''शक्तिपीठ'' विरोधात  आज सावंतवाडीत बैठक

''शक्तिपीठ'' विरोधात आज सावंतवाडीत बैठक

‘शक्तिपीठ’ विरोधात
आज सावंतवाडीत बैठक
सावंतवाडीः नागपूरहून निघणारा शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून सावंतवाडी तालुक्यातील गेळे, आंबोली, वेर्ले, पारपोली, फणसवडे, असनिये, तांबोळी, डेगवे, बांदा असा जाणार आहे. या सहापदरी महामार्गामुळे तालुक्यातील हजारो एकर जमीन जाणार असून, पर्यावरणाचीही प्रचंड हानी होणार आहे. सावंतवाडी आपला तालुका पश्चिम घाटाच्या अतिसंवेदनशील पट्ट्यात येतो. असे असताना या महामार्गाचा अट्टाहास का, असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. कोल्हापूर सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर येथील शेतकरी महामार्ग विरोधी लढ्यात मोठ्या संख्येने उतरले आहेत. या महामार्गामुळे बाधित होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक उद्या (ता. २६) सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मध्यवर्ती कारागृहाजवळ, सावंतवाडी येथे आयोजित केली आहे. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे नेते संपत देसाई, अंकुश कदम, प्रकाश मोरुस्कर हे उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समन्वयक राजेंद्र कांबळे यांनी केले आहे
..............
नितीन बानगुडे यांची
उद्या कुडाळात सभा
कुडाळ : शिवसेना ठाकरे गट इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे पाटील यांची जाहीर सभा शनिवारी (ता. २७) सकाळी ११ वाजता मनोहर मंगल कार्यालय, माणगाव (ता. कुडाळ) येथे आयोजित केली आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राऊत यांच्या प्रचारार्थ खळा बैठका, विभागनिहाय प्रचार सभा घेतल्या आहेत. त्याचबरोबर घरोघरी प्रचार मोहीम जोरात राबविण्यात येत आहे. शिवाय जाहीर प्रचार सभांचेही आयोजन केले आहे. या सभेला महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार नाईक यांनी केले आहे.
............
कसालमध्ये मुलांना
''कॅलिग्राफी''चे धडे
कुडाळः विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल, कसाल येथे आयोजित ‘समर कॅम्प २०२४’ मध्ये मुलांनी वैज्ञानिक अभ्यासासोबत सुलेखनाचे धडे गिरवत आपल्या कलांना वाव दिला. सिंधुदुर्गातील चित्रकार व सुलेखनकार सुमित दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी कॅलिग्राफी, त्याचे विविध पैलू, सदर कलेबद्दलची माहिती, प्रात्यक्षिके यांचा आनंद लुटला. सुमित दाभोलकर यांनी कॅलिग्राफी कलेचे महत्त्व सांगत रंजक प्रात्यक्षिके दाखविली. सर्व मुलांना कॅलिग्राफीशी निगडित टूल्सची तोंड ओळख करून दिली. या समर कॅम्पमध्ये पहिली ते दहावीपर्यंतच्या वयोगटातील मुले-मुली सहभागी झाली होती. मुलांनी उत्साहात या उपक्रमामध्ये आपला सहभाग दर्शवला. या कॅम्पमध्ये रोबोटिक्स, कोडींग व रोबोटिक्सची कार्यरचना दाखविण्यात आली. रंगांच्या अनोख्या दुनियेत रमून जात मुलांनी आपली कला कागदावर उतरवली. मुलांना बोरू वापरून जुन्या लेखनपद्धती ते आधुनिक लिखाणामध्ये झालेला बदल दाखविण्यात आला. सुषमा केणी तसेच शिक्षक उपस्थित होते. मुलांनी मोबाईलचा जास्त वापर टाळून अशा कलांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत दाभोलकर यांनी व्यक्त केले.
............
ध्यान धारणेबाबत
कुडाळात मार्गदर्शन
कुडाळः आनंदमय जीवन जगण्याचे सरळ व सोप्या मार्गाचे ज्ञान देण्यासाठी पिरॅमिड स्पिरिच्युअर सोसायटी मुंबई मुव्हमेंटतर्फे ध्यान प्रचार व प्रसारासाठी आजपासून ध्यानाचे महत्त्व व प्रात्यक्षिक मार्गदर्शन शिबिराचा आजपासून प्रारंभ झाला. हे शिबिर २९ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत सकाळी ८ ते १० या वेळेत डिगस, आवळेगाव, हिर्लोक, भडगाव, पांग्रड हायस्कूलमध्ये तसेच आवळेगाव पिरॅमिड ध्यान केंद्र येथे सायंकाळी ४ ते ६ या वेळेत मोफत मार्गदर्शन व योगा प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. यात ध्यान कोणासाठी व कशासाठी, ध्यानाची पद्धत, ध्यान किती वेळा करावे, ध्यानाचे फायदे, आध्यात्मिक विज्ञान आदी ध्यान विषयक माहिती देण्यात येणार आहे. पिरॅमिड ध्यान प्रचार फाउंडेशन पुणे संलग्न गगनगिरी महाराजांचे मुंबई स्थित भक्त लवू सावंत (आवळेगाव) हे गावागावांत आपल्या सहकाऱ्यांसह भेटी देऊन प्रचार करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com