चिपळूण : जिल्ह्यात पक्ष वाढीची जबाबदारी आदिती तटकरेंवर

चिपळूण : जिल्ह्यात पक्ष वाढीची जबाबदारी आदिती तटकरेंवर

फोटो ओळी
-rat२१p२६.jpg-OP२३M२४८४२ आदिती तटकरे
--------

रत्नागिरी जिल्ह्याची आदिती तटकरेंवर जबाबदारी

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा निर्णय; पक्ष वाढीसाठी निर्णय, सिंधुदुर्ग वगळून उर्वरित कोकणाचा कार्यभार
मुझ्झफर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ ः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या गटाची ताकद वाढवण्यासाठी सरकारमधील मंत्र्यांवर वेगवेगळ्या भागाची जबाबदारी दिली आहे. सिंधुदुर्ग वगळता कोकणची जबाबदारी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या निमित्ताने कोकणाच्या राजकारणात महिला नेतृत्व म्हणून पुढे येण्याची त्यांना संधी प्राप्त झाली आहे. सत्तेच्या माध्यमातून शरद पवार गटातील कार्यकर्त्यांना अजित पवारांच्या गटात आणण्याचे आव्हान मंत्री आदिती तटकरेंपुढे आहे.
चिपळूण आणि खेड वगळता उर्वरित तालुक्यातील संघटना पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याबरोबर आहे. त्यामुळे वडिलांच्या नेतृत्वाखाली मंत्री आदिती तटकरे कोकणात पक्ष कशा पद्धतीने वाढवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे नेतृत्व मानत आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये सुनील तटकरे यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री पद होते. त्यामुळे तटकरे यांना जिल्ह्याचा अभ्यास आहे. आपल्यासह विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांची त्यांना ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील तालुका, जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तटकरे यांच्या सुचनेनुसार होतात. एखादा कार्यकर्ता पक्ष संघटनेचा आदेश मानत नसेल तर तटकरे मध्यस्थी करून त्याला शांत करतात, असे आतापर्यंत चालत आले आहे. आता आदिती तटकरे यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी आल्यामुळे वडिलांचा वारसा चालवण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
पक्षात फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीतही त्याचे परिणाम दिसून आले. चिपळूण आणि खेड तालुक्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. चिपळूणचे आमदार शेखर निकम अजित पवार गटात तर माजी आमदार रमेश कदम हे शरद पवार गटात आहेत. त्यामुळे चिपळूणमधील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद विभागली गेली आहे. लांजा, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, देवरूख, दापोली, गुहागर आणि मंडणगड तालुक्यात पक्षाची ताकद कमी आहे; परंतु जे कार्यकर्ते आहेत, ते शरद पवार यांच्याबरोबर आहेत. सत्तेच्या माध्यमातून या भागातील शरद पवार गटाबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना अजित पवार गटात आणण्याचे आव्हान मंत्री आदिती तटकरे यांच्यासमोर आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे राज्यात सरकार असताना आदिती तटकरे राज्यमंत्री होत्या. त्यांच्याकडे रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्रिपद होते. त्या वेळी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. याबाबत तेव्हा पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी नाराजी बोलून दाखवली होती. उपमुख्यमंत्री गट भाजपबरोबर सत्तेत आल्यानंतर आदिती तटकरे यांना कॅबिनेट मंत्रीपदावर बढती मिळाली. सोबत त्यांच्याकडे रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्ह्यात संघटना वाढवण्याची जबाबदारीही आली आहे. त्यांचे वडील सुनील तटकरे स्वतः प्रदेशाध्यक्ष आहेत. तटकरे यांचे विश्वासू जयंद्रथ खताते यांच्याकडे प्रदेश सचिवपदाची जबाबदारी आहे. जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, आमदार शेखर निकम, प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम यांच्यासह राष्ट्रवादीतील दुसऱ्या व तिसऱ्या फळीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तटकरे यांच्या मदतीला आहेत. या शक्तीचा वापर करून आगामी काळात त्यांना कोकणातील महिलांमधील सक्षम नेतृत्व म्हणून नाव कमावण्याची संधी आहे.


कोट
मतदारसंघाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री यांना साथ दिली; परंतु शरद पवार साहेबांच्या विचारापासून लांब गेलेलो नाही. आमचा पक्ष एकच आहे आणि तो जिल्ह्यात वाढवण्याचा प्रयत्न करू. मंत्री आदिती तटकरे यांना पक्षवाढीसाठी लागेल ते सर्व प्रकारचे सहकार्य करू.
- शेखर निकम, आमदार. चिपळूण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com