ओटवणेवासीयांचा महावितरणला घेराओ

ओटवणेवासीयांचा महावितरणला घेराओ

20177
सावंतवाडी ः ओटवणे ग्रामस्थांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.


ओटवणेवासीयांचा महावितरणला घेराओ

वीज वाहिनीचे काम रखडल्याने नाराजी; सावंतवाडीत अधिकारी धारेवर


सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ ः ओटवणे गावाला इन्सुलीऐवजी सावंतवाडी शहरातील फिडरवरून वीजपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी आज तेथील ग्रामस्थांनी येथील वीज अधिकाऱ्यांना घेराओ घातला. या वीज वाहिनीचे काम पूर्ण झाले आहे; मात्र वन विभागाने आडकाठी घेतल्यामुळे अडीचशे मीटरचे काम रेंगाळले आहे. त्यामुळे चतुर्थीपूर्वी काम पूर्ण करा; अन्यथा पुन्हा आंदोलन उभारले जाईल, असा इशारा यावेळी ग्रामस्थांकडून देण्यात आला.
ओटवणे गावाला सद्यस्थितीत इन्सुली फिडरवरून वीजपुरवठा करण्यात येतो; मात्र गेली अनेक वर्षे झाडे पडणे, तारा तुटणे अशा घटनांमुळे त्या भागात समस्या निर्माण होत असल्यामुळे वीजपुरवठा सावंतवाडीतून देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. त्यानुसार सावंतवाडीहून ओटवणे गावाकडे जाणाऱ्या वीज वाहिन्या उभारण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत हे काम भूमिगत करण्यात आले आहे; परंतु घाट परिसरात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटकाव केल्यामुळे हे काम रेंगाळले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, प्रशासन वेळ खाऊ धोरण घेत आहेत. त्यामुळे हे काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही. याबाबत जाब विचारण्यासाठी आज ग्रामस्थांनी वीज अधिकाऱ्यांना घेराव घातला. गणेश चतुर्थीपूर्वी काम पूर्ण करा; अन्यथा पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी सावंतवाडी वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण, सहाय्यक अभियंता परब, कनिष्ठ अभियंता आर. आर. मोरे यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. यावेळी ओटवणे उपसरपंच संतोष कासकर, उमेश म्हापसेकर, सगुण गावकर, जयगणेश गावकर, संतोष भैरवकर, संतोष तावडे, अमेय गावडे, विनायक वर्णेकर, नीलेश माटेकर, पंकज गावकर, रामदास गावकर, अनंत तावडे, पंकज गावकर, सत्यवान गावकर, स्वप्नील म्हापसेकर, प्रमोद केळुस्कर, किरण गावकर, ज्ञानेश्वर गावकर, अमित गावकर, रवींद्र गावकर, ओमकार गावकर, रामदास गावकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
---
चौकट
अधिकारी मागण्यांबाबत सकारात्मक
दरम्यान, यावेळी वीज अधिकारी चव्हाण यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली. लोकांची मागणी लक्षात घेता वन अधिकारी आणि वीज अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करून वीजपुरवठा गणेश चतुर्थीपूर्वी देण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com