वाढत्या उष्म्यामुळे  बाजारपेठा ओस

वाढत्या उष्म्यामुळे बाजारपेठा ओस

वाढत्या उष्म्यामुळे
बाजारपेठा ओस
संगमेश्वरः यंदाचा उन्हाळा कधी नव्हे एवढा तापदायक ठरू लागला आहे. आग ओकणारा सूर्य घामाघूम करत आहे. उष्णता वाढली असून नागरिकांना वाढत्या उन्हाचा चटका सोसेनासा झाला आहे. वाढत्या उन्हामुळे शहरातील वर्दळीचे रस्ते दुपारच्यावेळी ओस पडू लागले आहेत. त्यामुळे बाजारपेठेमध्ये अघोषित संचारबंदी असल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारीही वाढू लागल्या आहेत. मध्यंतरी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने उष्मा एखाद दुसऱ्या दिवसासाठी कमी झाल्याचेही पाहावयास मिळाले; परंतु पुन्हा उष्म्याने उग्ररूप धारण केला आहे. वातावरणातील उष्मा वाढत जात असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तालुक्याची मुख्य बाजारपेठ असल्याने वाहन वर्दळीसह नेहमी ग्राहकांनी गजबजणाऱ्या बाजारपेठ रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी झाली असून ग्राहकांची संख्याही रोडावली आहे. त्यामुळे बाजारपेठेतही शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
----------
उत्कृष्ट वाङ्मयास
आशीर्वाद पुरस्कार
रत्नागिरीः मुंबई येथील वंदना प्रकाशन संस्थेतर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी दरवर्षी आशीर्वाद पुरस्कार मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील सर्व साहित्य प्रकारांना सन्मानचिन्ह व मानपत्र या स्वरूपात दिले जातात. १ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०२३ या १३ वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या निःशुल्क दोन प्रती इच्छुक सहभागी लेखक, लेखिका, कवी, कवयित्री, प्रकाशक, वितरक व संबंधितांनी स्वतःच्या अतिअल्प परिचयासह संस्थेच्या ३० मेपर्यंत पाठवाव्यात. पुरस्काराच्या विचारार्थ पाठवलेली पुस्तके कोणत्याही सबबीवर परत केली जात नाहीत व निवड समितीचा पुरस्कारांचा निर्णय अंतिम असतो. यंदा आशीर्वाद पुरस्कार प्रदान सोहळा दिवाळीपूर्वी किंवा नंतर मुंबईत साजरा होईल. पुस्तके डॉ. सुनील सावंत, ज्येष्ठ साहित्यिक व संस्थापक, आशीर्वाद पुरस्कार, फ्लॅट नं. ६०४, चंद्रदर्शन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, आर. के. वैद्य मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई - ४०० ०२८ या पत्त्यावर पाठवा.
------
महिला मंडळाचा
वसंत गौरी उत्सव
रत्नागिरीः मारूती मंदिर येथील महिला मंडळाचा वसंत गौरी उत्सव साजरा झाला. महिला मंडळाच्या नूतन अध्यक्षा मेघना शहा, सचिव राखी लांजेकर, खजिनदार आरती पाध्ये, सहसचिव स्तिमिता तलाठी, माजी अध्यक्षा मोहिनी पटवर्धन आणि गायिका माधवी मुकादम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि गौरीपूजन करण्यात आले. माधवी मुकादम या संगीत विशारद आहेत. आपल्या सुमधूर आवाजात गाण्याचा कार्यक्रम सादर केला. राधा देवळे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. जय शारदे वागेश्वरी या स्तवनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. आनंदाचे डोही आनंद तरंग, मी राधिका मी प्रेमिका, जिया ले गायो मोरा सावरिया अशी सुंदर गाणी सादर करून सगळ्यांना मंत्रमुग्ध केले. आज धन्य भाग सेवा का अवसर पाया या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. तबलासाथ स्वरूप नेने आणि हार्मोनियमसाथ ओजस करकरे यांनी केली. तासाभराच्या कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. सुप्रिया बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. सचिव राखी लांजेकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com