फसवणूक

फसवणूक

२८ (पान ३ साठी)

शासकीय योजनांचा फसवणुकीसाठी आधार

दोघा भामट्यांकडून हजार महिलांना गंडा; साथिदाराचा शोध सुरू

खेड, ता. २१ ः शासनातर्फे महागडी शिलाई मशिन, घरकुले, घरघंटी व गोठा सवलतीच्या दरात देतो, असा फंडा वापरत त्या दोघा भामट्यानी तालुक्यातील बचत गटातील एक हजार महिलांना
२६ लाखांहून अधिकचा गंडा घातल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले. अशा प्रकारच्या आणखी कोणत्या योजनांचा आधार घेऊन त्यानी फसवणूक केली आहे का? याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती, तालुक्यातील महिला बचतगटातील शेकडो महिलांकडून लाखो रुपये उकळत पोबारा केलेला संशयित संदीप डोगरे (वाराणी- कासार, जि. बीड) याच्या येथील पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यानंतर आर्थिक फसवणुकीचे नवनवे कारनामे तपासात उजेडात येत आहेत. त्याचा पसार असलेला सहकारी बबन मारूती मोहिते याचाही पोलिसांना सुगावा लागला असून त्यालाही लवकरच जेरबंद करण्याची तयारी येथील पोलिसांनी केली आहे. त्याच्या अटकेनंतर फसवणुकीचे आणखी प्रताप उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्र क्रांतिसेना संघटनेच्या माध्यमातून शासनाकडून १६०० रुपयांमध्ये महागडी हातशिलाई मशिन व घरकूल मिळवून देण्याचे आमिष दाखवत सुरवातीला तालुक्यातील महिला बचतगटातील ८३९ महिलांची २१ लाख १८ हजार रुपयांची फसवणूक केल्याची ७ जुलैला पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल झाली. यानंतर तालुक्यातील महिला बचतगटाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित महिलांना शासनाच्या माध्यमातून सवलतीच्या दरात घरकूल व उद्योग सुरू करून देतो, असे आमिष दाखवत ९९ महिलांची २ लाख २५ हजार ६० रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार ६ ऑगस्टला फसवणूक झालेल्या महिलांनी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. याप्रकरणी पोलिस निरीक्षक नितीन भोयर, पोलिस उपनिरीक्षक हर्षद हिंगे यांनी तपासाला गती देत संशयित संदीप डोंगरेला गजाआड केले.
आर्थिक फसवणूक झालेल्या महिलांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी केले होते. त्यानुसार आणखी ३० महिलांनी फसवणुकीची तिसरी तक्रार नोंदवली आहे. शासनाकडून गोठ्यांच्या कामासाठी अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवत प्रत्येकी १० हजार रुपये व सवलतीच्या दरातील घरघंटीसाठी प्रत्येकी ४ हजार रुपये अशा ४ लाख २० हजार रुपयांना गंडा घातल्याचे तक्रारीत नमूद केले असून, त्यानुसार तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत फसवणूक झालेल्या ९६८ महिलांकडून भामट्यांनी कागदपत्रेदेखील जमा केल्यामुळे त्यांच्यावरील विश्वास अधिक बळावला होता; मात्र आपल्याला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समजल्यानंतर त्यांना धक्काच बसला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक नितीन भोयर करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com