इतिहास संशोधक गणेश हरी खरे

इतिहास संशोधक गणेश हरी खरे

१९ (सदर ः टूडे पान ३ साठी)

(७ ऑक्टोबर टुडे ३)

इये साहित्याचिये नगरी ..........लोगो


- rat१३p६.jpg-
२३M३७६५०
गणेश हरी खरे
- rat१३p७.jpg-
P२३M३७६५१
प्रकाश देशपांडे

इतिहास संशोधनाचे काम म्हणजे आवर्जून दारिद्र्य मागून घेणे. निदान महाराष्ट्रात तरी इतिहास संशोधकांच्या जीवनचरित्राचा अभ्यास केला तर वरील विधानाची सत्यता समजून येर्इल. इतिहासाचार्य राजवाडे असतील वा वासुदेवशास्त्री खरे असतील. आयुष्यभर संशोधनासाठी वणवण केली पण अर्थाची वानवाच होती. यात आणखी एक नावं म्हणजे गणेश हरी खरे.

- प्रकाश देशपांडे, चिपळूण

--------

इतिहास संशोधक गणेश हरी खरे

गणेश खरे यांचा जन्म पनवेलला १० जून १९०१ रोजी झाला. खरे हे सुध्दा वासुदेवशास्त्रींप्रमाणेच मूळ गुहागरचे. गणेश हरी यांना इतिहास अभ्यासक तात्या या नावाने ओळखत. तात्यांचे वडील वार्इला रहात होते. घरची परिस्थिती सुखवस्तू अशी होती. मात्र वडील अकाली वारले आणि घरातील समृध्दी संपली. खरे वार्इच्या द्रवीड हायस्कूलमधून मॅट्रिक झाले. वार्इ हे त्यावेळी वेदविद्येचे माहेर होते. वार्इच्या प्रज्ञापाठशाळेत केवलानंद सरस्वतींसारखे ऋषीतुल्य शास्त्री आचार्य होते. विनोबाजी त्यावेळी वेद शिकायला या पाठशाळेत आले होते. ही नुसती घोकंपट्टी करवून भिक्षुक निर्माण करणारी पाठशाळा नव्हती. इथे देशभक्तीचीही मात्रा चाटविली जात होती. तात्या विनोबाजींकडून गीता आणि उपनिषदांची संथा घेत होते. १९२० साली मॅट्रिक झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते सांगलीला विलिंग्डन महाविद्यालयात दाखल झाले. अभ्यास सुरू झाला आणि महात्माजींनी असहकाराची हाक दिली. शिक्षणावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. विनोबाजींच्या सहवासात मनात जाज्वल्य राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित झाली होती. तात्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडून स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून दिले. सातारा जिल्हयात स्वदेशी, मद्यपान विरोधी चळवळ, न्यायालयावर बहिष्कार अशा आंदोलनात सहभागी झाले. त्याचवेळी कोयना धरणाचा आराखडा आखला जात होता. या धरणात अनेक शेतक-यांच्या जमिनी पाण्याखाली जाणार असल्याने त्या विरोधात जगजागृतीची मोहीम सुरू केली. सरकारने हे कृत्य देशविरोधी ठरवून एक वर्ष कारावासात पाठविले. तुरूंगातून सुटल्यावर सातारा जिल्हा कॉग्रेसचे चिटणीस झाले. पुढे सातारा इथे असलेल्या राष्ट्रीय शाळेत संस्कृतचे शिक्षक म्हणून चार वर्षे काम केले. राजकारणाची दिशा बदलू लागली आणि तात्यांनी राजकारणातून निवृत्ती घेऊन इतिहासाच्या संशोधनावर लक्ष केंद्रित केले. संशोधनासाठी साता-यापेक्षा पुणे अधिक समृध्द होते. त्यांनी पुण्याला स्थलांतर केले. पुण्याच्या इतिहास संशोधक मंडळात संशोधनाला प्रारंभ केला. दारिद्र्य तर पाठ सोडत नव्हते. मंडळात दिवसभर वाचत बसायचे नंतर दोन पैशाचा पाव घेऊन मित्राकडे दूध आणि पाव खायचा. रात्री मंडळातच किंवा आनंदाश्रमात झोपायचे. रात्री जेवायला कांही नसायचेच या काळात कुणाचे मोडी कागद वाचून जी किरकोळ रक्कम मिळायची त्यावरच जगायचे. नंतर मंडळात त्यांना पंचवीस रूपये पगार मिळू लागला. