Konkan Tourism
Konkan Tourismesakal

National Tourism Day : कोकण किनाऱ्यावरची टुमदार गावे पर्यटन विकासात महत्त्वाची; चला संधीचे सोने करूया

कोकणी पर्यटनाच्या विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
Summary

खाडीकिनारी असलेली टुमदार गावे पर्यटन विकासात महत्त्वाची आहेत. याच जोडीला कोकणी मत्स्य संस्कृती हे एक बलस्थान आहे.

-राजीव लिमये कर्ले, रत्नागिरी. (Rajeev.limaye१९५७@gmail.com)

कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामध्ये केली जाणारी भातशेती, लावणी, कापणी, झोडणी आता इव्हेंटस बनू लागली आहेत. कोकणातील अनेक ग्रामीण भागात श्रावण भाद्रपदामध्ये होणारी हंगामी चिबूड, काकड्या, भोपळे, अळंबी यांची रेलचेलही पर्यटकांना (Konkan Tourism) आकर्षित करते. कोकणातील विविध मंदिरे धार्मिक पर्यटनाच्या बरोबरच वास्तूरचनेच्या वेगळेपणाने महत्त्वाची आहेत.

हेरिटेज पर्यटन (Heritage Tourism) हा महत्त्वाचा घटक वेगळेपणाने विचारात घ्यायला हवा. मंदिरांमध्ये होणारे वार्षिक उत्सव, त्यामध्ये असणारा समाजाचा उत्स्फूर्त सहभाग, त्या विषयीच्या परंपरा, तेथे होणारी नाटके, दशावतार, नमने, पालख्यांची मोठी परंपरा हे सर्व विषय पर्यटकांसाठी आकर्षण ठरू शकतात. आपला होळी उत्सव, गणपती उत्सव, त्यातील पारंपरिक ढोलताशे इतकेच नव्हे, तर सामूहिक आरत्या, मिरवणुका, घरोघरी केली जाणारी रोषणाई विदेशी पर्यटकांसाठी पर्वणी ठरतात. अशा संधीमुळे छनछन वाजणारी नाणी कोकणवासीयांच्या हाती कशी येतील, याचा मागोवा घेणारे पाक्षिक सदर.

Konkan Tourism
Chiplun Datta Temple : शांत...शांत...संवादासाठी श्रीक्षेत्र अवधूतवन!

पश्चिमेला खळाळता सागरकिनारा, पूर्वेकडे सह्याद्रीचे सान्निध्य त्याचबरोबर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने हिरव्यागार डोंगररांगानी, खारफुटीची वने वागवणाऱ्या खाड्यांनी, निळ्याशार सागराच्या पोटातील कोळंबी, बांगडा, पापलेट, कर्ली, सरंगा माशांनी, थंडीत मोहोरणाऱ्या आंब्याच्या बागांनी, कातळावरच्या काळ्याभोर करवंदांनी, डोंगरउतारावरील टपोऱ्या जांभळांनी, रातांब्याच्या सुंदर झाडांनी, तुऱ्यांनी शोभणाऱ्या सागवानाच्या वृक्षांनी, तपकिरी-लाल फुलांनी डवरलेल्या किंजळीच्या झाडांनी, आगरातून पसवलेल्या सोनकेळींनी, केशरी रंगाची शिपटे मिरवणाऱ्या सडसडीत पोफळींनी, शहाळी, गोड खोबरे देणाऱ्या डौलदार माडांनी कोकण भूमीचे वेगळेपण जाणवते.

Konkan Tourism
Health Tips : साथीच्या रोगाप्रमाणे वाढतोय हाडांचा ठिसुळपणा; दगडासारखी हाडं होताहेत काचांसारखी नाजूक

