खासदरांच्या आठवणी

खासदरांच्या आठवणी

निवडणूक पानासाठी - खासदरांच्या आठवणी

swt216.jpg
M81059
क्रांतीसिंह नाना पाटील

मराठीतून भाषण करणारे
संसदेतील पहिले खासदार
- सतीश पाटणकर

स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्रातील महत्वाचे नाव म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील. सांगली जिल्ह्यातील येडमच्छिंद्र या मूळ गावीच ३ ऑगस्ट १९०० रोजी नाना पाटलांचा जन्म झाला. ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे, असा त्यांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. ह्या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्र्यपूर्व काळात गावोगाव काम करत होत्या. तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल बाँबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या पाच हजार जवानांना होते. प्रतिसरकारने गावटग्यांवर बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली. या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना, पिळवणूक करणाऱ्या सावकारांना, पाटलांना कडक शिक्षा अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती.
त्यामुळे सामान्यांचा या प्रतिसरकारवर विश्वास बसू लागला. या प्रतीसरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली. नाना पाटलांच्या ‘प्रति सरकार’ला लोक ‘पत्रीसरकार’ म्हणत आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तळपायाला पत्रा ठोकीत अशा अफवा असत. १९५७ मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com