सिंधुदुर्गासाठी मी नेहमीच प्रयत्नशील

सिंधुदुर्गासाठी मी नेहमीच प्रयत्नशील

80637
आरोंदा ः येथील मेळाव्यात बोल करताना नारायण राणे. व्यासपीठावर दीपक केसरकर व अन्य.


सिंधुदुर्गासाठी मी नेहमीच
प्रयत्नशील ः मंत्री राणे

आरोंदा येथे महायुतीचा प्रचार मेळावा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ ः सिंधुदुर्ग जिल्ह्याचं व माझं नातं हे भावनिक आहे. हा जिल्हा माझं घर असून येथील माणसं हे माझे कुटुंब आहे. त्यामुळे या कुटुंबातील प्रत्येक सदस्य सुखी व समृद्ध व्हावा यासाठी गेली ३५ वर्षे मी सातत्याने प्रयत्न करीत आहे. तुम्ही देखील मला नेहमीच भरभरून दिले आहे. आता तुमच्या या ऋणातून उतराई होण्यासाठी मला अधिक काम करायचे असून त्यासाठी तुमच्या हक्काचा माणूस दिल्लीत पाठवा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोंदा (ता.सावंतवाडी) येथे महायुतीच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, जिल्हा परिषदचे माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, जिल्हा परिषदच्या माजी सभापती शर्वाणी गांवकर, भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष महेश धुरी, तालुका उपाध्यक्ष शेखर गांवकर, माजी उपसभापती संदीप नेमळेकर, सिद्धेश कांबळी, रुपाली शिरसाट आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘आम्ही विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवीत आहोत. मात्र, विरोधकांकडे कोणताही विकासाचा मुद्दा नाही. देशाचे नेतृत्व करू शकणारा एकही नेता त्यांच्याकडे नाही. राहुल गांधी टी-शर्ट परिधान करून व दाढी वाढवून मार्गक्रमण करीत आहे. मात्र, देशातील जनतेच्या प्रश्नांचा कोणताही अभ्यास त्यांच्याकडे नाही. उद्धव ठाकरे यांनी शिवछत्रपतींचे नाव घेऊन आपले घर चालवले. जनतेच्या घराशी त्यांच्या सुखदुःखाशी त्यांना कोणतेच सोयरसुतक नाही. सोबतची माणसं सोडून गेली, पक्ष संपवला, धनुष्यबाण चिन्हही गेले आता मशाल घेऊन कोणाची घरे जळायला निघालात.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘कोकणचा विकास हा माझा ध्यास आहे. कारण माझा जन्म येथे झाला. येथील लोकांनी मला विविध पदांपर्यंत पोहोचवले. त्यामुळे त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी माझे नेहमीच प्रयत्न राहिले आहेत. मी या जिल्ह्यात तीस वर्षांपूर्वी आलो तेव्हा हा जिल्हा दरिद्री व गरीब म्हणून ओळखला जायचा. त्याचवेळी मी शपथ घेतली होती की ही परिस्थिती लवकरच बदलेन. त्यानंतर या जिल्ह्यातील सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. आता रोजगाराचा मूलभूत प्रश्न शिल्लक असून तो देखील मार्गी लावणार.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com