उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती दिली. तिलारी धरणातून पाणी पातळीचा अंदाज घेऊन विसर्ग सुरू आहे. परिसरातील ८ गावांना अधिक धोका असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज आहे. धरणातून विसर्ग सुरू होण्यापूर्वी संवेदनशील गावांमध्ये ग्रामस्थ व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. दरडप्रवण क्षेत्रात विशेष दक्षता घेण्यात येत आहे. तसे सूचना फलक देखील लावण्यात आले आहेत. नुकसान भरपाईबाबत अनुदानाचे वाटप करण्‍यात आले असून परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.
--
मुख्यालय सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई
सध्याची परिस्थिती हाताळण्यामध्ये सर्व यंत्रणांची भूमिका महत्वाची आहे. सर्वांनी मुख्यालयातच राहावे. आपत्ती लक्षात घेता कोणीही आपल्या कामात निष्काळजीपणा करु नये अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.