दोडामार्ग मायनिंगचा डाव हाणून पाडू

दोडामार्ग मायनिंगचा डाव हाणून पाडू

80626
दोडामार्ग ः पिंपळेश्वर सभागृहात जाहीर सभेत बोलताना खासदार विनायक राऊत. शेजारी इतर. (छायाचित्र ः संदेश देसाई) 


दोडामार्गातील मायनिंगचा
डाव हाणून पाडू ः राऊत

सकाळ वृत्तसेवा 
दोडामार्ग, ता. २९ ः तालुक्यात अजून सहा मायनिंग प्रकल्प प्रस्थापित केले आहेत. मायनिंगच्या अमाप पैशातून आपली संपत्ती वाढविण्याचा भाजपसह सत्ताधारी नेत्यांचा कुटील डाव असून दोडामार्ग तालुका उद्ध्वस्त करण्यास ते मागे पुढे पाहणार नाहीत; परंतु हा त्यांचा डाव आम्ही उध्वस्त करू. दोडामार्ग तालुका हा निसर्ग संपन्न राहिला पाहिजे. तसेच सध्या भयानक असलेला हत्ती प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतः प्रयत्नशील असून दोडामार्ग तालुका हत्ती मुक्त करण्याचा विडा उचलत असल्याची प्रतिज्ञा विनायक राऊत यांनी येथील सभेत केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील पिंपळेश्वर सभागृहात सभा झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘सच्चा शिवसैनिकांच्या त्यागातून उभा राहिलेला हा सिंधुदुर्ग जिल्हा कधीच विसरणार नाही. नारळ, पोफळी, काजू तसेच विपुल वृक्ष वेलींनी दोडामार्ग तालुका निसर्ग संपन्न आहे; पण दुर्दैव इतकं की हत्तींचा त्रास, येथील शेतकऱ्यांना गेली अनेक वर्षे होतो आहे. रानटी हत्तींची समस्या आपल्या जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी होती. माणगाव खोऱ्यात व तिलारी खोऱ्यात. माणगाव खोऱ्यातील हत्तींनी जवळजवळ अकरा माणसांना मारलं होत. अनेक लोकांना जखमी केलं होते. त्यावेळी नारायण राणे यांनी राबवलेली मोहीम अपयशी ठरली होती. मी, खासदार म्हणून निवडून आल्यानंतर यशस्वी हत्ती पकड मोहीम राबवली. गेली काही वर्षे दोडामार्गमध्ये हत्तींचा शेतकऱ्यांना त्रास होत आहे. या त्रासातून दोडामार्गच्या शेतकऱ्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहिलो; मात्र तेव्हा दीपक केसरकर यांनी ‘तुम्हीं त्यात लक्ष घालू नका तो विषय मी हाताळणार’, असे सांगितले. त्यावेळी ते मंत्री होते. मला वाटलं ते मंत्री असल्याने हत्ती त्यांच ऐकतील म्हणून मी त्या विषयात पडलो नव्हतो; मात्र केसरकरांचा हा अट्टाहास लोकांना भारी पडला आहे. त्यांनी अद्यापही त्यावर काहीच उपाय योजना राबविल्या नाहीत; पण मी आज तुम्हांला शब्द देतो की हा दोडामार्ग तालुका मी हत्ती मुक्त करणार आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘आडाळी एमआयडीसीमध्ये एनआयएमपी एक मोठा प्रोजेक्ट मी उद्धव ठाकरे आणि श्रीपाद नाईक यांच्या सहकार्याने सुरू करायचं ठरवले आहे. ठाकरेंनी तलावाच्या बाजूची एमआयडीसीची पन्नास एकर जमीन दिली. त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून संपूर्ण दोडामार्ग तालुका व सिंधुदुर्ग जिल्हा यात औषधे वनस्पती लागवड केली जाणार होती. जगातल्या सर्वात उत्कृष्ट असा आयुर्वेदिक औषधे निर्माण करणारा हा प्रकल्प मंजूर करून घेतला. दुर्दैवाने श्रीपाद नाईक हे आजारी पडले. उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून दूर करण्यात आलं. केवळ विनायक राऊत यांनी हा प्रकल्प मंजूर केला म्हणून या भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने तो प्रकल्प बाजूला ढकलला. गेले दोन वर्षे मी प्रयत्न करीत आहे; परंतु भाजपची सत्ता असल्याने त्यांचे मंत्री साथ देत नाहीत. यासाठी विरोध करणाऱ्या नारायण राणेंना अभ्यास करावा लागेल.’’ व्यासपीठावर ठाकरे गट शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष ईर्षाद शेख, अर्चना घारे-परब, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत जिल्हा समन्वयक बाळा गावडे, आप पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, प्रवक्ते जयेंद्र परुळेकर, शिवसेना वसंत केसरकर, दोडामार्ग संपर्क प्रमुख संदीप टोपले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप कदम, शिवसेना उपनेते लक्ष्मण वर्डे, लोकनेते सुरेश दळवी, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com