‘फेरफार’चे माहिती देणारे परीपत्रक
swt७१२.jpg
3M21720
विनोद दळवी
‘फेरफार’चे माहिती देणारे परीपत्रक
अलीकडे ग्रामपंचायत नमुना नंबर आठमध्ये इमारती किंवा जागेच्या नोंदी फेरफार करताना, दुरुस्ती करताना अर्धवट माहितीच्या आधारे किंवा चुकीच्या पद्धतीने केले जातात. त्याचा त्रास प्रशासनाला सहन करावा लागतो. यात अन्याय झालेली व्यक्ती न्याय मिळण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेते. यासाठी आंदोलने, उपोषणे छेडली जातात. त्यामुळे भविष्यात असे प्रकार घडू नयेत, या प्रक्रियेत पूर्ण जिल्ह्यात सुसंगतपणा आणि एकसूत्रता यावी, यासाठी फेरफार कार्यपद्धती व यासाठी आवश्यक कागदपत्र याची माहिती देणारे परीपत्रक जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना काढले आहे.
- विनोद दळवी
----------
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १२४ व महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (शुल्क) नियम १९६० व त्या अनुषंगाने इतर नियम अटींच्या तरतुदीनुसार ग्रामपंचायत हद्दीतील इमारती मोकळ्या, पडसर जागा व जमिनीवर कर आकारणी करण्यात येते. या आकारणीच्या अनुषंगाने करपात्र इमारतींच्या नोंदी ग्रामपंचायततीकडील घरपत्रक म्हणजेच नमुना नंबर आठमध्ये आकारणी यादीमध्ये करण्यात येते. घरपत्रक नमुना नंबर आठ म्हणजे इमारती व मोकळ्या जागेची आकारणी यादी असेसमेंट लिस्ट आहे. कोणत्या व्यक्तीकडून अशी कर व वसुली करावी याची यादी आहे. हा अभिलेख मालकी हक्क दर्शविणारा अभिलेख नसून करार पात्र असणाऱ्या इमारती व मोकळ्या जागा याची यादी आहे. ग्रामपंचायती अंतर्गत इमारती नोंदीमध्ये फेरफार फेरबदल दुरुस्ती करताना नियमाप्रमाणे कायदेशीर यथोचित कार्यपद्धती अवलंबली जात असते. एखाद्या व्यक्तीने संस्थेने अथवा अन्य कोणीही नोंदीसाठी, नोंदणीतील फेरफार यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज केल्यानंतर किमान आवश्यकता कागदपत्रांची पडताळणी केली जाते. मात्र, अलीकडे घाई गडबडीने अत्यंत चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर नोंदीची प्रक्रिया करण्यात येते. कोणतेही ठोस कारण अथवा कायदेशीर कारण न देता नोंद करण्यास टाळाटाळ करण्यात येते. ग्रामपंचायतच्या परस्पर, मंजुरी न घेता, योग्य ते ग्रामपंचायत ठराव विहित मार्गाने पारित न करताच मिळकत मालकाचे नाव बदलणे, मूळ मालकी असलेल्या मालकाची पूर्वपरवानगी न घेता नोंदीमध्ये बदल करणे, शासनाच्या मालकीच्या मोकळ्या, खुल्या, पडसर जागा अनधिकृतपणे नोंदी करणे, नोंदी, फेरफार करताना विहित कालावधीची जाहीर नोटीस प्रसिद्ध न करणे अथवा काही वेळेस घेतलेल्या संबंधितांच्या हरकतीचा विचार न करता नोंदी करणे इत्यादी प्रकार निदर्शनास आलेले आहेत. अशाप्रकारे चुकीच्या नोंदी फेरफारमध्ये झाल्याने याबाबत तक्रार निर्माण होते. त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील प्रशासनाचा वेळ वाया जातो. काही प्रकरणी तक्रारदार आंदोलने, आमरण उपोषण, आत्मदहन व अन्य मार्गाचा वापर करून जिल्हा प्रशासनाकडे दाद मागत असतो. केवळ ग्रामपंचायत स्तरावर या नोंदणीची कायदेशीर प्रक्रिया न राबविल्याने या सर्व बाबी घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. आकारणी यादी मधील मालकी हक्कांमध्ये सुधारणा करण्यासाठी करावयाच्या कार्यवाही बदल महाराष्ट्र ग्रामपंचायत कर, शुल्क नियम १९६० भाग २ इमारती व जमिनी यावरील कर यातील पोट नियम १६ अ अन्वय मिळकतीचे मालकीचे हस्तांतरणाची नोटीस पंचायतीला देणे आणि आकारणी यादीत सुधारणा करणे तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग कडील शासन निर्णय क्रमांक