नेत्यांची मने जुळली; पण कार्यकर्त्यांचं काय?

नेत्यांची मने जुळली; पण कार्यकर्त्यांचं काय?

नेत्यांची मने जुळली; पण कार्यकर्त्यांचं काय?

नव्या राजकीय समीकरणांचा परिणाम; कार्यकर्त्यांची कसरत

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३० ः राज्यातील राजकीय भूकंपानंतर नव्या राजकीय पक्षांची निर्मिती झाली. गतवेळच्या लोकसभा निवडणुकीत एकाच आघाडीतील मित्रपक्ष या वेळी विभक्त झाले. अनेक वर्षे एकाच पक्षाच्या झेंड्याखाली राहून एकाच उमेदवाराचा एकत्रित प्रचार करणारे कार्यकर्तेही विखुरले गेले आहेत. त्या वेळचे मित्र विरोधक बनले आहेत. या साऱ्या घडलं-बिघडल्याच्या आमनेसामने लढणाऱ्या नेत्यांची नव्या राजकीय समिकरणात मने जुळली असली तरीही कार्यकर्त्यांची मनं जुळणे आणि त्यामधून प्रचाराला गती देणे याचे नेत्यांपुढे आव्हान आहे.
या लोकसभा निवडणुकीमध्ये नवी राजकीय समिकरणं जुळल्यामुळे थेट मतदारांशी जोडल्या गेलेल्या कार्यकर्त्यांना एकमेकांशी जुळवून घेणं अवघड जात आहे. कार्यकर्त्यांची मनं जुळली नाहीत तर मतांची आघाडी मिळवणे उमेदवारांसाठी कठीण आहे. केवळ नेत्यांची मनं जपण्यासाठी राजकीय साटमारीमध्ये होत असलेल्या घुसमटीबाबत कार्यकर्त्यांकडून थेट भाष्य करण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे समोर येत नाही. नेत्यांच्या आदेशानुसार कार्यकर्ते प्रचारात असले तरीही लोकांसमोर प्रचारात जाताना सर्वच नव्या-जुन्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांपुढे संभ्रम आहे. या परिस्थितीला सामोरे जात प्रचारयंत्रणा राबवताना राजापूरमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या सर्वांनाच अडचणीचे जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत विरोधक म्हणून एकमेकांसमोर ठाकलेले आणि आताही इच्छुक असलेले उमेदवार एकत्र प्रचार करत आहेत. नेत्यांसमवेत लोकसभेत एकत्र प्रचार सुरू असला तरीही भविष्यात विधानसभा निवडणुकीत एकमेकांचे विरोधक म्हणून प्रचारात उतरण्याची वेळ येण्याची दाट शक्यता आहे. त्या वेळी आताच्या मैत्रीबाबत मतदारांनी प्रश्‍न विचारल्यास नेमकं काय उत्तर द्यायचं, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांपुढे आहे. अनेक मतदार प्रचारावेळी आपले प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांना आपली भूमिका समजवून सांगताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
--------
कोट
पाच वर्षांपूर्वी ज्या चिन्हावर मतदान करा असे मतदारांना सांगितले ते चिन्ह या वेळी नसून नव्या आणि वेगळ्याच चिन्हावर मतदानावर मतदान करा, असे सांगावे लागत आहे. भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत आणखीन वेगळे चिन्ह असल्यास आणि त्याबाबत मतदारांनी प्रश्‍न उपस्थित केल्यास बदलणाऱ्या चिन्हांबाबत नेमकं उत्तर काय द्यायचं? हा प्रश्न आहे.
- प्रतीक, राजकीय कार्यकर्ता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com