कांदा आणणार गृहिणींच्या डोळ्यात पाणी

कांदा आणणार गृहिणींच्या डोळ्यात पाणी

80663
कणकवली ः येथील बाजारात आज लाल कांदा विक्रीचे दर वाढलेले होते.


कांदा आणणार गृहिणींच्या डोळ्यात पाणी

३० ते ३५ रुपये किलो ः सरासरी १५ रुपये किलोमागे दरवाढ

सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता. ३० ः उन्हाळी हंगामामध्ये सरासरी कांद्याचा दर हा विक्रीसाठी परवडणारा असतो. मात्र, अगदी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बाजारपेठेत विक्रीला आलेला कांदा महागल्याने नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या आठवड्यात २० रुपये किलो असलेला कांदा आज ३० ते ३५ रुपये किलोने विकला जात होता. त्यामुळे दर वाढल्याने कांदा गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणणार, अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे.
केंद्र सरकार विरोधात कांदा व्यापाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. गुजरातमधील पांढऱ्या रंगाच्या कांदा निर्यातीला परवानगी होती. तर, महाराष्ट्रातील लाल कांद्याच्या परदेशी निर्यातीला बंदी घालण्यात आली होती. यामुळे गेले काही दिवस सरकार विरोधात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. पश्चिम महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरीही आक्रमक झाले होते. आता, त्याचा नेमका परिणाम ग्रामीण भागातील बाजारपेठांवरही दिसून येत आहे. आज येथील मंगळवारच्या आठवडा बाजारांमध्ये विक्रीसाठी आलेला कांदा महागला होता. गेल्या आठवड्यात २० रुपये किलो रुपयांना कांदा विकला जात होता. मात्र, या आठवड्यात बाजारपेठेत विक्रीसाठी आलेला कांदा ३० ते ३५ रुपये किलोने विकला जात होता. सरासरी १५ रुपये किलोमागे दरवाढ झाली आहे.
मुळात ग्रामीण भागातील शेतकरी किंवा वाहतुकीच्या अडचण असलेल्या वाड्या वस्तीवर कांदा पावसाळा हंगामासाठी खरेदी केला जातो. एका कुटुंबात सरासरी ५० किलो पेक्षा अधिक कांदा खरेदी करून तो साठवण केला जातो. कारण, पावसाळ्यात कांद्याचा दर हा अवाच्या सव्वा असतो. तो सामान्य शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये ठेवणीचा कांदा बाजारात येत असतो. आज, येथील आठवडा बाजारात दाखल झालेला ठेवणीचा कांदा ३० रुपये किलोने होता. त्यामुळे कांद्याची झालेली ही दरवाढ गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे. वर्षभरासाठी साठवून ठेवण्यासाठी कांदा खरेदी करणे यंदा परवडणारे नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांद्याने ग्राहकांना हैराण केले आहे. कांद्याचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच बाजारपेठेत बटाट्याचा दरही ४० रुपयांवर आहे. त्यामुळे महागाई ही सामान्य ग्राहकांना अडचणीची ठरणार आहे. उन्हाळी हंगाम असल्याने सध्या विवाह सोहळे, धार्मिक कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे गावागावात जेवणावळी होत आहेत. कांदा आणि बटाटा दरवाढीचा फटका या कार्यक्रमांना बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com