कोयनेच्या वीजनिर्मितीवर मर्यादा तरीही चिपळूणला पूर

कोयनेच्या वीजनिर्मितीवर मर्यादा तरीही चिपळूणला पूर

rat२६p५६.jpg ः
M१९०८९
चिपळूणः सह्याद्रीच्या खोऱ्यातून येणारे पावसाचे पाणी अडवण्याचे काम कोळकेवाडी धरण करत असले तरी चिपळूणच्या पुराला याच धरणाला जबाबदार धरले जाते.

मर्यादित वीजनिर्मिती तरीही चिपळुणात पूर
कोळकेवाडीच्या पाण्यावर मर्यादा; इतर कारणांचा शोध आवश्यक
चिपळूण, ता. २६ः परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पूर आल्याची ओरड केली जाते. यावर्षी हवामानखात्याने चिपळूण परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवल्यानंतर कोयना प्रकल्पातून होणाऱ्या वीजनिर्मितीवर मर्यादा आणण्यात आली. त्यानंतरही चिपळूणमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे चिपळूणमध्ये पूर आल्यास कोळकेवाडी धरणाला जबाबदार धरणे किती योग्य आहे, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
चिपळूणमध्ये दरवर्षी पूर येतो आणि या पुराला कोळकेवाडी धरणातील पाणी जबाबदार असल्याची ओरड केली जाते. वास्तविक कोयना प्रकल्पात टप्पा १, २ आणि ४ मध्ये वीजनिर्मिती झाल्यानंतरचे पाणी थेट वाशिष्ठी नदीत न सोडता कोळकेवाडी धरणात आणले जाते. कोळकेवाडी धरणाच्या पायथ्याशी तिसरा टप्पा आहे. तेथे वीजनिर्मिती करून हे पाणी चिपळूणच्या दिशेने सोडले जाते. अतिवृष्टीच्या काळात कोळकेवाडी धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडल्याचा प्रकार एकदाही घडलेला नाही. चिपळूणच्या पूर्व विभागात सह्याद्रीचे चार खोरे आहेत. यातील कोळकेवाडीच्या खोऱ्यातील पाणीही याच धरणात साठवले जाते. म्हणजेच कोळकेवाडी धरणामुळे कोयनेकडून येणारे पाणी आणि सह्याद्रीच्या खोऱ्यातून येणारे पाणी अडवले जाते. या पाण्याची गती मंदावते. वीजनिर्मितीनंतर हे पाणी चिपळूणच्या दिशेने सोडले जाते; मात्र २०२१ मध्ये शहरात महापूर आला तेव्हा कोळकेवाडी धरणाच्या पाण्यामुळे महापूर आल्याची ओरड झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत या विषयाची तक्रार झाल्यानंतर मंत्री पवार यांनी कोळकेवाडी धरणाच्या पाण्याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली. या समितीनेही स्थानिकांचा आरोप फेटाळला. त्यानंतरही कोळकेवाडी धरणाच्या पाण्यावर होणारे आरोप सुरू आहेत; मात्र कोयना प्रकल्पातून मागील दहा दिवसात सुरू असलेल्या वीजनिर्मितीचा विचार करता कोळकेवाडी धरणाच्या पाण्यामुळे पूर येत नाही, हे स्पष्ट होते.
चिपळूण परिसरात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामानखात्याने दिल्यानंतर कोयनेच्या वीजनिर्मितीवर मर्यादा आणण्याची शिफारस मोडक समितीने केली होती. यानुसार १५ जुलैपासून कोयनेची वीजनिर्मिती टप्पा आहे. प्रकल्पाची एकूण वीजनिर्मितीची क्षमता १९६० मेगावॅट आहे. प्रकल्पाचा पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा २४ तास तर चौथा टप्पा मागणीच्यावेळी चालवला जातो; मात्र सध्या हा प्रकल्प २४ तासाऐवजी केवळ मागणीच्या काळात एक तास चालवला जात आहे. त्यामुळे कोयनेतून कोळकेवाडी धरणात येणाऱ्या पाण्यावर पूर्णपणे मर्यादा आली आहे तरीही चिपळूण शहरात १९ जुलैपासून सतत पाणी भरत आहे.

कोट
चिपळूणला अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यानंतर कोयना प्रकल्पातील वीजनिर्मितीवर मर्यादा आणण्याची सूचना मोडक समितीने केली होती. त्याची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. कोयना प्रकल्पातील वीजनिर्मिती सध्या ठप्प आहे. आम्ही कोळकेवाडी धरणाचे दरवाजे उघडून चिपळूणच्या दिशेने पाणी सोडत नाही. धरणात येणाऱ्या पाण्याची आकडेवारी आम्ही तर तासाला चिपळूणच्या प्रशासनाला कळवत आहोत.
- दीपक गायकवाड, उपअभियंता कोळकेवाडी धरण व्यवस्थापन विभाग अलोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com