हे वेगळेपण इथल्या तल्लख बुद्धीच्या, तिरकस वाणीच्या, समाधानी वृत्तीच्या, परंपराप्रिय, उत्सवप्रिय कोकणी माणसांनी टिकवलंय, वृद्धिंगत केलय. अलिकडे प्रकाशात आलेली कातळशिल्पे हा तर कोकणला मिळालेला खजिनाच आहे. पर्यटनाच्या संधी याच वेगळेपणामुळे निर्माण झाल्या आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे या विषयीची सम्यक दृष्टी असणारे अनेक कार्यकर्ते, उद्योजक, हॉटेल व्यावसायिक, पर्यटन चळवळीतील कार्यकर्ते, नेते शासन, प्रशासन या क्षेत्रामध्ये सक्रिय असून, कोकणी पर्यटनाच्या विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. या सगळ्या मंडळींना पूरक पर्यटनासाठी सुप्त संधी अन् त्यातून अर्थप्राप्ती अशा साखळीतील दुवे शोधण्याचा प्रयत्न वर्षभर करणार आहे. अनेक पर्यटनस्थळे तेथील संधींचे व्यावहारिक प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष रूपांतर कसे होईल, याचा विचार करू.

कोकणातील पर्यटनाला वैविध्यपूर्ण पैलूं विलोभनीय आहेतच त्याचबरोबर विकासाच्या अनेकविध संधी निर्माण करतात. माणसाला समुद्रदर्शनाची नैसर्गिक ओढ असल्याने कोकण किनाऱ्यावर बीच पर्यटन प्रथमस्थानी विकसित झाले. त्यामध्ये वाढत असलेला स्थानिक लोकांचा सहभाग जितका चांगला त्याचवेळी स्थानिकांकडून समुद्राकाठच्या जमिनींची होत असलेली विक्री हा नक्कीच काळजीचा विषय आहे. त्या पलिकडेही खाड्यांवर आधारित जलपर्यटन महत्त्वाचे आहे. कोकणातील खाड्यांचे सौंदर्य वादातीत आहे. कोकणातील खाड्यांचे वेगळेपण पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वाचे ठरते. खाडीत होड्यातून फिरणे असो अथवा त्यामधील बायोडायव्हर्सिटी दोनही महत्त्वपूर्ण आहेत.

खाडीकिनारी असलेली टुमदार गावे पर्यटन विकासात महत्त्वाची आहेत. याच जोडीला कोकणी मत्स्य संस्कृती हे एक बलस्थान आहे. कोकणातील संकल्पित सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाचा मागोवा घेणे महत्त्वाचे आहे त्याचबरोबर इतर प्राणीजीवनाचाही अभ्यास व्हायला हवा. निसर्गपर्यटनाचा मोठा कॅन्व्हॉस कल्पनेत आणला तर जंगल पर्यटनाचे विविध पैलू आहेत. कासवे संरक्षणामध्ये ऑलिव्ह रिडले कासव संरक्षणाने मिळवलेले यश पथदर्शी आहे. खासगी जंगले तेथील निवास, पारंपरिक मातीच्या घरातून, चौसोपी वाड्यातून राहण्याचा आनंद आगळाच ठरतो. पक्षीनिरीक्षण वेगाने लोकप्रिय होत आहे. आपल्याकडे त्यासाठीच्या अनेक संधी, त्या विषयीचे डॉक्युमेंटेशन, स्पेशालिस्ट गाईड्स हा तर जाणकारांचा विषय. त्याची माहिती कशी एकत्रित उपलब्ध करता येईल, याचा विचारही महत्वाचा.

Konkan Tourism
Aditya L1 Satellite : 'आदित्य-एल 1' करणार सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास; जाणून घ्या मोहीम

अगदी कोकणी मत्स्याहारासोबत, कोकणी शाकाहारी घरगुती खाद्यसंस्कृतीच्या प्रेमात पर्यटक पडतात. हाऊसबोटीचा पर्याय प्रत्यक्षात येताना दिसतो. साहसी पर्यटन, कॅम्पिंग साईट्स, वॉटरस्पोर्टस् आदी नवीन संधींचा कोकणी व्यावसायिक विचार करताना तसे उद्योग सुरू करताना दिसत आहे. क्रीडाक्षेत्राचा विचार केला तर सायकलिंगचाही पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कसा उपयोग करता येईल, याचा मागोवा घेणे उत्कंठावर्धक ठरेल. ही लेखमालिका अशा प्रकारे विविध जाणकारांसोबत ग्रामीण भागातील नवोन्मेशी विचार करणारी तरुणमंडळी व्यावसायिकांच्या सहभागाने पुढे जाईल.

(लेखक पर्यटन क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com