वादळग्रस्तांसाठी ७१ लाख मंजूर

वादळग्रस्तांसाठी ७१ लाख मंजूर

Published on

वादळग्रस्तांसाठी ७१ लाख मंजूर

विशेष अर्थसाहाय्य; जिल्ह्यातील ८२५ मच्छीमारांना फायदा

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २६ ः जिल्ह्यातील सागरी मच्छीमारांना ‘क्यार’ व ‘महा’ या चक्रीवादळांमुळे पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आली नसल्याने विशेष आर्थिक साहाय्य योजनेअंतर्गत एकूण ८२५ लाभार्थ्यांना ७१ लाख १० हजार रुपये वाटपास मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हा लाभार्थी निवड आणि वितरण समितीच्या नुकत्याच झालेल्या अकराव्या सभेत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार सहकारी संस्था फेडरेशनचे अध्यक्ष तथा समितीचे अशासकीय सदस्य मेघनाद धुरी यांनी दिली.
या बैठकीत रापण संघातील ७५ सभासदांना प्रत्येकी १० हजार रुपये याप्रमाणे ७ लाख ५० हजार, बिगर यांत्रिक नौकाधारक ३२ मच्छीमारांना प्रत्येकी २० हजारप्रमाणे ६ लाख ४० हजार, एक ते दोन सिलिंडर यंत्रनौकाधारक २२ सदस्यांना प्रत्येकी २० हजार रुपये याप्रमाणे ४ लाख ४० हजार रुपये, तीन ते चार सिलिंडर यंत्रनौकाधारक ११ लाभार्थ्यांना प्रत्येकी ३० हजार रुपयांप्रमाणे ३ लाख ३० हजार, सहा सिलिंडर नौकाधारक ३५ लाभार्थ्यांना प्रत्येकी ३० हजार रुपयांप्रमाणे १० लाख ५० हजार रुपये, तर लहान मासळी विक्रेत्या मच्छीमारांना ५० लिटर क्षमतेच्या दोन शीतपेट्या पुरवठा करण्यासाठी ६ हजार रुपयांच्या योजनेअंतर्गत ६५० लाभार्थ्यांना ३९ लाख रुपये आर्थिक साहाय्य मंजूर केले आहे. लवकरच हे अनुदान संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे धुरी यांनी सांगितले. आतापर्यंत जिल्ह्यातील रापण संघांमधील ४३३० लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ४१७१ लाभार्थ्यांच्या खाती रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित १५९ अधिकचे ७५ अशा एकूण २३४ अतिरिक्त लाभार्थ्यांसाठी २३ लाख ४० हजार एवढा निधी वितरण करण्यास शासनाने परवानगी द्यावी, असा प्रस्ताव मत्स्य विभागामार्फत सादर करण्यात आल्याची माहिती धुरी यांनी दिली.
ट्रॉलिंग मासेमारी करणाऱ्या नौकांनी आपल्या जाळ्यांना लाकडीऐवजी फायबरचे पाट बसवावेत, असे आवाहन मत्स्य विभागामार्फत करण्यात आले आहे. फायबर पाटांसाठी येणारा खर्च जवळपास ४० हजार रुपये आहे. त्यामुळे शासनाने सिंधुरत्न योजनेअंतर्गत हे फायबर पाट खरेदीसाठी अनुदान द्यावे, अशी आमची मागणी आहे. मासे साठवणुकीसाठी जिल्ह्यात सोलर फ्रीजचा वापर सुरू झाला आहे. सोलर फ्रीज खरेदीवरही शासनाने सिंधुरत्न योजनेअंतर्गत लाभ द्यावा, असे निवेदन फेडरेशनतर्फे दिल्याचे धुरी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.