विठुरायाचे गोड रूप डोळ्यासमोर उभे करणे म्हणजे रूपाचा अभंग

विठुरायाचे गोड रूप डोळ्यासमोर उभे करणे म्हणजे रूपाचा अभंग

rat10p4.jpg
70224
रत्नागिरी : श्रीराम मंदिर कट्टा कार्यक्रमात बुवा प्रकाश वराडकर यांचा सत्कार करताना अण्णा लिमये. सोबत सुरेंद्र घुडे, प्रभाकर कासेकर आदी.
--------------
रूपाच्या अभंगांतून उभे राहाते विठुरायाचे गोड रुप
प्रकाश वराडकर; श्रीराम मंदिर कट्टा येथे भजनी मेळाव्यात मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : वेगवेगळ्या अभंग रचना आणि भक्ती गीतांमधून विठ्ठलाचे सगुण साकार रूप आणि निर्गुण निराकार रूप नजरेसमोर उभे करण्याचा, मनामनात साकारण्याचा प्रयत्न शतकानुशतके तत्कालीन संत कवींनी केला आहे. सगुण आणि निर्गुण रूपाचे विविध पैलू उलगडत त्या पंढरीच्या विठुरायाचे गोड रूप डोळ्यासमोर उभे करणारे काव्य म्हणजेच रूपाचा अभंग होय, असे प्रतिपादन भजन मार्गदर्शक बुवा प्रकाश वराडकर यांनी केले.
येथील राम मंदिरात श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाच्यावतीने नववा भजनी मेळावा झाला. त्यात बुवा वराडकर बोलत होते. ते म्हणाले की, प्रत्येकाला विठ्ठल वेगवेगळा भासतो. कोणाला आपल्या शेतात, कोणाला मातीला आकार देत घडे बनवताना, सावता माळी यांना कांदा, मुळा भाजीमध्ये तर कोणाला आपल्या संसारात जळीस्थळी तो पांडुरंग दिसतो. यावरून विठ्ठल ही देवता एका चौकटीत बंदिस्त होणारी नाही किंवा विशिष्ट समाजसंस्थेची नाही, तर समाजातील प्रत्येकाला विठ्ठल हा आपला वाटतो. त्यातूनच विठ्ठल भक्तीमुळे आपला विठ्ठल कधी सगुण साकार तर कधी निर्गुण निराकार रुपात त्याला दर्शन देतो आणि मुखात हरिनामाचा गोडवा साठवत, समाजात नीतिमत्तेच्या मार्गावरून अखंड चालण्याची प्रेरणा देतो
ज्येष्ठ नागरिक कट्टाचे अध्यक्ष अण्णा लिमये यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा झाला. या वेळी सचिव सुरेंद्र घुडे, प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर कासेकर, दलितमित्र एस. बी. खेडेकर प्रमुख उपस्थित होते. पुढील भजनी मेळावा ४ मे रोजी दुपारी ३.३० वा. ते ५.३० वा. या वेळेत होणार असल्याचे कट्टातर्फे जाहीर केले. श्रीमान भागोजी शेठकीर पुण्यतिथी कार्यक्रमात अध्यात्मिक प्रतिभावान व्यक्ती म्हणून गौरवल्याबद्दल बुवा वराडकर यांचा तसेच शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सुरेंद्र घुडे यांचा सत्कार करण्यात आला.

चौकट
भजनात दंग
विठ्ठलाच्या रुपाचे अभंग अनेक भजनी कलावंतांनी सादर करून भजन मेळावा भक्तिरसाने भिजवून टाकला. रुपाचे अभंग सुरेंद्र घुडे, बाळा घोसाळकर, अर्चना उतेकर, शीतल भोसले, निवृत्त आगार व्यवस्थापक दिलीपराव साळवी, आकाशवाणी कलावंत अनुया बाम, शिवराम कदम, रमेश देवरुखकर यांनी सादर केले. या वेळी सुरेंद्र घुडे, राजन साळवी आणि सुरेंद्र मुळ्ये यांनी संगीतसाथ केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com