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी असलेल्या शिलालेखांचे ठसे आणण्यासाठी मिळेल त्या साधनाने न मिळाल्यास पायी हिंडून त्यांनी ठसे गोळा केले. इतिहास संशोधनासाठी महत्वाचे म्हणजे मोडी बरोबरच फारसी अरेबी आणि जुनी कानडी (हळेकन्नड) या भाषा आणि त्याबरोबरच मोडी लिपीचाही अभ्यास करून त्यांनी प्राविण्य मिळविले. नाणकशास्त्र आणि मूर्तीशास्त्र अवगत करून घेतले. विशेष म्हणजे हे सारे त्यांनी स्वयंअध्यायनाने प्राप्त केले. त्यासाठी मोठी साधना करावी लागली. आज इतिहास संशोधक मंडळात असलेली नाणी, पोथ्या, कागदपत्रे आहेत ती जमविण्यात सिंहाचा वाटा तात्यांचा आहे. त्यांनी आणलेल्या कागदपत्रांची संख्या तर लाखाहून अधिक आहे. अखंड भ्रमंती करून त्यांनी हे जमविले. ते जमवताना त्यांना अनेक अनुभवांना सामोरे जावे लागले. कुठे शिलालेखावर धन असल्याचा उल्लेख आहे आणि आलेला माणूस ते वाचून धन घेऊन पळून जाणार म्हणून गावक-यांनी तो शिलालेख उपडा करून वाचून दिला नाही, तर १९४२ साली त्रिवेंद्रमला हा जपानी हेर माहिती काढण्यासाठी आलाय म्हणून पकडले. निजामाच्या राज्यात तर काय सगळयाचाच आनंद होता. निजामाचे नेमलेले अधिकारी अणि अक्कल यांचा दूरान्वयानेही संबंध नसायचा. ते शिलालेखाच्या जवळपासही जायला विरोध करायचे. अनंत हालअपेष्टा सोसून तात्यानी हे धन गोळा करून इतिहास संशोधन मंडळ संपन्न केले. अनेक ठिकाणी ही जुनी कागदपत्रे अंधा-या खोलीत कोळिष्टकांनी आणि धुळीने माखलेली असायची. ती स्वच्छ करून वाचायची म्हणजे श्‍वसनसंस्थेचे विकार स्वीकारायला लागायचे. इतिहासावर दृढ श्रध्दा असल्याने तात्यांनी हे सारे सहजपणे सोसले. संशोधनक्षेत्रात आवश्यक असलेली कुठलीही पदवी त्यांच्याकडे नव्हती. ते साधे मॅट्रिक पास होते. मात्र त्यांनी केलेले विविधांगी संशोधन थक्क करणारे आहे़. विविध विषयांवर त्यांची त्रेपन्न पुस्तके प्रसिध्द झाली. चारशेच्या जवळपास शोध निबंध आहेत. महाराष्ट्राची चार दैवते आणि श्री विठ्ठल आणि पंढरपूर ही त्यांची अभ्यासक्षेत्रात गाजलेली पुस्तकं. तुळजापूरची देवी, पंढरपूरचा विठ्ठल, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि जेजुरीचा खंडोबा ही चारी तीर्थक्षेत्रे उभ्या महाराष्ट्राला वंदनीय आहेत. या देवतांच्या मूर्तींचा त्या परिसरात मिळालेल्या शिलालेख ताम्रपट यांच्या सखोल व्यासंगाचे दर्शन त्यांच्या या पुस्तकामधून दिसून येते. त्यांचे कांही संशोधन धक्का देणारेही आहे. चाफळच्या मंदिरात असलेली मूर्ती ही रामाची नसून सूर्याची आहे, हे त्यांनी सप्रमाण सिध्द केले. त्यांच्या अभ्यासानुसार आज करवीर येथे असलेली महालक्ष्मीची मूर्ती ही पूर्वीची नाही. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र श्रीसंत नामदेव महाराज युगे अठ्ठाविसे म्हणत असले तरी अकराव्या शतकाच्या मागे जात नाही. अशी अनेक धक्कादायक विधाने त्यांनी निष्कर्ष काढून केली ती भक्ताच्या श्रध्देला धक्का द्यावा म्हणून नाहीतर अभ्यासातून सापडलेले सत्य सांगणारी आहेत.
तात्यांच्या या उग्र आणि घोर संशोधन तपस्येचा गुणगौरवही अनेकांकडून झाला. पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डी. लिट पदवी दिली, शिवाय पीएचडीसाठी मार्गदर्शक म्हणूनही मान्यता दिली. हिस्टॉरिकल रेकॉर्डस् कमिशनवर सन्माननीय सदस्य म्हणून नियुक्ती केली. तात्यांच्या कार्याचा सन्मान केला तो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी. सातारा कॉंग्रेसपक्षाचे तात्या चिटणीस होते त्यावेळी यशवंतराव काँग्रेसचे नेते म्हणून उदयाला आले होते. तात्यांनी स्वातंत्र्यासाठी सोसलेला त्याग त्यांनी पाहिला होता. त्यांच्या ध्यानात आले गणेश हरी खरे यांच्या निवासाची आणि चरितार्थाची सोय करायला हवी. यशवंतरावांनी खरे यांना आगरकर कॉलनीत स्वातंत्र्यसैनिकांसाठी असलेल्या योजनेतून ब्लॉक दिला आणि मानधनही सुरू केले. महाराष्ट्रातील इतिहास संशोधकांच्या मालिकेतला हा तेजेस्वी हिरा पाच जून १९८५ रोजी स्वतःच इतिहास झाला.

(लेखक इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि साहित्यिक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com