लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळक

२६ (टुडे पान २ साठी, सदरासारखे घ्यावे.)

लोकमान्य टिळक पुण्यतिथी--लोगो

---------

-rat३१p२६.jpg-
२३M२०१५१
लोकमान्य टिळक जन्मभूमी स्मारक

रत्नागिरीचे टिळक आणि टिळकांची रत्नागिरी

- अॅड. विलास पाटणे

चिखलगांव (ता. दापोली) हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे मूळ गाव. चिखलगाव हे कोकणामधील सृष्टीसौंदर्याने नटलेले छोटसं गाव. टिळकांच्या अनेक पिढ्या खोती सांभाळत. या गावात सुखनैव नांदल्या. टिळकांचे वडील गंगाधरपंत दापोलीत राहात असत. इंग्रजी शिक्षणासाठी ते पुण्यास गेले; परंतु कौटुंबिक आपत्तीमुळे शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी शाळा खात्यात नोकरी धरली.
गंगाधरपंतांना प्रारंभी ५ रुपयाची नोकरी होती. पुढे गंगाधरपंताची चिपळूण व रत्नागिरी येथे बदली झाली. रत्नागिरीत डॉ. रामकृष्ण भांडारकर व गंगाधरपंत यांचा संस्कृत भाषेच्या आवडीमुळे स्नेह जुळून आला. गंगाधरपंत रत्नागिरीला असता त्या वेळच्या कलेक्टर क्रॉफर्डसाहेबांनी काढलेल्या सुतारकामाच्या कारखान्यात गंगाधरपंतांनी पैसे गुंतवले.
रत्नागिरी येथील टिळकआळीतील सदोबा गोरे यांच्या घरात लोकमान्य टिळकांचा २३ जुलै १८५६ ला जन्म झाला. १८६६ मध्ये पुण्यास जाईपर्यंत टिळक या घरात राहिले. १८६१ ला टिळक दसऱ्याच्या मुहूर्तावर शाळेत जायला लागले. बहुदा याच शाळेत मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले टाकणार नाही, ही प्रसिद्ध घटना घडली असावी. टिळकांचे पहिले शिक्षक भिकाजी कृष्ण पटवर्धन होत. टिळकांची मुंज रत्नागिरीतच झाली, नंतर टिळकांच्या वडिलांची बदली असिस्टंट एज्युकेशन ऑफिसर म्हणून पुण्यास झाली. टिळक नंतर पुन्हा रत्नागिरीत आल्याचा संदर्भ सापडत नाही.
गंगाधरपंत यांनी कलेक्टर क्रॉफर्डसाहेबांच्या सुतारकामाच्या कारखान्यात गुंतवलेल्या हजार रुपयांच्या चार वर्षाच्या व्याजाच्या रकमेची मागणी टिळकांच्या लग्नाच्या खर्चाकरीता पत्र लिहून केली होती. पैसा हाती आल्याशिवाय लग्नाची तयारी व ठराव करता येत नाही, असा पत्रात उल्लेख सापडतो. टिळक इंग्रजी शाळेत पुण्यास शिकत असता १८७१ च्या वैशाखात त्यांचे लग्न चिखलगावात झाले. टिळकांच्या जीवनात आयुष्यभर व्रतस्थ सहचरणी म्हणून राहिलेल्या सत्यभामाबाई टिळक मंडालेच्या तुरुंगात असताना जून १९१२ मध्ये निवर्तल्या. पतीची कधीकाळी भेट होईल, या वाझोंट्या आशेवर जगलेल्या पत्नीचे देहावसान झाले. ही तार टिळकांच्या हाती पडली आणि तो धैर्याचा महामेरू गलबलून गेला.
संपूर्ण आयुष्यात टिळक चिखलगावात ४/८ दिवस राहिले असतील. १८८९ ला टिळक गावी गेले होते. १८९४ ला दापोली कोर्टात झालेल्या वाटपाच्या एका दाव्यात टिळकांना सामील प्रतिवादी व्हावे लागले. अखेर वाटपाचा निवाडा होऊन खुद्द टिळकांच्या वाट्याला आलेली जमीन त्यांनी कुलदैवत लक्ष्मीकेशव यास अर्पण केली.
प्रचंड ज्ञानलालसा, दुर्दम्य ध्येयवाद, सखोल चिंतन, अखंड कर्मयोग, आव्हानांना सामोरे जाण्याचे अजोड सामर्थ्य यातूनच टिळकांचे लोकभिमुख नेतृत्व विकसित झाले. देशाला स्वराज्याचा मूलमंत्र देणारे, असंतोषाचे जनक, काव्यात गणित आहे असे मानणारे, राष्ट्रीय अस्मितेचा तेज:पुंज आविष्कार असलेल्या टिळकांनी आयुष्यभर देशाची सेवा करत मुंबईच्या सरदारगृहात १ ऑगस्ट १९२० ला त्यांनी आपला देह ठेवला. इंग्रज सरकारच्या गुप्तचर खात्याने इंग्लंडला सांकेतिक भाषेत निरोप पाठवला. ''''नंबर वन नो मोअर!''''
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com