दोन बातम्या समोरासमोर

दोन बातम्या समोरासमोर

80805
सावंतवाडी ः येथे पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत जाधव. बाजूला सोनिया मठकर, अनंत आसोलकर, राजेश चव्हाण आदी.

दलितांची डोकी भडकविण्याचा प्रयत्न

चंद्रकांत जाधव ः काँग्रेसह मित्र पक्षांवर आरोप

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० ः बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न द्यायला ३४ वर्षे लावणारे काँग्रेस आणि त्यांच्या सोबत असणारे मित्रपक्ष देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान बदलणार, असे सांगत आहेत. मात्र, त्यांच्याकडे प्रचाराचे मुद्देच नसल्याने ते संविधानाच्या मुद्यावरून दलित बांधवांची डोकी भडकविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप भाजपचे अनुसूचित जाती जमाती जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव यांनी आज येथे केला.
श्री. जाधव यांनी आज येथे महायुतीच्या प्रचार कार्यालयात पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या आरोपांना उत्तर दिले. यावेळी अनुसूचित जाती जमाती महिला जिल्हाध्यक्ष सोनिया मठकर, जिल्हा कोषाध्यक्ष अनंत आसोलकर, राजेश चव्हाण, प्रकाश कदम, वासुदेव जाधव, संजय डिंगणेकर, महेश चव्हाण, किशोर निगुडकर, उमेश मठकर आदी उपस्थित होते.
श्री. जाधव म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत आणि कार्यकर्त्यांकडे प्रचाराला मुद्दे नसल्याने ते पंतप्रधान मोदी देशाचे संविधान बदलणार, असा प्रचार करत आहेत. मुळात विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते असे वक्तव्य करत आहेत. मात्र, काही झाले तरी दलित बांधव एक दिलाने नारायण राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहेत. संविधान बदलणार, असे काँग्रेस आणि मित्र पक्ष म्हणत असतील तर बाबासाहेब आंबेडकरांना याच काँग्रेसकडून भारतरत्न द्यायला ३४ वर्षे का लागली? या लोकांनी दलित बांधवांच्या वाडीवस्तीवर जाऊन कधी संविधानाचा गौरव केला आहे का? उलट काँग्रेसकडून १०६ वेळा घटना दुरुस्ती केली गेली आणि या दुरुस्तीमध्ये अनेक त्रुटी राहिल्या आहेत. त्या सुधारण्यासाठी ‘चारसौ पार’चा नारा मोदींनी दिला आहे. त्यामुळे कोणी कितीही डोके भडकवण्याचा प्रयत्न केला तरी दलित बांधव कुठेही भरकटणार नाहीत.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com