हुमरमळ्यात अधिकारी उतरले बांधावर

हुमरमळ्यात अधिकारी उतरले बांधावर

19072
हुमरमळा-अणाव ः पंचायत समिती कुडाळच्या ‘चिखलधुणी’ या अभिनव उपक्रमात शेत नांगरणी करताना सीईओ प्रजित नायर. शेजारी गटविकास अधिकारी विजय चव्हाण.
19073
हुमरमळा-अणाव ः ट्रॅक्टर चालविताना आयएएस अधिकारी करिश्मा नायर. (छायाचित्रे ः अजय सावंत)


‘धरणी आईची माया, कशी जाईल वाया?’

हुमरमळ्यातील ‘चिखलधुणी’; विविध गीते गात अधिकारी उतरले बांधावर


सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ ः सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसात ‘जीवाचा मैयतर ढवळ्या न पवळ्या’, ‘धरणी आईची माया, कशी जाईल वाया’, ‘आम्ही जातीचे शेतकरी, खातो कष्टाची भाकरी’, अशी विविध शेतकरी गीते, ओव्या गात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्यासह इतर अधिकारी शेतकरी वेशात बांधावर उतरले. कुडाळ पंचायत समितीच्या ‘मेरी मिट्टी मेरा देश’, या मॉन्सून महोत्सवांतर्गत ‘चिखलधुणी’ या अभिनवात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नांगरणीसह इतर शेतीकामांचा आनंद लुटला.
जिल्ह्यात प्रथमच हा उपक्रम आज अणाव-हुमरमळा येथे राबविण्यात आला. दोन कोपऱ्यांमध्ये जोत बांधून पारंपरिक शेती व आधुनिक पद्धतीने लागवड करण्यात आली. मातीपासून दूर गेलेल्या तरुण पिढीची पुन्हा मातीशी नाळ जोडली जावी, हा या उपक्रमाचा हेतू होता. हुमरमळा ग्रामपंचायत मालकीच्या दोन हेक्टर जागेत विविध १५० वनौषधींची लागवड करत जिल्ह्यातील पहिला प्रकल्प साकारण्यात आला. त्याचबरोबर नरेगा अंतर्गत बांबू व फळ लागवड करून अशा विविध उपक्रमांनी ‘चिखलधुणी’ साजरी करण्यात आली.
कुडाळ पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘चिखलधुणी’ हा उपक्रम न्हानू पालव यांच्या शेतावर राबविण्यात आला. उपक्रम राबविताना पावसानेही तेवढीच दमदार साथ दिली. हुमरमळा ग्रामपंचायतीच्या प्रांगणात या सोहळ्याचा दिमाखात प्रारंभ झाला. यावेळी आयएएस अधिकारी करिश्मा नायर, विशाल खत्री, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, विशाल तनपुरे, विनायक ठाकूर, गटविकास अधिकारी चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, भूपतसेन सावंत, अमरसेन सावंत, जयभारत पालव, जान्हवी पालव, पांडुरंग पालव, कृषी अधिकारी बाळकृष्ण परब, प्रफुल्ल वालावलकर, मिलिंद नाईक, राजन परब, संदेश किंजवडेकर, विस्तार अधिकारी रामचंद्र जंगले, कक्ष अधिकारी मृणाल कार्लेकर, गीता चेंदवणकर, धनश्री परब, समीरा केरकर, गणेश राठोड, महादेव खरात, प्रशासक संदेश परब, कांचन कदम आदी उपस्थित होते.
..............
चौकट
चिमुकल्यांचाही उत्स्फूर्त सहभाग
या अभिनव उपक्रमांतर्गत अणाव-हुमरमळा शाळेच्या चिमुकल्यांनी शेतकरी वेशात नृत्याविष्कार करत सर्वांना मंत्रमुग्ध केले. पणदूर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य करत रॅली काढली. ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘जय जवान जय किसान’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मान्यवरांच्या हस्ते वनौषधींची लागवड करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी डोक्यावर खाबले, हिरला, नांगर, बैलजोडी घेत शेतनांगरणी व लावणीचा आनंद लुटला. गावातील माजी सैनिक, शेतकरी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत सोनू पालव आणि त्यांची पत्नी श्वेता पालव यांनी म्हटलेल्या ‘जीवाचा मैतर ढवळ्या न पवळ्या’ या गाण्याने झाली.
.................
चौकट
तरुण पिढीने शेतीकडे वळावे
भारत हा शेतीप्रधान देश आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आपण कृषी क्षेत्रात सुधारित कृषी तंत्रज्ञान, संशोधन आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणांचा वापर करून क्रांती केली आहे. उच्ज पदस्थ अधिकारी बनण्याच्या प्रयत्नांत आजची तरुण पिढी शेतीपासून लांब जात आहे. तरुण पिढीला शेतीची आवड निर्माण होण्यासाठी जागृतीची गरज आहे. तरुणांना शेतीकडे आकृष्ट करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे यावेळी गटविकास अधिकारी चव्हाण यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com