वाढत्या उष्म्याने प्रचार प्रभावी

वाढत्या उष्म्याने प्रचार प्रभावी

वाढत्या उष्म्याने प्रचार प्रभावी

आंबा हंगामाचाही परिणाम ः सायंकाळनंतर सुरु होताहेत गाठीभेटी

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २५ ः वाढता उकाडा आणि सध्या जोरात असलेला आंबा हंगाम यामुळे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना सायंकाळनंतरच आपल्या उमेदवाराचा प्रचार करावा लागत आहे. त्यामुळे मतदारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांवर सायंकाळी उशिरापर्यंत प्रचार करण्याची वेळ येत आहे. लोकसभा निवडणूक प्रचारात तरूणांसह महिलांचाही सहभाग असल्याचे चित्र आहे.
यावेळची निवडणूक लक्षवेधी आहे. या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. मतदारसंघाबरोबरच कोकणसह राज्याच्या विविध भागाचे या लढतीकडे लक्ष आहे. ठाकरे गट शिवसेना पक्षासह काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत रिंगणात आहेत. तर भाजप तसेच शिंदेगट शिवसेना यासह मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार केंद्रीयमंत्री नारायण राणे प्रथमच लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. विद्यमान खासदार आणि विद्यमान केंद्रीयमंत्री अशी लढत आहे. त्यामुळे या तुल्यबळ लढतीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
यावेळी राजकीय संदर्भ बदलल्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार? हा औत्सुक्याचा विषय ठरत आहे. यापुर्वी नव्याने नोंदणी झालेले मतदार आपल्याकडे खेचण्याचा राजकीय पक्षांचा खटाटोप सुरू होता. पक्षातील तरूणांची फौज वाढवण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. निवडणूक प्रचारात तरूणांचा चांगला उपयोग होऊ शकतो. युवकांमध्ये धावपळ करण्याची क्षमता अधिक असल्याने त्याचा राजकीय पक्षांना लाभ होण्यासाठी धडपड सुरू असते. सध्या येथे उकाड्याने नागरिक हैराण आहेत. दिवसा कडक ऊन जाणवत आहे. त्यातच आंबा हंगाम सुरू आहे. त्यामुळे अनेकांचा वेळ दिवसभर आंबा बागेत जातो. अशावेळी मतदारांच्या गाठीभेटी, स्थानिक बैठका घ्यायच्या झाल्यास मतदार सायंकाळशिवाय उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनाही आपल्या प्रचाराच्या रणनितीमध्ये काहीसा बदल करावा लागला आहे. ग्रामीण भागात सायंकाळी उशिरानंतरच मतदारांशी चर्चा, गाठीभेटी घ्याव्या लागत असल्याचे चित्र आहे. आता मतदानाला काही ठराविक दिवस शिल्लक राहिल्याने प्रचाराची गती वाढवावी लागणार आहे. तरीही उकाडा आणि आंबा हंगाम याबाबत मिळतेजुळते घेऊन प्रचार करण्यावर भर आहे.
.........................
चौकट
गाठीभेटींकडे कल
आताची लोकसभा निवडणूक आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजली जात आहे. यावेळच्या राजकीय यशापयाशावर आगामी विधानसभा निवडणुकांचे आखाडे बांधले जावू शकतात. त्यामुळे भविष्यातील आपली राजकीय खुर्ची वाचवण्यासाठी कार्यकर्त्यांना बरीच धडपड करावी लागणार आहे. यासाठी मतदारांच्या गाठीभेठी घेण्याकडे कल वाढला आहे.
.........................
चौकट
पाणी टंचाईचा प्रचारात मुद्दा
प्रचारामध्ये पाणी टंचाईच्या विषयाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. उकाडा वाढल्याने टंचाईची झळ बसू लागली आहे. यातून महिलांना अधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. विहिरी आटल्याने नळयोजनेच्या पाण्यावरच काहींची गुजराण असल्याने महिलांना वाट पहात बसण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे प्रचार करताना याचीही झळ बसण्याची शक्यता अधिक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com