मळगावात पंचमुखी नागोबाचे पूजन

मळगावात पंचमुखी नागोबाचे पूजन

24761
मळगाव : येथील गोसावी यांनी पूजन केलेली पंचमुखी नागाची मूर्ती.


मळगावात पंचमुखी नागोबाचे पूजन

दीड दिवसांचा उत्सव; गोसावी कुटुंबीयांची अनोखी परंपरा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ ः दीड, पाच, सात, नऊ आणि अकरा दिवसांचा गणपती आपल्याला माहीत आहे; मात्र सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्यात दीड दिवस नागोबाचे पूजन करून नागपंचमी साजरी करण्याची अनोखी परंपरा आजही सुरू आहे. मळगाव-रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात गेली दोनशेहूनही अधिक वर्षे ही दीड दिवसांची नागपंचमी साजरी होत आहे. विशेष म्हणजे हा दीड दिवसांचा नागोबा पाच फणांचा असतो.
श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमीला विशेष ओळख आहे. पारंपरिक सण-उत्सवातील धार्मिकता जोपासणारा व प्राणीमात्रांविषयी प्रेमभावना, निसर्ग संवर्धन आणि सामाजिक एकोपा निर्माण करणारा सण म्हणूनही नागपंचमी या सणाकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांचा मित्र समजल्या जाणाऱ्या नागाची विधीवत पूजा करून नागपंचमी साजरी केली जाते. मातीच्या नाग प्रतिमेचे पूजन करून तिला लाह्या व दुधाचा नैवेद्य दाखविला जातो. सकाळी मूर्ती आणून सायंकाळी पाचच्या सुमारास अळवाच्या पानावर विसर्जन केले जाते; मात्र मळगाव-रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात दीड दिवस पाच फणांच्या नागोबाचे मूर्तीपूजन करून नागपंचमी साजरी करण्यात येते. वडिलोपार्जित चालत आलेली ही परंपरा (कै.) शांताराम बंडू गोसावी व (कै.) रामचंद्र बंडू गोसावी यांच्यानंतर त्यांची मुले धर्मनाथ गोसावी, संजय गोसावी, सतीश रामचंद्र गोसावी, चंद्रकांत बाबी गोसावी व त्यांचे कुटुंब जतन करत आहेत.
नागपंचमीच्या पूर्वसंध्येला ब्राह्मण भोजन व एकादशमी केली जाते. यावेळी कुलदेवतेची पूजा करण्यात येते. नागपंचमीला सकाळी नागाची मूर्ती आणून ती आकर्षकरित्या सजविण्यात येते. दरवर्षी विविध प्रकारचे सादर देखावे केले जातात. त्यानंतर नागोबाचे विधीवत पूजन करण्यात येते. दुसऱ्या दिवशी सकाळी व दुपारी नागाला करंज्यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. सायंकाळी अळवाच्या पानात नागाचे विसर्जन केले जाते. विसर्जनानंतर शेगलाची भाजी व भाकरी असा प्रसाद वाटला जातो.
----
अळवाच्या पानात होते विसर्जन
दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपंचमीला सकाळी नागाची मूर्ती आणून ती सजविण्यात आली. त्यानंतर नागोबाचे विधीवत पूजन करण्यात आले. दूध व लाह्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. दुपारी गोसावी घराण्यातील महिलांचा ‘व्हवसा’, सायंकाळी भजन, फुगड्या आदी कार्यक्रम होणार आहेत. यंदा नागासोबत वारुळाचा देखावा करण्यात आला आहे. मळगाव व पंचक्रोशीतील भाविकांनी सकाळपासून दर्शन घेण्यास सुरुवात केली. उद्या (ता. २२) नागोबाचे पारंपरिक पद्धतीने ढोलताशांच्या गजरात अळवाच्या पानात विसर्जन केले जाणार आहे. अशी ही परंपरा गेली अनेक वर्षे गोसावी घराणे जोपासत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com