नाटळ विद्यालयात आज स्नेहमेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाटळ विद्यालयात 
आज स्नेहमेळावा
नाटळ विद्यालयात आज स्नेहमेळावा

नाटळ विद्यालयात आज स्नेहमेळावा

sakal_logo
By

नाटळ विद्यालयात
आज स्नेहमेळावा
कणकवली ः माध्यमिक विद्यालय नाटळ या प्रशालेतून गेल्या ३८ वर्षांत उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उद्या (ता. २१) सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत आयोजित केला आहे. प्रशालेचे अनेक माजी विद्यार्थी आज शासकीय, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात विविध पदांवर कार्यरत आहेत. या विद्यार्थ्यांच्या अनुभवाचा संस्था, प्रशाला व विद्यार्थ्यांना फायदा व्हावा, प्रशालेच्या प्रगतीत व वाटचालीत माजी विद्यार्थ्यांचे योगदान मिळावे. या हेतूने या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. प्रशालेच्या सभागृहात हा मेळावा होणार असून, सर्व माजी विद्यार्थ्यांनी यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन राजवाडी उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र सावंत, शालेय समिती चेअरमन नितीन सावंत, प्रशालेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तांबे यांनी केले आहे.
-------------
साळगाव-गावठाणवाडी
रस्तादुरुस्तीची मागणी
कुडाळ ः साळगाव मुख्य रस्ता ते गावठणवाडी रस्त्याची दुरवस्था झाली असून, याकडे गेले कित्येक महिने संबंधित प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. याबाबत स्थानिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामदेवता असलेल्या श्री देवी माऊली मंदिराकडे जाण्यासाठी हा सर्वांत जवळचा रस्ता आहे. बहुतांशी लोक या रस्त्याचा वापर करतात; मात्र भिमाईनगरपासून काही अंतर गेल्यावर एका मोरीवरील माती पूर्णतः वाहून गेली आहे. त्यामुळे मोरीचे पाईप पूर्णतः उघडे पडले आहेत. यामुळे येथून रस्ता ओलांडणे शक्य होत नाही. वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही येथून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
---------------
तळेरे, नांदगावात
विजेचा खेळखंडोबा
कणकवली ः तळेरे-नांदगाव (ता.कणकवली) विभागामध्ये महावितरण कंपनीचा खेळखंडोबा सुरू असून, ग्राहक व मुंबईकर चाकरमानी आक्रमक झाले आहेत. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी व बाप्पा प्रत्येकाच्या घरोघरी आगमन झाले असताना विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. यामुळे ऐन गणेशोत्सवात नळपाणी योजनेवर विपरित परिणाम होत आहे. याबाबत नांदगाव विभागातील ग्रामस्थांनी एकत्र येत दोन दिवसांत वीज ग्राहक संघटना स्थापन करणार असल्याचे ऋषिकेश मोरजकर यांनी सांगितले. गणेश चतुर्थी काळात खंडित वीजपुरवठा झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
----------------
भंडारी महाविद्यालयाचे
कबड्डी स्पर्धेमध्ये यश
मालवण ः मालवण तालुकास्तरावरील मुलींच्या १९ वर्षांखालील कबड्डी स्पर्धेत येथील भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले. या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेत मुलींच्या संघाने पहिल्या सामन्यात टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालय संघावर २५ गुणांनी एकतर्फी, दुसऱ्या अटीतटीच्या सामन्यात स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संघावर ६ गुणांनी विजय मिळविला. या संघातून महिमा तारी, विनिता साठे, रेणुका पाटील, एकता मालवणकर, ईशा शिरोडकर, भक्ती बेलुसे, वेदिका फाटक, साक्षी चव्हाण, सानिका गोलतकर, जरिना खान, छाया यमकर या विद्यार्थिनींचा समावेश होता. या विद्यार्थिनींना साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थिनींचे प्रा. हणमंत तिवले यांनी अभिनंदन केले. प्रा. पवन बांदेकर, प्रा. स्नेहल पराडकर उपस्थित होते.
-----------------
अनम खान हिची
विभागस्तरावर निवड
सावंतवाडी ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा कनेडी हायस्कूल, कणकवली येथे शालेय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यामध्ये १४ वर्षांखालील विद्यार्थी गटात सावंतवाडी सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या अनम खान या विद्यार्थिनीची विभागस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी वैयक्तिकरित्या निवड झाली. या विद्यार्थिनीला प्रशालेच्या क्रीडाशिक्षिका मारिया आल्मेडा यांनी मार्गदर्शन केले. सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ, पर्यवेक्षिका मारिया पिंटो, पालक-शिक्षक संघ कार्यकारिणी समितीचे पदाधिकारी यांनी अनम हिचे अभिनंदन केले.