सेवा रस्ताप्रश्नी बांदावासीय आक्रमक

सेवा रस्ताप्रश्नी बांदावासीय आक्रमक

82861
बांदा ः येथे महामार्गाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारताना बांदा ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर. सोबत ग्रामस्थ. (छायाचित्र-नीलेश मोरजकर)


सेवा रस्ताप्रश्नी बांदावासीय आक्रमक

अधिकाऱ्यांना विचारला जाब ः रुंदी वाढविण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १० ः मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा येथे सुरू असलेल्या उड्डाणपूलाचे काम बेकायदा सुरु असून गोव्याच्या दिशेने जाणारा सेवा रस्ता कमी रुंदीचा असल्याचे सांगत बांदा ग्रामस्थ आज आक्रमक झाले. उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
बांदा शहराचे विस्तारीकरण पाहता तसेच महामार्गावरून बांदा शहरात, दाणोली मार्गावर व दोडामार्गच्या दिशेने होणारी वाहतूक त्याच सेवा रस्त्यावर उतरणार असून केवळ सहाच मीटर रुंदीचा रस्ता ठेवल्याने केवळ एकच गाडी सुटते. समोरून दुचाकी जरी आली तर वाहतूक कोंडी होणार त्यामुळे ज्या प्रकारे नऊ मीटरचा सेवा रस्ता प्रस्तावित आहे त्याच प्रकारे करा. कोणा एकाच्या हितासाठी तुम्ही सर्व बांदावासीयांचे आणि वाहनधारकांचे का नुकसान करता, असा सवाल उपस्थित ग्रामस्थांनी केला. जोपर्यंत तुम्ही उड्डाणपूल व महामार्गाच्या जागेचा सर्व्हे करत नाही, तुम्ही ग्रामस्थांना एका बाजूचा सर्व्हिस रोड कोणाच्या आदेशाने कमी केला ह्याचे स्पष्टीकरण देत नाही, तोपर्यंत उड्डाणपुलाचे काम बंद ठेवा; अन्यथा ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी उपस्थित महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. यावेळी बांदा ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य सुशांत पांगम, अजय महाजन, निखिल मयेकर, हेमंत दाभोलकर, पांडुरंग नाटेकर, अक्षय बांदेकर, संदेश पावसकर, सुनील नाटेकर, संतोष खानोलकर, राकेश वाळके आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
बांदा येथे कट्टा कॉर्नर ते स्मशानभूमीपर्यत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. सुरुवातीपासूनच बसस्थानकसमोर असलेल्या हद्दीवरून ग्रामस्थ व महामार्ग विभाग यांच्यात वाद झाले आहेत. सद्यस्थितीत उड्डाणपुलाच्या गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रोडचे काम सुरू आहे. बांदा ग्रामस्थांनी आज येथे सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी भेट देत सर्व्हिस रोडबाबत जाब विचारला. यावेळी महामार्गविभागाचे निवासी अभियंता अनिल सराफ आणि दिलीप पाटण उपस्थित होते. यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर यांनी येथील कामात तुम्ही व ठेकेदार मनाला हव तस बदल करता का? तुम्हाला शासनाने दिलेल्या प्लॅननुसार काम करता येत नाही का, असा सवाल केला. यावेळी उपस्थित अधिकारी सराफ यांनी ‘आम्ही आम्हाला दिलेल्या प्लॅन नुसारच काम करतो,’ असे सांगितले. यावर जर तुम्हाला प्लॅन दिला आहे तर तुम्ही सगळीकडे ४५ मीटर रुंदी घेतली व केवळ एकीकडे ४१ मीटर का घेतली? असा प्रश्न केला. यावर ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. तुम्हाला जर समर्पक उत्तरे देता येत नसतील तर तुमच्या वरिष्ठांना बोलवा, असे खडेबोल श्री. काणेकर यांनी सुनावले.
------------
चौकट
प्लॅन दाखवेपर्यंत काम बंद करा
यावेळी हेमंत दाभोलकर यांनी तुमच्याकडे असलेला रस्त्याचा नकाशा आणि प्लॅन दाखवा, असे सांगितले. यावेळी उपस्थित अभियंता पाटण यांनी प्लॅन दाखवला. तो प्लॅन १९९१ चा होता आणि सध्या काम सुरू आहे ते १९९९ च्या प्लॅन प्रमाणे. यावेळी ग्रामस्थ आक्रमक होत तुम्ही आम्हांला प्लॅन दाखवू शकत नाहीत, आमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाहीत, त्यामुळे आम्हाला समर्पक उत्तर आणि प्लॅन दाखवेपर्यंत काम बंद करा तसेच जसा सेवा रस्ता एकाबाजूने ९ मीटर ठेवला आहे, तसाच दोन्ही बाजूने करावा; अन्यथा आम्ही काम करू देणार नाही, असा सज्जड इशारा उपस्थित ग्रामस्थांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com