भाजप कमळ चिन्हासाठी आग्रही

भाजप कमळ चिन्हासाठी आग्रही

70378
नारायण राणे, रवींद्र चव्हाण, किरण सामंत

सिंधुदुर्ग-रत्नागिरी भाजपला सोडण्यासाठी हालचाली
महायुतीमध्ये उमेदवारीवरून खल ः राऊतांचा प्रतिस्पर्धी कोण लवकरच होणार स्पष्ट
शिवप्रसाद देसाई ः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना-भाजप युतीचा उमेदवार कोण असणार?, यावरून पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू आहेत. भाजप कमळ चिन्हावर ही जागा लढवण्यावर ठाम आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात सक्षम उमेदवार कोण द्यायचा? यावरून खल सुरू आहे. भाजपच्या निवडणूकपूर्व सर्व्हेचा विचार करून हा मतदारसंघ भाजपला सोडण्यासाठी हालचाली सुरू आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय दिल्ली दरबारातून होणार आहे.
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भाजपची संघटनात्मक ताकद मोठी असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत तयार केले आहे. त्यातच शिवसेना फुटून या लोकसभा मतदारसंघातील उदय सामंत व दीपक केसरकर हे दोन नेते शिंदे गटाकडे गेल्यानंतर ठाकरेंची शिवसेना दुबळी झाल्याचे चित्र अधिक प्रखरतेने मांडण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला. त्या आधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाने सिंधुदुर्गात त्यांची संघटनात्मक ताकद वाढली होती. असे असले तरी आता निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार राऊत यांना शह देण्यासाठी भाजपकडून अनेक पर्यायांवर खल सुरू झाला आहे. अद्याप उमेदवार निश्‍चित झाला नसला, तरी पक्षाच्या अंतर्गत राजकीय सर्व्हेचा विचार करून येथे सक्षम उमेदवार देण्याबाबत खल सुरू झाला आहे.
लोकसभेचा हा मतदारसंघ चिपळूणपासून दोडामार्गपर्यंत पसरला आहे; मात्र राजकीयदृष्ट्या त्याचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे दोन विभाग आहेत. लांबलचक पसरलेल्या या मतदारसंघात सक्षम उमेदवार देण्याशिवाय पर्याय नसतो. पूर्वी या पूर्ण मतदारसंघावर शिवसेनेची पकड होती. त्या काळात रत्नागिरीत शिवसेना आणि सिंधुदुर्गात राणेंचा राजकीय प्रभाव होता. या स्थितीतही विनायक राऊत यांनी दोनदा लोकसभेची लढाई जिंकली. आताही शिवसेना फुटली असली, तरी त्यांचा जनसंपर्क, शिवसेनेबद्दलची सहानुभूती आणि पूर्ण मतदारसंघापर्यंत त्यांची तयार झालेली ओळख या राऊत यांच्या जमेच्या बाजू आहेत. या तुलनेत भाजप केंद्र आणि राज्यात सत्तेत आहे. त्यांनी संघटनाही चांगली बांधली आहे. नारायण राणे, रवींद्र चव्हाण असे बडे नेते त्यांच्याकडे आहेत. असे असूनही राऊत यांना राजकीय शह देण्यासाठी केवळ भाजपचे ‘गुडविल’ चालणार नाही, तर त्या जोडीने पूर्ण मतदारसंघात प्रभाव असलेला सक्षम उमेदवारही लागेल, हे उमेदवारीचा निर्णय घेणाऱ्या भाजपच्या यंत्रणेच्या लक्षात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपच्या युतीत ही जागा नेमकी कोणाला मिळणार? याची चर्चा सुरू होती; मात्र शिवसेनेला जास्तीत जास्त जागांवर भाजपचे खासदार निवडून आणायचे आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांनाच पुन्हा उमेदवारी मिळताना नाकीनऊ आले आहे. या तुलनेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील खासदार राऊत मूळ शिवसेनेतच राहिल्याने येथील शिंदे गटाचा दावा कमजोर पडला आहे. यातच भाजप येथून कमळ चिन्हावरच निवडणूक लढवण्यास आग्रही आहे. असे असले तरी शिंदे गटाचे नेते व मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे. शिंदे गटही येथील दावा सोडताना दिसत नाही. त्यामुळे युतीचा उमेदवार कोण असणार? याची उत्सुकता आहे.
या राजकीय मोर्चेबांधणीला आणखीही एक बाजू आहे. सद्य:स्थितीत रत्नागिरीच्या तुलनेत सिंधुदुर्गात भाजपला मते मिळवणे सोपे आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील उमेदवार दिल्यास तेथील शिवसेनेची मते कमी करता येतील आणि संघटनेच्या बळावर सिंधुदुर्गातील मते मिळवून विजय मिळवता येईल, असे गणितही मांडले जात आहे. याचा विचार झाल्यास सामंत यांना उमेदवारी मिळू शकते. कारण रत्नागिरीमध्ये स्थानिक पातळीवर प्रभाव असलेला व सिंधुदुर्गातही संपर्क असलेला नेता भाजपकडे तूर्त नाही. या शिवाय भाजपकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा पर्यायही आहे. या दोन्ही नेत्यांनी राज्यस्तरावर नेतृत्व केले असल्याने पूर्ण मतदारसंघात मोर्चेबांधणी सोपी जाणार आहे. या शिवाय मूळ सिंधुदुर्गातील विनोद तावडे, सुरेश प्रभू अशा नावांचे पर्यायही भाजपसमोर असू शकतात; मात्र नवख्या उमेदवाराला पुढे करून रिस्क घेण्याच्या स्थितीत भाजप नसल्याचे सूत्रांकडून समजते.
भाजपने उमेदवार ठरवण्याआधी पूर्ण देशात मतदारसंघवार सर्व्हे केला आहे. त्यात आजमावलेली स्थिती हा उमेदवारी देण्याचा मुख्य निकष असणार आहे. यात उमेदवारीसाठी होणारी मोर्चेबांधणी, उमेदवारीनंतर होणाऱ्या संभाव्य बंडखोरीची धास्ती याला फारसे स्थान असणार नाही. यातच जास्तीत जास्त उमेदवार भाजपकडून निवडून यावे, यासाठीचा आग्रह असणार आहे. या स्थितीत रत्नागिरी-सिंधुदुर्गाचा युतीचा उमेदवार कमळ चिन्हावर लढणाराच असेल, अशी शक्यता जास्त ठळक असल्याचा अंदाज राजकीय अभ्यासकांना वाटत आहे.
----------------
कोट
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा महायुतीचा उमेदवार येत्या दोन दिवसांत ठरेल. वरिष्ठांकडून जो उमेदवार दिला जाईल, त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. लोकसभा कुणी लढवावी, हा निर्णय अद्याप ठरलेला नाही. दोन दिवसांत उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे. येथे युतीला पोषक वातावरण आहे. त्यामुळे उशिरा उमेदवार जाहीर झाला, तरी आमचा विजय निश्चित आहे.
- दीपक केसरकर, नेते, शिवसेना
-------------------
कोट
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड न करता रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ कमळ चिन्हावरच लढणार व जिंकणार आहोत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये भाजपसाठी चांगले वातावरण आहे. या वातावरणाचे रूपांतर मतामध्ये होण्यासाठी नियोजन करत आहोत.
- डॉ. प्रमोद सावंत, भाजप क्लस्टर प्रमुख तथा मुख्यमंत्री, गोवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com