

पान १
६८८५८
६८८५९
‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग’ भाजपच लढवणार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ः खासदारांना धडा शिकवायची वेळ आली आहे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ भाजपच लढणार आहे. हा आमचा हक्क असून, पंतप्रधान मोदी व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवणार आहे. या मतदारसंघात यापूर्वी जनसंघ व भाजपचे वर्चस्व राहिलेले आहे. मागील काही वर्षे भाजपच्या कार्यकर्त्यांवर सातत्याने अन्याय झालेला आहे. त्यामुळे ‘यही समय है, सही समय है’ असे सांगत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ कुणाला सोडण्याचा प्रश्नच नाही, हा मागायचाही विषय नाही. हक्काने सांगतो या ठिकाणी कमळच फुलणार, अशी स्पष्ट भूमिका गोव्याचे मुख्यमंत्री तथा मतदारसंघाचे प्रमुख डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.
भाजप दक्षिण जिल्हा रत्नागिरीच्या वतीने स्वा. सावरकर नाट्यगृहात आयोजित कार्यकर्ता व बूथप्रमुखांच्या मेळाव्याला ते बोलत होते. याप्रसंगी त्यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि लोकसभा सहप्रभारी बाळासाहेब माने यांनी केला. बाळ माने, प्रमोद जठार, राजेश सावंत यांची भाषणे म्हणजे तोफगोळा भरूनच केलेली होती. कार्यकर्त्यांच्या या भावना मी मोदी, फडणवीसांपर्यंत पोहोचवणार आहे, असे डॉ. सावंत म्हणाले.
डॉ. सावंत यांनी सांगितले, उमेदवारी कुणाला मिळणार हा रत्नागिरीकरांचा प्रश्न छोटा आहे; परंतु कमळ फुलवायचे असल्यास प्रत्येक बूथवर काम झाले पाहिजे. कार्यकर्त्यांनी आताच कष्ट घ्यायला हवे, तरच खासदार निवडून आल्यावर सरपंचांसह पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर आपण भाजपचा झेंडा फडकावू शकतो. मी मावळ, रायगड व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला असून, तीनही मतदारसंघ भाजपला अनुकूल आहेत. मागील दहा वर्षांत येथील खासदारांनी काही केले नाही. त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. कार्यकर्त्यांनी आधी लोकसभेचा विचार करावा, मग विधानसभेचा करूया, असे त्यांनी संगितले.
काँग्रेसकडून सावरकरांचा अवमान
काँग्रेसवर टीका करताना डॉ. सावंत म्हणाले, ‘‘यापूर्वी फक्त भूमिपूजनाच्या पाट्या लावण्याचे काम त्यांनी केले; परंतु आपल्या सरकारमध्ये आपणच भूमिपूजन करतो व उद्घाटनेही करतो. ही मोदी सरकारची गॅरंटी आहे. मागील ६० वर्षांत जे झाले नाही ते १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करण्याचे काम काँग्रेसने केले. राहुल गांधी हे काँग्रेसचे नेतृत्वच नाही, त्यांना इतिहास माहीत नाही.’’
कदमांवर बोलणे टाळले
कारागृहातील सावरकर स्मारकाला भेट दिल्यानंतर डॉ. सावंत पत्रकारांशी बोलले. सर्व पक्ष संपवून भाजपलाच जिवंत राहायचे आहे का, या शिवसेना नेते रामदास कदम यांच्या टीकेवर बोलणं त्यांनी टाळलं. कुणी काय आरोप केले, याकडे मी जात नाही. मी एनडीएचा आणि भाजपचा प्रचार करायला आलोय, असे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.