-दापोलीतून लांबपल्ल्याच्या एसटी बसेस उशिरा

-दापोलीतून लांबपल्ल्याच्या एसटी बसेस उशिरा

९ (टुडे पान १ साठी)

दापोलीतून लांबपल्ल्याच्या एसटी उशिरा

प्रवाशांचे हाल ; इंधन पुरवठा नसल्याने विलंब
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. २ ः दापोली बस स्थानकातून गेले अनेक दिवस लांब पल्ल्याच्या गाड्या दोन ते तीन तास उशिराने धावत आहेत. अनेकवेळा दापोली, रत्नागिरी किंवा लांब पल्ल्याच्या गाड्या या आयत्यावेळेस रद्द करण्यात येत असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.
दापोली एसटी आगाराच्या मागणीनुसार, विभागीय कार्यालयाकडून डिझेलचा पुरवठा होत नसल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यास विलंब होत आहे. बसेसही रद्द करण्याची नामुष्की एसटी प्रशासनावर येत आहे.
दापोली एसटी आगार रत्नागिरी जिल्ह्यात नफ्यामध्ये प्रथम क्रमांकावर असताना देखील नादुरुस्त गाड्या, चालक-वाहकांची कमतरता, मेकॅनिकची कमतरता अशा अनेक असुविधांमधून दापोली एसटी आगार जात आहे. दापोली एसटी आगार व्यवस्थापनाकडून अनेकवेळा डिझेल पुरवठा नियंत्रित करण्यात यावा, नवीन गाड्या प्राप्त व्हाव्यात, मेंटेनन्सचे साहित्य उपलब्ध व्हावे त्याचप्रमाणे चालक-वाहक आणि ज्या रिक्त जागा आहेत त्या तातडीने भरण्यात यासाठी पाठपुरावा करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दररोज तिकीटविक्रीमधून जमा होणारी रक्कम विभागीय कार्यालय रत्नागिरी येथे पाठवण्यात येते आणि त्यामधून डिझेलचा पुरवठा हा विभागीय कार्यालयाकडून तेल कंपन्यांना पैसे पाठवून करण्यात येतो; मात्र डिझेलचे पैसे तेल कंपनीला वेळेत न पाठवल्याने डिझेलचा टॅंकर उशिरा येत असल्याने डिझेलअभावी एसटी बसेस आगारातच उभा कराव्या लागतात व जेव्हा डिझेल येतील तेव्हा ते बसेसमध्ये भरून बसेस मार्गस्थ होतात.
दापोली आगाराला नव्या गाड्या प्राप्त करून देण्याचे आश्वासन दापोली मराठी पत्रकार परिषदेच्या आंदोलनानंतर विभागीय कार्यालय रत्नागिरीच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते; मात्र आज आठ महिन्यानंतरही जैसे थे परिस्थिती असल्याचे चित्र आहे.
-------
सहकार्य नसल्याने त्रास

एकंदरीतच रत्नागिरी विभागीय कार्यालयाच्या ढिसाळ व बोटचेपी धोरणांमुळे आणि दापोली आगाराला कोणतेही सहकार्य नसल्यामुळेच प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या अनियंत्रित कारभारात सुधारणा न झाल्यास तीव्र रोषाला आणि होणाऱ्या परिणामांना विभागीय कार्यालय जबाबदार राहील, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com