भातकापणीचे काम 
रसायनीमध्ये सुरू

भातकापणीचे काम रसायनीमध्ये सुरू

भातकापणीचे काम
रसायनीमध्ये सुरू
रसायनी : यंदा तालुक्‍यातील हवामान चांगले असल्‍याने भाताचे पीक सर्वाधिक आले आहे. त्‍यामुळे रसायनी परिसरात दुबार भातकापणीचे काम सुरू झाले आहे. तर सध्या काहीसे ढगाळ हवामान होत असल्‍याने कापणीचे काम शेतकऱ्यांनी लगबगीने सुरू केले आहे. मागील काही वर्षापासून परिसरात सिंचनाचे काम योग्यप्रकारे झाल्‍याने तालुक्‍यातील पाण्याचा प्रश्‍न बऱ्यापैकी सुटला आहे. त्‍यामुळे शेतकरी दुबार भात आणि भाजीपाल्याचे पीक घेत आहे. सुरुवातीला पेरणीनंतर रोपांची वाढ आणि त्यानंतर लावणीसाठी अनुकूल तसेच पोषक वातावरण असल्याने पिकाची वाढ चांगली झाली आहे. यंदाच्या वर्षी भाताचे पीक चांगले आले आहे. बहुतेक शेतकऱ्यांनी संकरित वाणाचे पीक घेतले आहे. यंदाच्या वर्षी भाताचे पीक चांगले आले असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. परिसरात पाताळगंगा, बामणोली धरण आणि मोहोपाडा येथील एमआयडीसीच्‍या केंद्रातील पाण्यामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्‍न बऱ्यापैकी सुटला आहे. त्‍यामुळे येथील शेतकरी दुबार भात आणि भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेत आहेत.
------
ओढे, नाल्‍यात
कचऱ्याची रास
नेरळ : नेरळ शहरात अनेक ओढे, नाले असून सध्या ते कचऱ्याने बुजले असल्याचे चित्र आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. येथील रहिवाशांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्‍यामुळे नाल्या, ओढ्यांची सफाई कधी होणार, असा सवाल नेरळवासीयांकडून केला जात आहे. पावसाळ्यापूर्वी स्थानिक प्रशासनाकडून नालेसफाईला सुरुवात केली जाते. जेणेकरून कचऱ्यामुळे ओढ, नाले तुंबून पाणी शहरात शिरू नये, यासाठी खबरदारी घेतली जाते. मात्र, नेरळ शहरातील नाले, ओढे कचऱ्यांनी तुडुंब भरलेले आहेत. अद्यापही पालिका प्रशासनाकडून सफाई करण्यात आलेली नाही. येथील मोहचीवाडी, वाल्मिकीनगर भागात कर्जत- कल्याण राज्यमार्गावर दोन पूल आहेत. या पुलाखालून जाणाऱ्या ओढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे.
---
मुरूडमध्ये आज
पुन्हा भारनियमन
मुरूड : महावितरण कंपनीकडून मुरूड तालुक्‍यात ३० एप्रिल रोजी संपूर्ण दिवस भारनियमन घेतले जाणार असल्‍याचे सांगण्यात आले आहे. त्‍यामुळे उकाड्यामुळे आधी‍च हैराण झालेल्‍या मुरूडकरांनी भारनियमनामुळे नाराजी व्‍यक्‍त केली आहे. यंदा तीव्र उन्‍हाळा असल्‍याने गरमीमुळे मुरूडकर हैराण झाले आहे. त्‍यातच मागील २२ एप्रिल रोजी महावितरण कंपनीतर्फे मुरूड तालुक्यात भारनियमन करण्यात आले होते. तथापि,‍ येत्या ३० एप्रिल रोजी पुन्हा संपूर्ण तालुक्यात सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत महावितरणकडून भारनियमन करण्यात येणार असल्याचे मुरूड महावितरणचे उपकार्यकारी अभियंता कृष्णात सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करण्यासाठी, शिवाय मुख्य विद्युत वाहिनीवरील झाडे तोडणे आदी कामांसाठी भारनियमन घेण्यात आल्‍याचे सांगण्यात येत आहे. या महिन्यात सलग दुसऱ्यांदा साप्ताहिक भारनियमन घेतल्याने उकाड्याने त्रस्त ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
----
सांकशी किल्ल्यावर
स्वच्छता मोहीम
पेण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि त्यांच्या किल्ल्यांची स्वच्छता मोहीम मुंबई येथील राजा शिवछत्रपती परिवाराकडून राबविण्यात येत आहे. त्‍यानुसार पेण येथील सांकशी किल्ल्यावर ही स्‍वच्‍छता मोहीम राबविण्यात आली, पेण तालुक्यातील मुंगोशी गावाच्या पुढे तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पुरातन सांकशी किल्ल्याच्या स्वच्छ्ता मोहिमेसाठी २३ मावळ्यांसह दोन महिलांनी सहभाग घेऊन किल्ल्याची पूर्णतः साफसफाई केली. यावेळी पुरातन असणाऱ्या वस्तू एका ठिकाणी जमा करून ठेवण्यात आल्‍या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करून इतिहास जागरूक ठेवण्याचे काम राजा शिवछत्रपती परिवाराकडून करण्यात येत असल्‍याने त्‍यांचे कौतुक करण्यात येत आहे. यावेळी दुर्गरक्षक कैलास घरत, यतिश करण, ज्ञानेश्वर इंगोले, राकेश पयेर, विजय मोरे, प्रसाद आंबवले आदी उपस्थित होते.
---
गढूळ पाण्यामुळे
नागरिक हैराण
उरण : उरण परिसरात गढूळ पाणीपुरवठ्यामुळे रहिवासी हैराण झाले आहेत. तीव्र उष्णतेमुळे आधीच तालुक्‍यात विविध आजार वाढत असताना, गढूळ पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्‍यक्‍त करण्यात येत आहे. त्‍यामुळे अनेकांना बाटलीबंद पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
उरण तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. हा प्रकार सुरू असतानाच गढूळ पाणीपुरवठ्याने उरण पूर्व विभागातील रहिवासी हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कमी- अधिक प्रमाणात होणारा गढूळ पाण्याचा पुरवठा अधिकच दूषित पद्धतीने होऊ लागला आहे. मातकट रंगाच्‍या पाण्याचा पुरवठा अनेक विभागात होत आहे. या दूषित पाण्याला उग्र वासही येत असून ग्रामस्थांमध्ये आजारी पडण्याची भीती वाढीस लागली आहे. पुनाडे धरणाने तळ गाठला आहे. त्याचा परिणाम आठ गावांतील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्‍याचे सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com