मधली तोंडवळीला उधाणाचा तडाखा

मधली तोंडवळीला उधाणाचा तडाखा

19140
तोंडवळी ः मधली-तोंडवळी येथे लाटांच्या तडाख्यामुळे अशाप्रकारे धूप होत आहे.
19141
तोंडवळी ः उधाणामुळे मधली-तोंडवळी येथील जेटीचा पाया उद्‌ध्वस्त झाला आहे.

मधली तोंडवळीला उधाणाचा तडाखा
जेटी धोक्यात; जमीनही होत आहे गिळंकृत
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २६ ः सततचा पाऊस आणि समुद्राला आलेल्या उधाणाचा जोर वाढल्याचा फटका मधली तोंडवळीला बसला. तेथील किनारी बंधारा नसलेल्या भागात मोठ्या प्रमाणात धूप होऊन समुद्राने भूभाग गिळंकृत केला आहे. दोन दिवसांच्या उधाणामुळे बाळा पेडणेकर यांचे घर, विलास झाड यांचे घर धोक्यात आले आहे. याच भागात दोन वर्षांपूर्वी गणेश पाटील यांच्या रिसॉर्टजवळ बांधण्यात आलेला जेटीचा पाया उद्‌ध्वस्त झाला असून जेटी वाहून जाण्याच्या मार्गावर आहे.
मधली-तोंडवळी येथे वेगाने येणाऱ्या उधाणाच्या लाटांच्या माऱ्यांमुळे किनाऱ्यालगतच असलेली सुरूची झाडे, माड बागायत नष्ट होत आहे. पतन विभागाने बांधलेली जेटीही वाहून जाण्याच्या स्थितीत आहे. स्थानिक गणेश पाटील यांनी त्यांची जमीन वाचवण्यासाठी, धूप थांबवण्यासाठी ओंडके, दगड टाकून प्रयत्नही केले; परंतु, उधाणाच्या तीव्रतेपुढे केलेल्या उपाययोजना निष्फळ ठरत आहेत. बंधारा नसलेल्या भागात मोठ्या प्रमाणात धूप झाली असून समुद्राने भूभाग गिळंकृत केला आहे. गेले दोन दिवस झालेल्या उधाणामुळे बाळा पेडणेकर यांचे घर ते विलास झाड यांचे घर हा पट्टा धोक्यात आला आहे. या भागासाठी संरक्षक बंधारा मंजूर असल्याचे सांगण्यात येत असून इतकी वर्षे उलटूनही आम्ही बांधाऱ्याच्या प्रतीक्षेत आहोत, असे ग्रामस्थांनी सांगितले. पौर्णिमेपर्यंत उधाणाचा जोर अजून वाढणार असून, समुद्राचे पाणीही वस्तीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. उधाणाचा जोर कायम राहिल्यास मोठी धूप होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली. उधाणाचा धोका लक्षात घेऊन तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर, माजी सरपंच आबा कांदाळकर, शेखर तोंडवळकर, गणेश पाटील, नाना पाटील, ग्रामसेवक विधी चव्हाण हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com