सावंतवाडी तालुक्यात पडझड

सावंतवाडी तालुक्यात पडझड

Published on

19176
सावंतवाडी ः जूनी पंचायत समितीच्या मागील भागात असलेली जांभ्या दगडाची संरक्षक भिंत कोसळली.

सावंतवाडी तालुक्यात पडझड

प्रशासनाकडून दखल; मुसळधार पाऊस सुरूच

सावंतवाडी, ता. २६ ः तालुक्यात काल (ता.२५) काही प्रमाणात विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पहाटेपासूनच पुन्हा एकदा जोरदार सुरुवात केली. पावसाच्या या थैमानामुळे पडझडीच्या घटना सुरूच आहेत.
तालुक्यात आज कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात पडझड झाली. यात आज पहाटे आरोंदा येथील कोशेसाव फर्नाडिस यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून नुकसान झाले. फर्नांडिस हे कामानिमित्त मुंबईला असतात. मात्र, या घरात काही भाडेकरू राहत होते. स्लॅबचे घर असल्यामुळे कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. मात्र, घराच्या सज्जाचे व इतर भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीचा पंचनामा करण्यात येणार असल्याची माहिती आरोंदा ग्रामसेवक सतीश राणे यांनी दिली. सावंतवाडी जूनी पंचायत समितीच्या मागील भागात असलेली जांभ्या दगडाची संरक्षक भिंत कोसळली असून ती हटवण्याचे काम सुरू आहे. शहरातील गांधी चौक येथे संजू पोकळे यांच्या दुकानासमोर मोठा खड्डा पडला. त्या ठिकाणी मोरी आहे. त्यामुळे रस्त्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तूर्तास त्या ठिकाणी बॅरिकेट लावण्यात आले आहेत. मात्र, रात्रीच्या अपघात होण्याची शक्यता नाकारता असल्याने पालिका प्रशासनाने याबाबत त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. कोलगाव-निरुखेवाडीत रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळल्याने
वाहतुकीचा मार्ग बंद झाला आहे. याबाबतची माहिती सामाजिक बांधिलकीला संघटेनला प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर सामाजिक बांधिलकीची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव, संजय पेडणेकर, श्याम हळदणकर व सुजय सावंत यांनी झाड तोडून हटवण्यास मदत केली. परंतु, झाड खूप मोठे असल्या कारणाने सामाजिक कार्यकर्ते महेंद्र सांगेलकर यांनी संकेत मुंडये यांच्या मालकीचा जेसीबी मागवून आणल्यानंतर हे मोठे झाड रस्त्यावरून बाजूला करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी महेश अरवारी, जगदीश दूधवाडकर यांनी रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. ग्रामस्थ बाबा शिंदे, मोहन ठाकूर व विजय बहादूर यांनीही रस्त्यावरील झाड हटवण्याच्या कामी मदत केली. वाफोली येथे बागायतीचे नुकसान झाले आहे.
-------------
19177
वायंगणी ः महादेव सावंत यांना ग्रामपंचायततर्फे मदत सुपूर्द करताना सरपंच रुपेश पाटकर व सदस्य.

घराची भिंत कोसळून
वायंगणीत नुकसान
आचरा, ता. २६ ः गेले काही दिवस आचरा पंचक्रोशीत मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. वायंगणी- तळेकरवाडी येथील महादेव नारायण सावंत यांच्या घराची मातीची भिंत व छप्पर कोसळली. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच वायंगणी पोलिस पाटील सुनील त्रिंबककर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यात सावंत यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. सावंत हे वयोवृद्ध असून, एकटेच असतात. वायंगणी सरपंच रुपेश पाटकर, सदस्य श्रीकृष्ण वायंगणकर, सचिन रेडकर, प्रमोद सावंत, नाना सावंत यांनी नुकसानीची पाहणी करून सावंत यांना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनमधून रोख रक्कम मदत म्हणून दिली.
..................
19156
वाडा ः येथे घराजवळील संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाले.

मुसळधार पावसामुळे
देवगडात लाखोंची हानी
देवगड, ता. २६ ः तालुक्याच्या किनारी भागात पावसाची झोड कायम आहे. सततच्या पावसामुळे वाडा भागात पडझड झाली. वार्‍याने शेतघराचे पत्रे उडून जाण्याबरोबरच एका घराजवळील संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाल्याची माहिती येथील महसूल यंत्रणेकडून देण्यात आली. गेले काही दिवस किनारी भागात पावसाचा जोर कायम आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. चोवीस तासांत आज सकाळपर्यंत येथे ५५ मिलीमीटर इतका पाऊस झाला. सततचा पाऊस आणि वारा यामुळे वाडा भागातील एका शेतमांगराचे पत्रे उडून सुमारे १५ हजाराचे नुकसान झाले. राहत्या घराजवळील संरक्षक भिंत कोसळून सुमारे १ लाख १० हजाराचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली. नुकसानीची पाहणी महसूल यंत्रणेने केली. दरम्यान, येथील साटमवाडी भागात झाड कोसळून परिसरातील घरांचे व दुचाकीचे नुकसान झाले.
.................
19158
देऊळवाडा ः येथील राघो भोगले यांच्या मांगराची भिंत कोसळून नुकसान झाले.
19159
देऊळवाडा ः अंजली तांबे यांच्या मांगराची भिंत कोसळून नुकसान झाले.

देऊळवाडा येथे पडझड
मालवण, ता. २६ ः गेले काही दिवस कोसळणाऱ्या पावसाचा जोर आज सायंकाळी काहीसा ओसरला असल्याचे दिसून आले. मात्र, सकाळी पडलेल्या रस्त्यामुळे बसस्थानक परिसरातील दुकाने, घरात पाणी घुसले. शहरातील अन्य ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले होते. पावसामुळे शहरात, परिसरात वित्तहानीच्या घटना घडल्या आहेत. यात देऊळवाडा येथील राघो भोगले यांच्या मांगराची एका बाजूची भिंत कोसळून सुमारे ८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अंजली तांबे यांच्या मांगराची भिंत कोसळून ४ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्षातून देण्यात आली.
-----------
डिगस नदीपात्रात
म्हैस गेली वाहून
कुडाळ, ता. २६ ः तालुक्यात आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डिगस येथील राजाराम खांडेकर यांची म्हैस नदीपात्रात उतरल्याने वाहून गेली. पाण्याचा प्रवाह जास्त प्रमाणात असल्यामुळे तीला वाचविण्यास यश आले नाही. मात्र, काही अंतरावर जाऊन ती मृत झाली.
डिगस-गोरीवली वाडीतील शेतकरी खांडेकर यांनी आपली गुरे सकाळी १० च्या सुमारास पिठढवळ नदीकिनारी चरविण्यासाठी सोडली होती. बाजूला असलेल्या नदीपात्रात म्हैस उतरल्याने ती वाहून जाऊ लागली. खांडेकर यांनी आरडा ओरडा केला. काही अंतर पुढे जाऊन पाहिले असता ती एका झाडाला अडकलेली दिसली. त्यानंतर म्हैसीला ग्रामस्थांनी नदीतून वर काढले. मात्र, ती मृत पावली होती. यामुळे खांडेकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.