चिपळूण-सरपंच, ग्रामसेवकांना दुसरी कारणे दाखवा नोटीस बजावणार

चिपळूण-सरपंच, ग्रामसेवकांना दुसरी कारणे दाखवा नोटीस बजावणार

टेरव सरपंच, ग्रामसेवकांना दुसरी नोटीस देणार

प्रशासनाची माहिती; ग्रामस्थांचे उपोषण सुरूच, सरपंचांनी मागितली खुलाशासाठी मुदत
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ ः जलजीवन मिशन पाणीयोजना आणि ग्रामपंचायत कारभाराविरोधात टेरव ग्रामस्थांनी सुरू केलेले साखळी उपोषण सुरूच आहे. या प्रकरणी तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकांनी अद्याप खुलासा केलेला नाही; मात्र सरपंचांनी खुलाशासाठी वाढीव मुदतीची मागणी केली आहे; परंतु पंचायत समिती प्रशासनाने सरपंच व ग्रामसेवकास दुसरी कारणे दाखवा नोटीस देण्याची तयारी केली आहे.
येथील पंचायत समितीने टेरव ग्रामपंचायतीची तपासणी केली असता विविध विकासकामात कार्यालयीन तसेच आर्थिक अनियमितता आढळली. बहुतांशी विकासकामांची अनामत रक्कम, फॉर्म फी, सुरक्षा अनामत रक्कम संबंधित ठेकेदाराकडून घेतली नसल्याचेही उघड झाले. शासकीय नियमांना फाटा देत कामे केली. तरीही संबंधितांवर कारवाई न झाल्याने टेरव येथील सोमा म्हालीम व इतर ग्रामस्थांनी पंचायत समितीसमोर १५ ऑगस्टपासून सातव्या दिवशीही साखळी सुरू ठेवले आहे. या प्रकरणी कारवाई झाल्याशिवाय माघार न घेण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे. मे महिन्यात टेरव येथील विविध विकासकामांवर ग्रामस्थांनी आक्षेप घेत सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यासाठी ३ महिन्यांपूर्वी उपोषणाचा इशाराही दिला होता. त्याची दखल घेत पंचायत समिती प्रशासनाने आक्षेप असलेल्या कामांची सखोल चौकशी केली असता प्रशासकीय कामकाजात अनेक त्रुटी आढळल्या. चौकशी अहवाल तक्रारदारांना मिळाल्यानंतर त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावर गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील यांनी टेरवच्या तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्याला कारणे दाखवा बजावली होती. त्याचा अद्याप खुलासा दोघांकडून झालेला नाही. त्या उलट सरपंचांनी ग्रामपंचायतीमधील कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी मुदत मागितली आहे. यावर पंचायत समिती प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही; परंतु लवकरच दुसरी कारणे दाखवा नोटीस दिली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.


उपोषणावर तोडगा कधी?
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी टेरव ग्रामस्थांनी सुरू केलेले साखळी उपोषण सातव्या दिवशी कायम राहिले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतरही त्यावर तोडगा निघाला नाही. कारवाईसाठी प्रशासनाकडून वेळ मागितली जात आहे. याशिवाय वादग्रस्त ठरलेल्या जलजीवन मिशन पाणीयोजनेतील पाईपलाईनची अद्याप पाहणी केलेली नाही. अशा परिस्थितीत टेरव ग्रामस्थांच्या उपोषणावर तोडगा निघणार कधी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आमदार शेखर निकम यांनी या प्रकरणात चर्चेने तोडगा काढण्याचा सल्ला तक्रारदारांना दिला होता. तरीही पक्षीय बॅनरखाली उपोषण झाल्याने आमदारांनी तिकडे पाठ फिरवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com