पान एक-सिंधुदुर्गावर पावसाचे सावट

पान एक-सिंधुदुर्गावर पावसाचे सावट

सिंधुदुर्गवर पावसाचे सावट

हवामान विभागाचा अंदाज; आंबा बागायतदारांना चिंता

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १० ः जिल्ह्यात विजांच्या लखलखाटांसह पुढील पाच दिवसांत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या कालावधीत वाऱ्याचा वेगदेखील वाढणार आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाटसदृश वातावरण आहे. तापमान ३७ ते ३९ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून, दमट आणि ढगाळ वातावरणामुळे जिल्हा अक्षरक्षः होरपळून गेला आहे. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून, दिवसभर उष्णतेच्या झळा बसत होत्या. अंगाची लाहीलाही होत असून, घामाच्या धारा वाहत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने सिंधुदुर्गात ११ मे ते १५ मे या कालावधीत विजांचा लखलखाट आणि वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. १३ व १४ मे रोजी विजांचा लखलखाट आणि वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज असून, उर्वरित दिवशी काही भागांत हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात सध्या आंबा हंगाम तेजीत आहे. अंतिम टप्प्यातील आंबा काढणीवर शेतकऱ्यांचा भर आहे. प्रचंड उष्म्यामुळे आंबा कामे करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंतच शेतकऱ्यांना बागेत काम करता येत आहे. त्यामुळे बागायतदारांची कुचंबणा झाली आहे. त्यातच आता पावसाची शेतकऱ्यांना धास्ती वाटू लागली आहे.
------------
चौकट
परिपक्व फळांची काढणी करा
जिल्ह्यात आंबा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. पाच दिवस पावसाचा अंदाज असला तरी, १३ आणि १४ मे रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. अनेक बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळे तयार असल्याचे दिसून येत आहे. पाऊस आणि वाऱ्याचा अंदाज असल्यामुळे परिपक्व असलेली फळे तातडीने काढावीत. सकाळी ऊन कमी असताना ही काढणी करावी, असा सल्ला मुळदे संशोधन केंद्राकडून देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com