काजू बी हमीभावासाठी रास्ता रोखला

काजू बी हमीभावासाठी रास्ता रोखला

70394
दोडामार्ग : मुख्य चौकात ठाण मांडून रास्ता रोको करताना शेतकरी. (छायाचित्र : संदेश देसाई)


काजू बी हमीभावासाठी ‘रास्ता रोको’
दोडामार्गात आंदोलन : निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १० ः ‘काजू बी ला प्रतिकिलो २०० रुपये हमीभाव मिळावा,’ यासाठी शासन दरबारी वारंवार मागणी करूनही त्याकडे शासनाने दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आज दोडामार्ग बाजारपेठेतील मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन केले. रस्त्यावरच ठाण मांडून चौकातील चारही मुख्य रस्त्यांवरील वाहतूक काही काळ रोखून धरली होती. तसेच शासनाने हमीभाव जाहीर न केल्यास येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्धारही या वेळी शेतकऱ्यांनी केला आहे.
काजू बी ला प्रतिकिलो २०० रुपये हमीभाव शासनाने द्यावा, अशी मागणी काजू व फळबागायतदार संघटना करत आहे. या मागणीसाठी सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात शेतकऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक रास्ता रोको आंदोलन केले होते. मात्र, शासन स्तरावर कोणतीही हालचाल होताना दिसली नाही. शेतकऱ्यांच्या या मागणीची लोकप्रतिनिधीही लक्ष घालीत नाहीत. काजू बी ला सध्या बाजारात ११५ ते १२० रुपये प्रतिकिलो दर आहे. शेतीला येणार खर्च पाहता हा दर शेतकऱ्याला परवडणारा नाही.
दर घसरत असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. ही बाब अनेकवेळा शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांच्या या दुखण्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्या धर्तीवर गुरुवारी (ता. ७) येथील सिद्धिविनायक मंदिरात झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत शासनाला जाग आणण्यासाठी येथील बाजारपेठेत आज रास्ता रोको आंदोलनचा निर्णय संतप्त शेतकऱ्यांनी घेतला होता.
त्यानुसार येथील श्री गणेश मंदिरात आज सकाळी तालुक्यासहित इतर तालुक्यातील शेतकरी एकवटले. त्यानंतर या शेतकऱ्यांनी गणेश मंदिर ते दोडामार्ग मुख्य चौकापर्यंत मोर्चा काढला. यावेळी ‘शेतकरी फळ बागायतदार संघाचा विजय असो’, ‘काजूला २०० रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे’, या व इतर अनेक घोषणा दिल्या. हा मोर्चा येथील मुख्य चौकात आल्यानंतर शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. आज आठवडा बाजार असल्याने बाजारात येणाऱ्यांची पंचाईत झाली. वाहतुकीवरही याचा विपरीत परिणाम झाला. चौकातून तिलारी, गोवा, सावंतवाडी व आयीच्या दिशेने जाणाऱ्या चारही प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यावेळी तैनात असलेल्या पोलिसांनी तिलारी व गोव्याच्या दिशेने होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पर्याय मार्ग एकेरी वाहनांचा असल्याने तेथेही वाहनांची कोंडी झाली.
-----------------
चौकट
दोन दिवसांत निर्णय
या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी झाले होते. पोलिस बंदोबस्तही तैनात होता. शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. पणन मंत्री, कृषी मंत्री व शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी हमीभावासाठी बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे दोन दिवसांत सरकारचा सकारात्मक निर्णय जाहीर होईल, असे पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना सांगितल्याने शेतकऱ्यांनी अखेर त्यांचे आंदोलन स्थगित केले. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
-----------------
चौकट
...अन्यथा महामार्ग रोखणार
काजू बी ला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले जात आहे. त्यामुळे स्वामीनाथन आयोग हा लागू झालाच पाहिजे. सरकारने जर काजू बी ला हमीभाव दिला नाही तर यापुढे गोवा-मुंबई महामार्गावर आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com