एसटीपी- २१८९ प्र क्र ६७३/भाग-२/म-१ मंत्रालय. २ डिसेंबर १९८९ अन्वये नोंदणी न केलेले दस्तऐवज हस्तांतरणाचा ग्राह्य पुरावा होऊ शकत नाही, असे नमूद आहे. त्यास अनुसरून वरील बाबी टाळण्यासाठी विविध स्तरावरील प्रकरणाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि सर्वच ग्रामपंचायतींमध्ये सुसंगतपणा व एकसूत्रता राहण्यासाठी ग्रामपंचायतीने नवीन इमारतीच्या नोंदणी करताना, मूळ नोंदीमध्ये फेरबदल, फेरफार करताना अंमलात आणावयाच्या कार्यपद्धतीबाबत या परिपत्रकाद्वारे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
सर्वसाधारणपणे इमारतीच्या मालकी हक्काचा फेरफार हा मूळ इमारतीचा मालक मृत झाल्यास वारसा हक्काने, इमारत विक्री केल्यास अथवा इमारतीच्या मालकाचे नोंदणीकृत हस्तांतरण, खरेदीखत, बक्षिसपत्र, दानपत्र असल्यास तसेच न्यायालयाचे एखाद्या मालमत्तेबाबत आदेश असल्यास केला जातो. इमारतीच्या कोणत्याही प्रकारचा फेरफार बदल करण्यासाठी संबंधित व्यक्तीकडून अथवा संस्थेकडून लेखी अर्ज प्राप्त झाल्यानंतरच ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी हा अर्ज नजीकच्या मासिक सभेत ठेवतात. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी हा अर्ज कशा पद्धतीने स्विकारावा. अर्ज मासिक सभेत ठेवण्यापूर्वी अर्ज नियमात आहे की नाही? याची खातरजमा कशी करावी? पुरेसा पुरावा नसताना अर्ज आल्यास कोणती पद्धत अवलंबावी? ठोस पुरावे नसताना मासिक सभेत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी तो मंजूर केल्यास ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी आपले मत कशा पद्धतीने मांडावे? त्यानंतर हा ठराव सात दिवसांच्या आत गटविकास अधिकारी यांच्याकडे का पाठवावा ? याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन १७ मुद्द्यांद्वारे या परिपत्रकात केले आहे.
चौकट
आवश्यक दस्तऐवज
ग्रामपंचायतींना काढण्यात आलेल्या परिपत्रकात फेरफार पद्धती आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्र याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार इमारत मालकाचा मृत्यू झाल्यावर फेरफार करताना इमारत मालकाचा मृत्यू दाखला ज्याच्या नावे फेरफार करावयाचा आहे. त्याचा वारस दाखला उदाहरणार्थ गाव नमुना नंबर सहा, न्यायालयाकडील वारस दाखला, तहसीलदार यांच्याकडील वारस दाखला घेणे आवश्यक आहे. सह हिस्सेदारांचे हक्कसोड प्रमाणपत्र आवश्यक आहे. इमारतीची खरेदी विक्री झाल्यास तसेच बक्षीसपत्र, दानपत्र, मृत्युपत्र सादर केल्यानंतर फेरफारमध्ये नोंद करण्यापूर्वी खरेदीखत पत्र प्रत, बक्षीसपत्र प्रत, दानपत्र प्रत, मृत्युपत्र प्रत घेणे आवश्यक आहे. न्यायालयाच्या आदेशाने फेरफार करावयाचा असल्यास सक्षम न्यायालयाच्या आदेशाची प्रत घेणे बंधनकारक आहे, असे ग्रामपंचायतीना कळविण्यात आले आहे.
कोट
सातबारा उतारा, आठ अ उतारा, प्रॉपर्टी कार्डचा उतारा व नकाशा, नोंदणीकृत खरेदीपत्र, इंडेक्स उतारा, दानपत्र, नोंदणीकृत संमतीपत्र, नोंदणीकृत हक्कसोड पत्र, लिज-मॉर्गेज पत्र, लायसेन्स करारनामा, शासनाकडून जागावाटप केलेले आदेश, कब्जेपट्टी, जागेचा अधिकृत नकाशा, वारसपत्र इत्यादी कागदपत्रांची अथवा इतर आवश्यक कायदेशीर कागदपत्रांची सकृत दर्शनी शहानिशा करण्यात येत नाही. याबाबतीत दस्तऐवजांच्या मूळ प्रतींची पडताळणी केली जात नाही. त्यामुळे या चुकीच्या पद्धती बदल होऊन योग्य व कायदेशीर पद्धतीचा अवलंब व्हावा, याकरिता परिपत्रकाद्वारे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना मार्गदर्शन केले आहे.
- विशाल तनपुरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.